बरेचदा, आपण कुणाशी तरी बोलत असतो, आणि मागून आपले चिरंजीव किंवा सुकन्या 'आई-आई, हे बघ, असं कर मला हे दे, किंवा असंच काहीसं बोलत असतात. ' आपल्या बोलण्यात disturbance आणत राहतात. बरेचदा, आपण कसल्यातरी महत्त्वाच्या कामात असतो, आणि मुलं असं काहीसं करतात कि, ते महत्त्वाचे काम सोडून आपण मुलांना रागवायला जातो. जावंच लागतं. काहीवेळेस, काहीही कारण नसताना, आरडा-ओरडा, रडारड, चिडचिड किंवा काहीतरी व्रात्यपणा मुलं करतात. ह्या सगळ्या गोष्टीमागे, बरेचदा, लक्ष वेधून घेणे हा हेतू असतो.
'कुणीतरी आपल्याकडे लक्ष देणे,' हि एक मानसिक गरज आहे. 'आपल्याकडे लक्ष द्यावं,' असं न वाटणारा माणूस विरळाच. मुलांसाठी तर त्यांच्याकडे कुणीतरी लक्ष देणं हि गोष्ट खूप सुखावणारी असते. कमी-जास्त प्रमाणात सगळ्याच मुलांची हि गरज असते. काही मुलांना मात्र त्यांच्याकडे सतत लक्ष दिलं जावं असं वाटतं. त्यासाठी मुलं काहीही करतात. हे वागणं स्वत:ला इजा करून घेण्यापर्यंत पोहोचू शकतं.
जेव्हा मुलं लक्ष वेधून घेण्यासाठी मुद्दामहून वेगळी वागतात, तेव्हा त्यामागे दोन कारणे असू शकतात.
१. तुमचं त्यांच्याकडे पुरेसं लक्ष नाही
किंवा
२. तुमचं त्यांच्याकडे खूप जास्त लक्ष आहे.
२. तुमचं त्यांच्याकडे खूप जास्त लक्ष आहे.
पहिल्या प्रकारांत मुलं, लक्ष कोणत्या गोष्टीने वेधलं जातं ह्याचा विचार करतात. आणि मग काहीतरी खोड्या, कुरापती करून मोठ्यांचा ओरडा खातात. त्यावेळी मुलांसाठी 'ओरडणं' हि शिक्षा नसते. त्यांना तुमचं लक्ष देणंच हवं असतं. तुम्ही रागावलात ह्याचा अर्थ त्यांची दखल घेतलीत. मग ज्यागोष्टींमुळे attention मिळतं त्या गोष्टींची पुनरावृत्ती होऊ लागते. मुलं जास्त खोडकर, जास्त रडकी होत जातात.
दुसऱ्या कारणाचा परिणाम म्हणून 'मुलं तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देणं', हा त्यांचा अधिकार समजू लागतात. मग तुम्ही इतर कुणाशी न बोलता त्यांच्याशीच बोलावं. त्यांच्याकडेच लक्ष द्यावं अशी मागणी करू लागतात. तो त्यांच्या सवयीचा एक भाग बनतो. मग' जिथे-तिथे मला महत्व मिळायला हवं', असा दृष्टीकोण तयार होऊ लागतो.
हे दोन्ही प्रकार व्यवस्थित handle करण्याची गरज असते. मुलांची दखल घेतली जाणं आणि त्याचबरोबर त्यांना इतरांची दखल घ्यायला शिकवणं दोन्हीही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण ह्या दोन्ही गोष्टी मुलांचं व्यक्तिमत्त्व घडवणार आहेत. ह्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.
आपण मुलांकडे तीन प्रकारांनी लक्ष देतो
१. चांगल्या गोष्टी केल्यावर कौतुक
२. चुकीच्या गोष्टींसाठी शिक्षा
३. दुर्लक्ष
मुलं जेव्हा तुमच्या इतरांशी बोलण्यात व्यत्यय आणतात, आरडा-ओरडा करतात तेव्हा न चिडता दुर्लक्ष करा. मुलांना स्पष्ट सांगा कि, एवढं बोलून झालं कि मग आपण बोलू. मुलांसाठी special वेळ ठेवा, जेव्हा तुम्ही फक्त मुलांचंच बोलणं ऐकत असाल.
जेव्हा मुलं व्रात्यपणा करतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष देणे टाळा. मुलांच्या चांगल्या वागण्यासाठी मात्र कौतुक करायला विसरू नका. काहीवेळेस शिक्षा अपरिहार्य असते, ह्या गोष्टी कोणत्या, ते तुम्हीच ठरवायला हवं.
Comments
Post a Comment