समोर चिखलाने भरलेला खड्डा असताना त्यांत उडी मारणे. एखाद्या झाडाच्या फांदीवर चढून बसणे. रात्री उशिरापर्यंत चांदण्या पाहणे आणि उंच उडणारा पतंग पाहत तासंतास थांबणे. एखाद्या पतंगाच्या मागे फिरणे. बांधकामाच्या ठिकाणी येऊन पडलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर चढून बसणे. किती मजा ! ह्यावेळी, ऊन, वारा, पाउस कशाचाच त्रास होत नाही. लागणे, खरचटणे ह्या गोष्टीनी मुलांना काही फरक पडत नाही. फरक पडतो, तो मुलांच्या आई-बाबांना. सर्दी-खोकला, ताप ह्याचा नको तेवढा धसका आपण घेतो आणि हे सुंदर क्षण उपभोगताना मुलांच्या आनंदाच्या आड येतो.
हे सगळ्याच बाबतीत घडतं. चित्र काढताना गुलाबी रंगाचा मोर आणि पिवळ्या रंगाचा कावळा काढला तर असं काय बिघडतं? एक डोळा मोठा आणि एक छोटा आला तर नक्की काय होतं? फुलपाखराचे पंख वेगवेगळे रंगवले तर असा काय फरक पडतो? पण नाही, ते तुम्हाला चांगलं दिसत नाही, म्हणून त्यांच्यावर मनावर बिंबवलं जातं. 'अमुक गोष्ट अशी म्हणजे अशीच व्हायला हवी.' आपण मुलाच्या कल्पनांच्या आड येतो.
सिंड्रेलाच्या बहिणी तिच्याशी चांगल्या वागू शकतात,वाईट वागणाऱ्या बहिणीला किंवा आईला परीची आणि राजकुमाराची वाट न पाहता सिंड्रेला स्वत:च वठणीवर आणू शकते, खीर खाणाऱ्या मांजरीला चूक कळू शकते आणि तिचे मित्र तिला माफ करू शकतात. असा विचार मुलं करतात तेव्हा 'गोष्ट अशी नाहीच' असं सांगितलं जातं. मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेला आपल्या तोकड्या बुद्धीचे कुंपण लावले जाते.
मला वाटतं, मुलांच्या विचारांच्या, कल्पनांच्या किंवा आनंदाच्या आड येऊन आपण त्यांचं फार नुकसान करतो. विचार करू देणं, कल्पना रंगवू देणं, आनंद घेऊ देणं म्हणजे मोठं होऊ देणं. आपण पुढची पिढी घडवताना, मुलांना शिकवताना, हुशार बनवताना त्यांच्यातली सृजनशीलता, आनंदी -वृत्ती मारून तर टाकत नाही ना?
Vasudha Deshpande-Korde
Psychologist & Remedial Trainer
Vasudha Deshpande-Korde
Psychologist & Remedial Trainer
Comments
Post a Comment