आपल्याकडे बरेचदा, मुलाला म्हातारपणाची काठी समजलं जातं. हल्ली, काही मुलांच्या वागण्यामुळेच, (म्हणजे आई-वडिलांना न सांभाळण्याच्या मुलांच्या निर्णयामुळे) 'मुलापेक्षा मुलगी बरी', असं म्हटलं जातं.
'आई-बाबांच्या उपकाराची परतफेड अशी करतात का?' असं एका आईकडून मी एकदा ऐकलं होतं.
'आई होणं हा job महाकठीण', हे पण एका आईने एकदा सांगितलं होतं.
'माझं त्यांच्याशी कधीच पटलं नाही फक्त मुलाची आबाळ व्हायला नको म्हणून इथे राहिले', पुन्हा एक आई.
'मुलांना स्वत:च्या बाजूने वळवून घेतलं तिने. बाप कसा आहे ते त्यांना कळलचं नाही', एक बाबा.
अशाप्रकारची वाक्यं मी कित्येकदा ऐकते. ह्यांतून आपण मुलांपर्यंत नक्की काय पोहोचवतो? मुलं म्हणजे एक अडचण, मुलं म्हणजे एक हत्यार, मुलं म्हणजे एक आधार. मुलांसाठी केले जाणारे काम म्हणजे त्यांच्यावर केली जाणारी दया किंवा उपकार'. मुलाकडे एक काम, एक हत्यार किंवा एक काठी म्हणून पाहणं आणि त्याच्यासाठी आपण करत असणाऱ्या गोष्टीना आपणच उपकाराचे नाव देणं, ह्यांत आपलं काहीच चुकत नाहीये का ?
मुलं ,'आम्हाला जन्म द्या', असं सांगत तुमच्याकडे आलेली नाहीत. तुम्हाला ती हवी होती म्हणून आलीयेत. त्यांच्यासाठी काही करणं, ह्यांत तुम्हाला जर आनंद वाटत नसेल, तर तुम्ही चुकताय. 'त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम आहे,' असा दावा करतानाच त्यांच्याकडून अपेक्षा करताय.
तुमच्या मुलांवर केलं जाणार प्रेम हा जर तुम्ही व्यवहार बनवलात तर मुलांकडूनसुद्धा तो व्यवहारच होणार. .प्रत्येक गोष्टीचा मोबदला, परतफेड (कोणत्याही स्वरूपांत) तुम्ही मागीतलीत तर मुलंही मागणारच. ह्याचा अर्थ मुलांनी आई वडीलांना सांभाळू नये असा नाही. त्या नात्यांत व्यवहार येऊ नये, एवढंच.
Comments
Post a Comment