त्यांचं प्रेम...आमचा मनस्ताप
'पौगंडावस्थेतील मुला-मुलींच प्रेम' हा आई-बाबांसाठी काळजीचा विषय. मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडलेत हे कळल्यानंतर, 'हे वय आहे का प्रेम करण्याचं?' ह्या वाक्यापासून सुरुवात होते. प्रेमावर मग बंधनं घातली जातात. 'पुन्हा त्याला भेटलीस तर बघ', अशा धमक्या दिल्या जातात. प्रेमात पडण, अफेअर असणं म्हणजे वाया जाणं, असा समज असतो. म्हणूनच मुलांच्या प्रेमात पडण्याने आई-बाबा हवालदिल होतात. आपली मुलगी किंवा आपला मुलगा चुकीच्या माणसाच्या प्रेमात वाहवत जाऊ नये, ह्याची काळजी वाटणं, ती घेणं पालक म्हणून खूप गरजेचं असतं. पण त्रागा हा त्यावर उपाय नाही. मुलांचं प्रेमात पडणं, कुणीतरी आवडणं हा त्यांच्या वाढीच्या टप्प्यातला एक भाग आहे. तो पालक म्हणून आपण स्विकारायला हवा. 'त्याच्यात आहेच काय आवडण्यासारखं?' असा प्रश्न मुलांना विचारण्यापेक्षा 'त्यांना कुणीही कशासाठीही आवडू शकतं', हे लक्षात घ्यायला हवं. आई-बाबांच्या म्हणण्यानुसार अशा नात्यांना अर्थ नसतो. हे अगदी बरोबर असतं. पण ते चार पावसाळे जास्त पाहिल्यामुळे तुम्हाला कळत असतं. त्यांच्या वयांत असताना तुम्हालाही ते कळलेलं नव्...