आमची आमच्या बाबांपुढे बोलण्याची हिंमत नव्हती. आजही नाही.  बाबांनी सांगितलेलं आम्ही ऐकलं नाही असं कधी झालंच नाही. आम्हाला ते पटलंय का, हा विचार बाबांनी, आईने किंवा आम्ही स्वत:देखील कधीच केला नाही. "अरे बाबा, कितीबोर  करतोस!" वगैरे उद्गार जर आम्ही काढले असते तर, आमची खैर नव्हती. आम्ही त्यांना नेहमीच दचकून असायचो. ते आले कि शांतता. पुस्तक पुढे, मान खाली. एका वयांत त्यांचा रागही यायचा. मग त्यांना त्यांच्या माघारी,' हिटलर, डॉन' वगैरे म्हटलं जायचं. पण वय वाढेल तसतसं राग आणि भीती दोन्हीही कमी झालं. आदर आणि फारसे न बोलण्याची सवय तेवढी राहिली. कडक वागून त्यांनी आणि आम्ही काय कमावलं?

आम्ही सुतासारखे सरळ राहिलो.मोठ्यांना, गुरुजनांना आदर द्यायला शिकलो.  कुणाशी वाद न घालता निमुटपणे सहन करायला शिकलो. हे सहन करणं काहीवेळेस खूप फायद्याचं ठरलं. विनातक्रार सगळं स्विकारावं लागतंच न कधीतरी, आम्ही ते शिकलो. लाईनीवर राहिलो. रूढ अर्थाने सगळं मिळवलं आम्ही. पण आत्मविश्वास मिळविताना मात्र खूप झगडावं लागलं. स्वत:च्या मनाप्रमाणे वागताना खूप त्रास होतो आजही.  वाटतं, किती चुकीचं वागले ते आम्हाला वाढवताना. आनंद तर घेऊच दिला नाही कधी!

मग आम्हाला मुलं झाली. आम्ही ठरवलं, 'आपण राहिलो तसं धाकात मुलांना ठेवायचं नाही.' आम्ही ठेवलंच नाही. आमचं अहो बाबातून ए बाबांत जाणं किंवा पॉप्स होणं, आईचं आईतून आऊ, मम्मुडी, मम्मा होणं खूप लोभस वाटलं. मुलांचा आत्मविश्वास, स्वत:चं मत मांडणं ह्याचं कौतुक वाटायचं. पण मग हळूहळू धरबंधच राहिला नाही. कधीतरी आमचा इगो आता मुलांकडून ठेचला जाऊ लागला. असं वागून आम्ही काय कमावलं? आमची मुलं आमच्याशी मित्रासारखी वागतात. थोडीशी जास्त आत्मविश्वासात वावरतात. आम्हाला होतं तसं टेंशन त्यांना नाही. कुणाचं तरी ऐकावं लागतं ह्याची जाणीवच नाही. आम्ही सगळं मिळवलं होतं, ते  सगळं आम्हीच त्यांना  दिलं. त्याची त्यांना कदर वाटत नाहीये, हे आता कधीतरी जाणवतं.  वाटतं, मुलांना वाढविताना आमचं  काही चुकलं का?

कोणत्याही गोष्टीचं टोक गाठायला गेलो कि, दुष्परिणाम दिसू लागतात. शिस्त आणि स्वातंत्र्य दोन्हीही सारख्याच प्रमाणांत आवश्यक आहेत. मध्यबिंदू गाठाता येणं गरजेचं आहे. हा मध्यबिंदू गाठायला हवा, हे पटतं. कसा गाठायचा हे मात्र उमगत नाही.हा मध्यबिंदू गाठणं म्हणजेच authoritative parent होणं.  authoritative parent होताना अमुक वेळेस अमुक वागा, इथे शिक्षा करा, इथे गोड बोला असं सांगता येणं कठीण आहे. कधी कसं वागायचं हे ज्याचं त्यानेच ठरवायचं. ते ठरवताना आपला तोल सांभाळता येणं मात्र आवश्यक आहे. तो सांभाळायला शिकलं पाहिजे.

