आपली मुलं हुशार असावीत, त्यांनी काहीतरी वेगळं करावं, स्वत:च्या पायांवर उभं रहावं, यशस्वी व्हावं, असं सर्वच आई-बाबांना वाटतं. आयुष्यात यशस्वी व्हायचं तर आत्मविश्वास असणं गरजेचं आहे, ह्याबद्दल दुमत नाहीच. पण त्याच्या जोडीला आत्मसन्मान आणि आत्मभान ह्याचीही तेवढीच गरज असते. आत्मविश्वास म्हणजे, स्वत:वर असणारा विश्वास. मी काहीतरी करू शकतो हा विश्वास. आत्मसन्मान म्हणजे स्वत:चा आदर करणे, स्वत:वर प्रेम करणे; स्वत:ला लय भारी समजणे नव्हे. आत्मभान म्हणजे आपल्या गुणांची तसेच अवगुणांची जाणीव असणे, म्हणजे स्वत:ला ओळखणे. स्वत:ची मतं असणे, आवड असणे. आत्मभान आणि आत्मसन्मान असणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास असतोच असे नाही. तर आत्मविश्वास असणाऱ्यांमध्ये आत्मसन्मान असेलच असेही नाही. आत्मविश्वास, आत्मभान आणि आत्मसन्मान एकमेकांबरोबर असतील तर एक प्रभावी व्यक्तिमत्व घडणार ह्यात शंका नाही.
आपल्या मुलातला आत्मविश्वास जागृत असावा ह्यासाठी प्रयत्न करणारे आई-बाबाही हल्ली जागोजाग दिसतात. निरनिराळी पुस्तके वाचून, निरनिराळ्या गोष्टी शिकवून, स्वत: मधे बदल घडवत मुलांना घडविण्याच्या प्रयत्नात असतात. मुलाचा आत्मविश्वास वाढविण्याचे प्रयत्न अगदी लहान वयातही करता येतात. नव्हे लहानपणापासूनच असे प्रयत्न केले गेले तर एक उत्साही, आनंदी व्यक्तिमत्व घडू शकतं.      
मुलं जेव्हा तान्ही असतात, तेव्हा त्यांना एका सुरक्षित वातावरणाची गरज असते. एका प्रकारे आपल्या वागण्यातून आपण मुलांपर्यंत हे जग रहाण्यायोग्य आहे असा विश्वास पोहोचवत असतो. असा विश्वास देणं ही आत्मविश्वास मिळवून देण्याची पहिली पायरी असते. मुलं हळूहळू मोठी होत जातात आणि स्वतंत्रपणे वावरू लागतात. स्वत: काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू लागतात. हे प्रयत्न आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने फार मोलाचे ठरतात. आई-बाबा म्हणून अशा वेळी काहीसं धीट होण्याची, काळजी बाजूला सारून मुलाला प्रोत्साहन देण्याची गरज असते .
'मुलगा पडेल, त्याला लागेल, अडचणी येतील, आई-बाबा म्हणून त्याची जबाबदारी मी घ्यायला हवी,' असे कितीतरी विचार आई-बाबांच्या मनात असतात. ह्या विचारांमुळेच मुलांना एक रेडीमेड आयुष्य देण्याचा प्रयत्न केला जातो. असा  प्रयत्नच बरेचदा, मुलांच्या आत्मविश्वासाला मारक ठरतो. मुलांना अनुभव घेण्यापासून, जबाबदारी घेण्यापासून अडवताना एका परीने आपण, "तुला जमणार नाही," असा संदेश मुलांपर्यंत पोहोचवत असतो.  ह्या उलट,'चुकलास, पडलास, अडचणी आल्या तरीपण तू निर्णय घे, प्रयत्न कर, जमेल', असा दृष्टीकोण  मुलांचा आत्मविश्वास वाढवणारा ठरतो.
