"मला माझे आई-बाबा आवडत नाहीत." ती म्हणाली आणि माझ्याच हृदयाचा ठोका चुकला. एव्हाना, हे वाक्य ऐकण्याची सवय व्हायला हवी होती, पण नाही झाली. मुलांकडून जेव्हा हे वाक्य ऐकायला मिळतं तेव्हा खूप वाईट वाटतं. आई-बाबांबद्दल तिरस्कार, राग एवढ्या पुढे गेलेला असतो कि, मुलं आई-बाबांना स्वत:चे शत्रू समजू लागतात. आई-बाबांना ह्याची कल्पना असते. मुलांमध्ये गुंतवणूक असल्यामुळे, मुलांच्या ह्या भावनेचा खूप त्रास त्यांना होतो. आणि मग ह्याला काहीतरी समजवा, असं म्हणत कौन्सेलरकडे धाव घेतली जाते. "आमचं कुठे चुकलं? आम्हाला सांगा." असं म्हणतानाच, मुलांसाठी केलेल्या गोष्टींची उजळणी केली जाते. "जे मागितलं ते सगळं दिलं, त्याच्यासाठी , त्याच्या शाळेसाठी नोकरी सोडली," अशा काही गोष्टी त्यांत असतात. ह्या संदर्भात काही दिवसांपूर्वी एक लेखही लिहिला होता. "मुलांना समजावून घ्या", असा सल्ला पालकांना दिला जातो.   पण, "मुलांना समजावून घ्यायचं म्हणजे काय करायचं? सगळे हट्ट पूर्ण करायचे, म्हणेल तसं वागू द्यायचं कुठेच, कधीच अडवायचं नाही. अशाने कसं होणार? चांगलं-वाईट त्याला कसं कळणार. आम्ही नाही तर कोण सांगणार?" बहुतेक सर्वच पालकांना पडणारे हे प्रश्न. 'मुलांना समजून घ्या.' म्हणजे त्यांना हवं ते करू द्या',असं नाही. 'त्यांचे सगळे  हट्ट पूर्ण करा',असेही नाही. तर एखाद्या वागणुकी मागचे  कारण समजावून घ्या. हट्ट करण्यामागचा उद्देश जाणून घ्या.

प्रत्येक माणसाच्या काही गरजा असतात. मरे ह्या शास्त्रज्ञाने माणसाच्या अशा गरजा त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतात हे दाखवून दिले. ह्या गरजा दडपल्या गेल्या तर कुठल्या न कुठल्या रूपाने त्या डोके वर काढू लागतात. काही मुलांना आई-बाबांनी किंवा इतरांनी आपल्याकडे लक्ष द्यावं असं वाटत असतं. त्याचा परिणाम म्हणून नवीन नवीन गोष्टी मागितल्या जातात. 'लक्ष आकर्षित करणं' हि त्या मुलांची गरज असते. ह्याउलट काही जणांना जुन्याच गोष्टी वर्षानुवर्ष वापरण्यात आनंद मिळतो. 'व्यवस्थितपणा', हि त्यांची गरज असते.  एखाद्याला अडचणींचा सामना करत यश मिळवायचं असतं. यश मिळवणं जिंकणं हि त्या मुलाची गरज असते. तर एखाद्यासाठी मजा करणं जास्त गरजेचं असतं. स्वतंत्रपणे विचार करणं, निर्णय घेणं हि गरज असणाऱ्या मुलांना जेव्हा सगळं आई-बाबांच्या मतानुसार करण्याची वेळ येते, तेव्हा ती मुलं एकतर कोमेजतात किंवा पेटून उठतात. मुलांच्या ह्या गरजा लक्षात घ्यायला हव्यात. त्या आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात हेही लक्षात घ्यावं. आपल्याप्रमाणेच मुलांनी वागावं हि अपेक्षा कुठेतरी थांबवायला हवी. 

प्रत्येक मुलाचा वेगळा स्वभाव असतो.  काही मुलं मुळातच शांत असतात, तर काही मुळातच चंचल असतात. नवीन गोष्टी, नवीन जागा, नवे लोक ह्यांत काहीजण पटकन रमतात, तर काही जणांना वेळ लागतो. काहीजण मुळातच आनंदी असतात, तर काही नाखूष दिसतात. काहीजण छोट्याशा बदलाला सुद्धा प्रतिक्रिया देतात तर काहीजणांना त्याचं काहीच वाटत नाही. काहीजण खूप संवेदनशील असतात तर काही नसतात. काही प्रत्येक मुलाचा स्वभाव मुळातून बदलणं कठीण असतं. आजूबाजूच्या लोकांकडून त्यांना मिळणारी प्रतिक्रियेवरती त्यांचं वागणं अवलंबून असतं. मुलांना स्वीकारायचं म्हणजे त्यांचा हा मुळातच असणारा स्वभाव स्विकारायचा.

मुलाच्या गरजा, मुलाचा स्वभाव ह्या गोष्टी रोजच्या निरीक्षणातून, संवादातून सहज लक्षात येतात. आपल्याला मुलांमधील ज्या गोष्टी त्यांच्यासाठी त्रासदायक आहेत असं वाटतं, त्या मुळातून बदलण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, एखादा मुलगा जर हट्टी असेल तर त्याचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचा स्वभाव बदलण्यापेक्षा तो हट्टीपणा दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जावा.  रागीट मुलांना राग कुठे व्यक्त करायचा आणि कुठे नाही ह्याचं शिक्षण द्यावं. मजेत राहणाऱ्याला लगेच बेजबाबदार ठरविण्यापेक्षा एखाद्या कामातली मजा घ्यायला शिकवावी. थोडक्यात, वागणं बदलावं.

वागणं बदलताना आपला त्रागा मात्र टाळायला हवा. 'काहीही केलं तरी हा बदलतच नाही', असा नकारात्मक दृष्टीकोण टाळायला हवा. आपल्याला आपल्या मुलाला घडवायचं आहे, म्हणजे त्याला आपल्यासारखंच बनवायचं आहे असं नाही. तर त्याच्यातलं वेगळेपण जपण्यासाठी त्याला समर्थ बनवायचं आहे. मुलाकडून होणाऱ्या, झालेल्या चुकांसाठी सुधारण्याची संधी आपण नाही तर दुसरं कोण देणार? पालक विचारतात, "आता आम्ही कितीवेळेस समजवायचं?" मुलाला समजेपर्यंत, पटेपर्यंत समजवायला काय हरकत आहे. संवादाच्या, समजविण्याच्या निरनिराळ्या पद्धती शोधायला हव्यात. त्या शोधताना मुलांच्या स्वभावाचा आणि गरजांचा उपयोग करून घेता येतो.

मुलांच्या स्वभावाबाबत तक्रारी करण्यापेक्षा त्या स्विकारून त्यावर संस्कार करणं हेच तर पालकांचं काम आहे. शेवटी, संस्कार म्हणजे तरी काय, जे मुळातच आहे, ते अधिक चांगल्याप्रकारे विकसित करणं म्हणजे संस्कार. एखादा शिल्पकार जसा दगडात मूर्ती पाहतो आणि मग त्याच्याजवळच्या साधनांनी ती घडवतो, त्यावर संस्कार करतो. तसंच मुळात मुलांमध्ये असणारे गुण, स्वभाव  पाहायला हवेत आणि मग त्यांना आकार द्यायला हवा.

वसुधा देशपांडे-कोरडे
माईंड मास्टर कौन्सेलर्स, प्रा. लि.
९२२५५०५३६९



Comments

Popular posts from this blog