 ह्यासाठी आधी आपण कसे आहोत हे कळायला हवं. आपल्याला पटणाऱ्या, न पटणाऱ्या गोष्टी कोणत्या? का? हा विचार मुलांना वाढविण्यापुर्वी व्हायला हवा. म्हणजे, मुलांनी स्वत:चं मत मांडावे असे मला वाटते पण त्याचबरोबर ते कुणाला दुखावणार नाहीत, ह्याचीही काळजी घ्यायला हवी. किंवा मुलांचे लाड तर पुरवायचे आहेत पण त्यांनी शेफारून जाऊ नये हेही पहायचंय. मग ते लाड पूर्ण करताना मी कोणत्या गोष्टीना हो म्हणणार आहे आणि का,  हे मला माहिती असायला हवं. मुलांनी अमुक एका पद्धतीने का बोलावं,  हे मला सांगता यायला हवं.

थोडक्यात, कोणत्या गोष्टी तुम्हाला  सोडायच्या आहेत किंवा नाहीत आणि का, हे तुमच्या  जीवनमूल्यांवर अवलंबून असणार आहे. ती आपली आपल्याला  माहिती असायला हवीत. मग काही नियम बनवता येतात, त्यांच्यावर ठाम राहता येतं.  नाहीतर, आज एका गोष्टीला 'हो' म्हणणारे वडील उद्या अचानक त्या गोष्टीच्या विरुद्ध मत व्यक्त करू लागतात.  उदाहरणार्थ,  घरी यायला उशीर झाल्यानंतर कधीच काहीच न म्हणणारे बाबा एखाद्या दिवशी अचानकच चिडतात आणि म्हणतात, "जरा, वेळ पाळण्याची शिस्त लावून घे स्वत:ला. काल पण असाच उशिरा आला होतास. उद्या असा उशिरा आलास तर याद राख"  मग मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. गोंधळलेले आई-बाबा असतील तर मुलं insecure व्हायला लागतात.  आईवडिलांच्या मुडचा सतत अंदाज बांधू लागतात. आणि काहीवेळेस कायमचे दुरावतात.  आपण नक्की चांगले आहोत कि वाईट हेच मुलांना कळेनासं होतं.  जेंव्हा नियम स्पष्टपणे आणि सकारण ठरवलेले असतात तेंव्हा  ते स्वत:हुन पाळण्याचा  प्रयत्न केला जातो.  जेंव्हा, आईवडीलही हेच नियम पळतायत हे लक्षात येतं, तेंव्हा ते रुजविण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही. 

स्वत:ची मूल्य ओळखली आणि नियम ठरवल्यानंतर थोडासा सारासार आणि वास्तववादी विचार व्हायला हवा. सारासार विचार करता येणं हे परिपक्वतेचे लक्षण आहे. सारासार आणि वास्तववादी विचारांना सुरुवात झाली कि, नियम कुठे शिथिल होऊ शकतात हे आपल्याला ठरवता येतं. तसंच नियम मोडण्याची शिक्षा किती कडक करायची हे ठरवता येऊ शकतं. इतरांच्या (मुलांच्या) भावना ओळखता येणं सोपं जातं. जशी एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही तशीच एखादी गोष्ट ती मुलांना आवडणार नाही, हे लक्षात येतं.  त्या इच्छेचा आदर केला जातो.  जसं आपण चुकतो, तसेच मुलंही चुकू शकतात. पण चुकीतून पुन्हा शिकूही शकतात, हा विचार पुढे येऊ लागतो आणि मग मुलांना संधी द्यायला सुरुवात होते.

मग संवाद साधताना तो assertive करणं  आवश्यक ठरतं. म्हणजे आपल्याला न पटणारे विचार मुलांपर्यंत पोहोचवायचे पण मुलांचा अपमान न करता. किंवा मुलांचं म्हणणं ऐकायचं पण आपल्या मताला मुरड न घालता. असं झालं कि मारणं, रागावणं किंवा टोचून बोलणं ह्यापेक्षा वेगळे, प्रभावी मार्ग परस्परसंमतीने शोधता येतात. मध्यबिंदू गाठता येतो.

वसुधा देशपांडे-कोरडे.










Comments

Popular posts from this blog