मुलांच्या आत्मविश्वासाला मारक ठरणारी आणखी एक गोष्ट म्हणजे आपली मुलं perfect असावीत हा अट्टहास. आपण जेव्हा मुलांना perfect  बनविण्याचा विचार करतो, तेव्हा perfect  असण्याची व्याख्या आपल्या मनात तयार असते. त्या परिमाणांवर मुलांना उतरविण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळे, मुलांना स्विकारताना आपण कमी पडतो. आई-बाबांनी मुलांना स्विकारलं नाही तर मुलंही स्वत:ला झिडकारू लागतात. आत्मसन्मान जपताना कमी पडू लागतात. 'आत्मसन्मान म्हणजे स्वत:च स्वत:चा आदर करणं'. त्यासाठी आधी स्वत:ला स्विकारलं  पाहिजे. आई-बाबांनी निरपेक्षपणे मुलांना स्विकारलं, की मुलंही स्वत:ला स्वीकारू लागतात. निरपेक्षपणे स्वीकारायचं म्हणजे मुलांवर कोणताही शिक्का मारणे टाळायचं. 'आळशी, बुद्दू , bad boy/girl', अशी विशेषणं लावणं टाळायचं. असं निरपेक्षपणे स्विकारलं जाणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे.
काही जणांना प्रश्न पडेल कि, 'आम्ही मुलांना रागवायचंच नाही का?' - मुलांना रागावणं ही एक न टाळता येणारी गोष्ट आहे. पण रागावणं हे चुकांसाठी आहे हे मुलांना कळू द्या. चूक कशी सुधारता येते आणि एकदा चुकल्याने किंवा वारंवार चुकाल्यानेही आपण नालायक ठरत नाही, हेही त्यांना समजू द्या.  थोडक्यात, त्यांना चुकण्याची मुभा द्या.
आपल्याकडे आई-वडिलांचं सगळं ऐकणारी मुलं  हि नेहमीच 'शहाणी मुलं' समजली जातात. आपली मतं मांडणाऱ्या प्रसंगी आई-वडिलांच्या मतांना विरोध करणाऱ्यांना साधारणपणे उद्धट समजले जाते. आता ही परिस्थिती काही अंशाने बदलतीये, तरीही आई-बाबाचं सगळं ऐकणारी मुलं आणि त्यांचं कौतुक करणारे आई-बाबा आजही दिसतात. मुलांना प्रेमापोटी किंवा धाकापोटी सगळं  ऐकायला लावून आपण त्यांच्या निर्णय क्षमतेला बाधा तर आणत नाही ना,  हा विचार करायला हवा. तसेच, आपले मत मांडणे, आपल्या मताबद्दल आग्रही असणे म्हणजे उद्धट किंवा दुराग्रही असणे नव्हे हेही लक्षात घ्यायला हवे.  त्यामध्ये इतरांना आपल्याएवढंच महत्त्व देण्याचा विचार असायला हवा. इतरांचं मत ऐकून घेण्याचीही मानसिकता असायला हवी.
मुलांचा आत्मविश्वास वाढवायचा तर आई-बाबांनी काही गोष्टीत माघार घ्यायला हवी. मुलाचं आयुष्य मुलांना जगू द्यायला हवं. त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत, त्याचं मत विचारात घ्यावं, त्याची जबाबदारीही  त्यांनाच घेऊ द्यावी. आपलं मूल म्हणजे आपण नाही, ते वेगळं आहे, वेगळेपणा जपण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे, हे एकदा लक्षात घेतलं की, आपोआपच एक सुंदर व्यक्तिमत्व घडायला सुरुवात होते. अडचणींना सामोरे जाण्याची, स्वत:च्या कमतरतांवर मात करण्याची आणि आकाशात उंच झेपावण्याची जिद्द  आपोआपच निर्माण होते . आई-बाबा म्हणून आपल्याला तरी अजून काय हवं असतं ?  

Comments

Popular posts from this blog