" खुद को कर बुलंद इतना कि, हर तःरीर से पहले खुदा बंडे से पुछे, बता तेरी रजा क्या है ?"
आत्मविश्वास - यशाची गुरुकिल्ली. अनेक जाहिरातींमधून नावाजलेली आणि आपलं उत्पादन विकण्यासाठी वापरण्यात आलेली एक महत्वाची संकल्पना. आमचं पेय प्या आणि आत्मविश्वास मिळवा. कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे आत्मविश्वास हे जरी खरं असलं तरी कोणतेही क्रीम लावून किंवा पेय पिउन तो येत नाही हेही तितकंच खरं आहे.
मग हा मिळवायचा कसा? तो खरंच मिळवता येतो का? असं म्हणतात कि, "एकदा गमावलेला विश्वास परत मिळवता येत नाही." आत्माविश्वासाच मात्र तसं नाही. आत्मविश्वास मिळवता येतो आणि टिकवताही येतो.
कोणावरही जेव्हा आपण विश्वास टाकतो, तेव्हा त्या माणसाच्या पात्रातेबद्दल आपल्याला शंका नसते. तसंच त्या माणसाबद्दल एक प्रकारचा आदर असतो. ह्याच दोन गोष्टी आत्मविश्वासाच्या बाबतीतही असतात. आपल्या पात्रते बद्दल विश्वास आणि स्वत:चा आदर.
एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणून आपण आपल्या पात्रातेवरच शंका घेऊ लागतो. ती गोष्ट जमत नाही म्हणून काहीच जमणार नाही असा ग्रह करून घेतो. पण ती गोष्ट म्हणजेच सगळ्या गोष्टी नसतात. स्वत:शीच एक प्रयोग करून पहा, आपल्याला जमणाऱ्या गोष्टींची एक यादी करा. असं लक्षात येईल कि, आपल्याला जमणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत. आणि आपल्याला जमतं ते न जमणारे कितीतरी लोक आहेत. लोकांना येतं ते आपल्याला नाही असं म्हणत आपण उगाचंच शोक करत आहोत. स्वत:ची तुलना दुसऱ्यांशी केली कि नेहमीच आपण स्वत:ला स्विकारताना कमी पडतो. म्हणून ती करण्यापेक्षा आहोत तसं स्वत:ला स्विकारावे.मग कुणीही केलेली टीका, उडवलेली खिल्ली आपण सहजपणे स्विकारतो. कारण आपण कोण आहोत, काय करत आहोत हे आपण स्विकारल्यानंतर इतर कुणी ते स्विकारण्याचा किंवा न स्विकारण्याचा प्रश्नच येत नाही.
न जमणाऱ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत ह्याचा विचार करावा. खरंच महत्वाच्या असतील तर शिकण्यासाठी काय करता येईल ते ठरवावं. पोहणं शिकण्यासाठी पाण्यात पडावे लागतेच. मग किनाऱ्यावर बसून पोहणं येत नाही म्हणून झुरण्यात काय अर्थ आहे?
शिकताना नेहमीच परत प्रश्न पडतो, मला हे जमेल का? त्या वेळी स्वत:ला विचारून बघा का नाही जमणार? उत्तर तुमचं तुम्हालाच मिळेल. अंधारात चालताना आपण घाबरतो, पडू कि काय असं वाटतं चालू लागलो कि वाट आपोआपच दिसू लागते, अंदाज येऊ लागतो. पण त्यासाठी अंधारात जाण्याची हिंमत करावी लागते. आणि तोच महत्वाचा क्षण असतो. आत्मविश्वास मिळविण्याचा क्षण असतो.
पण म्हणून वाटेल तिथे धाडस करायचं असं नाही म्हणता येणार. स्वत:च्या क्षमता ओळखून, स्वत:च्या कमतरता ओळखून मगच हा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे पडण्याचे चान्सेस कमी होतात.
एकदा गोष्टी येऊ लागल्या कि आपोआपच स्वत:बद्दलचा आदर वाढतो. मीही कुणीतरी आहे हा विश्वास वाटतो. आणि मग आत्मविश्वास वाढतच जातो. इतर कुठल्याही मेक-अप पेक्षा आत्मविश्वास असलेला चेहरा जास्त खुलून दिसतो.
एकदा आत्मविश्वास मिळवता आला कि तो टिकवण्यासाठी स्वत:शीच रोज काही वेळ बोला. स्वत:ला विश्वास द्या कि तुम्ही खूप काही करू शकता. आणि मग बघा, तुम्ही खरंच खूप काही करून जाल.
"रोशन हुई सारी जमी , रोशन हुआ सारा जहाँ ,
उडने को तू आझाद है, बंधन कोई अब ना रहा
तू धूप है छम से बिखर, तू है नदी ओ बेखबर … "
उडने को तू आझाद है, बंधन कोई अब ना रहा
तू धूप है छम से बिखर, तू है नदी ओ बेखबर … "
Comments
Post a Comment