हुशार, अतिहुशार, मठ्ठ अशा विशेषणांनी नेहमीच आपल्या
बुद्धिमत्तेचा उद्धार केला जातो. सर्वसामान्यपणे परीक्षेत चांगले मार्क्स मिळविणे
म्हणजे बुद्धिमान असणे असा समज आजही रूढ आहे. काहीजण मात्र ह्या परीक्षा पद्धतीतून बाहेर
पडू पाहतात, आणि लक्षात ठेवणे, समजून घेणे म्हणजे बुद्धिमत्ता असे समजतात. वेच्स्लेर ह्या मानसशास्त्रज्ञाच्या मते, बुद्धिमत्ता
म्हणजे तुमची सारासार विचार करण्याची, त्या
नुसार काम करण्याची आणि वातावरणाशी
जुळवून घेण्याची क्षमता. थोडक्यात, फक्त ज्ञान
संपादन करणे किंवा ते ज्ञान जसे च्या तसे पुन्हा म्हणून किंवा लिहून दाखविणे म्हणजेच बुद्धिमत्ता नव्हे. तो बुद्धिमत्तेचा फक्त एक भाग झाला. एखादी
गोष्ट समजून घेणे आणि तिचा वापर करत
परिस्थितीशी जुळवून घेणे किंवा मात करणे
म्हणजे बुद्धीमत्ता.
बुद्धिमत्ता हे
मानवजातीला मिळालेले वरदान. त्याच्या
बळावरच आपण पूर्ण सृष्टीवर राज्य करीत आहोत. माणूस नेमका किती बुद्धिमान आहे? ह्या
कुतूहलापोटी बुद्धिमत्ता मोजण्यासाठी प्रयत्न सुरु
झाले. बीने
हा बुद्धिमापन चाचण्या बनविणारा पहिला शास्त्रज्ञ. नंतर
अशा अनेक चाचण्या बनविल्या गेल्या. ह्या बुद्धिमत्ता चाचण्यांचा गुणांक म्हणजे बुद्ध्यांक, अर्थात
IQ. IQ म्हणजे बुद्धिमत्ता नसून IQ
चाचण्यामध्ये मिळालेले
गुण. माणसाची
बुद्धिमत्ता त्या पेक्षा जास्त अफाट आहे.
मग, बुद्धिमत्ता चाचण्या कशासाठी करायच्या? बुद्धिमत्ता
चाचण्या करायच्या त्या आपल्या बुद्धीचा आवाका लक्षात
घेण्यासाठी.
बुद्धिमत्ता चाचण्या घेतल्यानंतर
एखादी व्यक्ती किती स्पष्ट विचार करू शकते,
संकल्पना कशा प्रकारे
समजून घेऊ शकते, त्या व्यक्तीच्या वयाच्या इतर व्यक्तींच्या तुलनेत चाचणी
घेतलेली व्यक्ती किती पुढे, मागे किंवा बरोबर आहे हे लक्षात येतं. आपल्या
कार्यक्षेत्राची दिशा ठरवता येते.
काहीजणांना प्रश्न पडेल कि, शाळा-college मध्ये
घेतल्या जाणाऱ्या परीक्षा हे काम करत
नाहीत का? शाळा कॉलेजात घेतल्या जाणाऱ्या परीक्षा
ह्या तुमच्या ज्ञानावर आधारित असतात. त्या बुद्धीच्या क्षमतेपेक्षा तुमच्या
लिहिण्या-वाचण्याच्या आणि
व्यक्त होण्याच्या क्षमतेचे एकक असतात. लिहिता-वाचता न येणारी व्यक्तीसुद्धा
बुद्धिमान असू शकते. शालेय
अभ्यासात मागे पडणारी मुलंही हुशार असू शकतात. बुद्धिमत्ता चाचण्या मुलाच्या बुद्धिमत्तेबद्दलचे असे गैरसमज
दूर करण्याचे काम करतात.
करियर निवडताना, अभ्यासातल्या समस्या जाणवत असल्यास
किंवा मुलाच्या बौद्धिक विकासात समस्या जाणवत असल्यास
बुद्धिमापन चाचण्या करून घेणे नेहमीच
श्रेयस्कर ठरते. बुद्ध्यंक हे माणसाच्या फक्त एकाच
क्षमतेचे एकक आहे. माणसाच्या
क्षमता ह्या त्याहीपेक्षा कितीतरी जास्त आहेत. त्यामुळे
यश हे फक्त बुद्ध्यंकावर अवलंबून नाही हेही लक्षात
असू द्यावे.
Comments
Post a Comment