तारुण्यात प्रवेश करतानाच मृत्यूला जवळ केलं गेल्याच्या बातम्या वाचल्या कि हृदयाचा ठोका चुकतो. आई-बाबा झाल्यानंतर तर माझा मुलगा, मुलगी असं करणार नाही ना, ही काळजी सतावत असते.

अपेक्षा करण्यामागे किंवा सोयी-सुविधा पुरवताना आई-वडील चुकतात असा एक सूर हल्ली सतत कानावर पडत असतो. विशेषत: आईवडील दोघंही कमावणारे असतील तर ते मुलांकडे दुर्लक्षच करणार असंही हल्ली गृहीत धरलं जातं. तसं पाहिलं तर, अगदी खूप busy असणारे आणि भरपूर कमावणारे लोक नेहमीच स्वत:त मश्गुल नसतात, मुलांच्या इच्छा पूर्ण करताना मुलांना शिकवायचं विसरतातच असं नाही. काही ठिकाणी असं होतं म्हणून सगळीकडे असंच होतं असं नाही. किंवा काहीजण स्पर्धेला तोंड देऊ शकत नाहीत म्हणून स्पर्धाच वाईट असंही नाही.

कुठेतरी चुकतंय हे खरंय, पण म्हणून प्रत्येकवेळी कमावत्या आई-वडिलांकडेच बोट दाखवायचं? असं करून आपण मूळ प्रश्नापासून बाजूला जातोय असं मला वाटतं.

मुलं जेंव्हा आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचतात तेव्हा एकाकीपणा फक्त ८% वेळेस कारणीभूत ठरू शकतो. तर आईवडिलांचं किंवा शाळेतील इतर मुलांचं त्रास देणं ७% वेळेस कारणीभूत ठरू शकतं. आत्महत्येच्या निर्णयामागे जास्तीवेळेस नैराश्य कारणीभूत ठरलेलं दिसून येईल. (एप्रिल २०१७ रोजी World Health Day च्या निमित्ताने WHO ने एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार. ) तसेच नातेसंबंधातील तणाव, पैश्यांची कमतरता, चुकीच्या सवयी हि कारणेही आहेतच.

ह्याही पुढे जाऊन एखाद्या व्यक्तीने नैराश्यामध्ये जाण्यासाठी, त्या व्यक्तीची प्रसंगाला तोंड देण्याची पात्रता, विचारांची पद्धत, तसेच अचानक होणारे काही बदल, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू ह्यागोष्टी कारणीभूत असू शकतात. तर अनेकदा सगळं व्यवस्थित असूनही माणूस depression मध्ये जाऊ शकतो. नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. ह्या आजारावर बरेचदा, औषधोपचारांची गरज असते. मुलांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी किंवा वेडेवाकडे पाउल उचलण्यापासून अडविण्यासाठी आईवडील महत्त्वाचा वाटा उचलू शकतात, तसा उचलतातसुद्धा. पण कित्येकदा हे शक्य नसतं. त्यांत दोष कुणाचाच नसतो.

अजूनही विचार केला तर जाणवेल कि, मनात आलेला प्रत्येक विचार हा आईवडिलांनी मनात टाकलेला नसतो. तसं असतं तर आत्महत्या झाल्याच नसत्या. कोणत्या आईवडिलांना असं वाटेल कि, माझ्या मुलाने आत्महत्या करावी?

जेंव्हा काही कारणाने आई-वडिलांचं मुलांकडे लक्ष नसतं, तेव्हा ते स्वत:च कुठल्यातरी विवंचनेतून जात असतात. ते लक्ष देत नाहीत कारण देऊ शकत नाहीत. त्यांना स्वत:लाच मानसिक आधाराची गरज असते. आणि अशा आईबाबांचीसुद्धा पुढे जाणारी, यशस्वी होणारी मुले आहेतच कि. म्हणजे मुलांच्या वाढीमध्ये आईवडील महत्त्वाची भूमिका बजावतात हे खरं असलं तरी फक्त आई-वडीलच मुलांना घडवतात असं म्हणणं चुकीचं आहे. खरंतर ती आपलीआपणच घडत असतात. आईवडील म्हणून आपण मुलांच्या वाढीतला एक महत्त्वाचा घटक असतो, एवढंच.

तरुणांच्या आत्महत्या ही चिंताजनक बाब आहे. त्यामागची इतर कारणेसुद्धा विचारांत घ्यायला हवीत. त्यादृष्टीने जागृती व्हायला हवी.

वसुधा देशपांडे-कोरडे


Comments

Popular posts from this blog