संवाद आपलाच आपल्याशी
सकारात्मक
किंवा नकारात्मक विचार म्हणजे आपण
स्वत:शीच साधलेला संवाद. बरेचदा हा
संवाद आपल्या पुढच्या समस्या सोडवतो तर
बरेचदा आपल्यापुढे नवीन समस्या निर्माण करतो. ह्या संवादाला आपणच दिशा देत असतो, आपल्याही नकळत. आपल्याला
दु:खातून सावरण्यासाठी, अपयश पचवण्यासाठी मदत करतात ते आपले विचार, तर आपल्याला
आवडणाऱ्या गोष्टी करण्यापासून, यशस्वी होण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यापासून
अडवतात तेही आपले विचारच.
उदा. दुसऱ्या दिवशी अवघड पेपर असताना तुमचे मन
तुम्हाला सांगते, 'उद्याचा पेपर जरा अवघड आहे,
पण मी बऱ्यापैकी अभ्यास
केलाय. माझ्या हातात
आताही वेळ आहे. प्रयत्न करून बघायला काय
हरकत आहे?', हे सकारात्मक विचार तुम्हाला प्रयत्न करायला भाग
पाडतात. ह्या उलट, नकारात्मक विचार तुमच्यापुढे असंख्य तक्रारींची मालिकाच घेऊन
उभे असतात. उदा. दुसऱ्या दिवशी अवघड पेपर असताना तुमचे मन
तुम्हाला सांगते, 'बापरे!
कसं होणार? मी
अभ्यास केलाय पण मी केलेलं आलंच नाही
तर?हा विषयच नको होता. माझं चुकलंच विषय निवडताना. आता उद्या पेपर
अवघड गेला, मी नापास झालो/झाले तर?
लोक काय म्हणतील? बाबा काय म्हणतील? नकोच पेपर द्यायला.'
स्वत:शी हा संवाद साधताना, प्रत्येक विचाराबरोबर
आपण अधिकाधिक घाबरतो. त्या विषयाला जास्त अवघड करतो आणि हातात
असणारा वेळ घालवतो.
नकारात्मक
विचार मनात येण्यासाठी कोणतेही कारण पुरते. बसला गर्दी होती, बॉस उगाचच ओरडला, माझ्याकडून नकळत चुकले,
भाजी आवडली नाही, मी परीक्षेत नापास होईन,
पेपर अवघड गेला, कमी मार्क्स मिळाले, जवळच्या माणसाशी भांडण ह्यांपैकी कोणतीही
गोष्ट नकारात्मक विचार डोक्यात येण्यासाठी पुरेशी आहे.
जेंव्हा
स्वत:शी होणारा संवाद नकारात्मक असतो
तेव्हा, त्याला आपल्या काही ठाम
अवास्तव समजुती कारणीभूत असतात. आपण आपल्या सुखाच्या काही
अवास्तव कल्पना मनाशी बाळगलेल्या असतात,
जसं ९०% मार्क्स, दहावी किंवा
बारावीतले घवघवीत यश, हव्या त्या विद्यालयात प्रवेश,
एखाद्या व्यक्तीचे प्रेम, कामातील चोखपणा,इ. आणि त्या पूर्ण झाल्या तरच मी सुखात राहू शकेन अशी
स्वत:ची समजूत करून घेतलेली असते.
आपल्या मनाची हि समजूतच आपल्या सुखाच्या आड येते. परिस्थिती आपल्या
हातात नाही, हि गोष्ट जास्त
बोचणारी असते. आपल्याला
त्रास देणारी दुसरी गोष्ट असते ती म्हणजे,
'हे माझ्याच बाबतीत का?' हा प्रश्न. हा प्रश्न
आपल्याला आपल्या समोरच्या इतर अनेक प्रश्नांपासून आणि त्यांच्या उत्तरापासून दूर नेतो.
नकारात्मक विचार मनात येतात तेंव्हा आपण नेहमीच स्वत:ला त्रास करून घेत
असतो. आपल्या विचारांचं कारण दुसऱ्यांच्या आचरणात, परिस्थितीत शोधू
लागतो. हि परिस्थिती बदलली तर मी सकारात्मक/सुखी होईन
असं स्वत:ला सांगत राहतो.
थोडक्यात,
पाय पोळतात म्हणून आपल्या पायांत चप्पल
घालायची सोडून पृथ्वीवर चामडे
अंथरता येत नाही म्हणून कुरकुरतो. खरंतर, त्यातून बाहेर
पडण्याचे उत्तर आपल्याच जवळ असते. ते म्हणजे , आपला
स्वत:शी चालणारा संवाद सकारात्मक
करणे.
स्वत:शी नकारात्मक संवाद साधणाऱ्या व्यक्तीला वेळीच सावरायला
हवं. स्वत:शी चालणारा संवाद सकरात्मक करण्यासाठी सर्वप्रथम परिस्थिती आहे तशी स्विकारावी. आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांचा
आणि जवळ असणाऱ्या साधनांचा विचार करावा. सद्य परिस्थितीत आपण काय करू
शकतो ह्याचा विचार करावा. आणि कामाला लागावे. सुखी होण्यासाठी परिस्थिती
बदलण्याची गरज नसते तर, परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलण्याची गरज असते.
वसुधा
देशपांडे-कोरडे
क्लिनिकल
साइकॉलजिस्ट,
Mind master
Counsellors, PVT. LTD.
(९२२५५०५३६९)
Comments
Post a Comment