प्रेमाचा ओवरडोस
मुलाला शिकविण्यासाठी त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं गरजेचं असतं. पण बरेचदा ह्या प्रेमाचा, मुलाबद्दलच्या काळजीचा अतिरेक होऊ लागतो. आपल्या मुलाला हवं ते सगळं देणे, त्याच्यापुढच्या अडचणी दूर करणे, त्याला हर तऱ्हेने जपणे, ह्या गोष्टी हल्ली बरेच पालक करताना दिसतात. मुलगा कुठे जातो, काय करतो ह्यावर त्यांची बारीक नजर असते. मुलांच्या सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न असतो. मुलाचे शाळेत भांडण झाले कि आई-वडील ते मिटविण्यासाठी पुढे सरसावतात. मुलाची वही अपूर्ण असेल तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी आई-वडील घेतात, शाळेत त्याला कुणी ओरडलं कि त्याचं रक्षण करायला आई-वडील तयार असतात. आपल्या मुलाला सर्वोत्तम सगळं द्यायचं ह्या विचाराने त्यांना पछाडलेलं असतं. कित्येकदा तर आई-वडील मुलाचा resume सुद्धा बनवून देतात. मुलांच्या यशापयशाची जबाबदारी आई-वडिलांनीच घेतलेली असते. ह्यामागे मुलावरती असणारं प्रेम एवढाच उद्देश असतो. 'माझ्या मुलाचं कसं होणार?' हि काळजी त्यांना सतावत असते. त्यावर उत्तर म्हणून मुलाच्या सतत मागे राहणे हा पर्याय त्यांनी निवडलेला असतो. त्यांच्या प्रेमाचा ओवरडोस कधी होतो, हे त्यांना कळतंच नाही.
आई-बाबांच्या सतत पाठीशी राहण्याने होतं काय कि लढण्याची, काहीतरी मिळविण्याची इच्छाच नाहीशी होऊ लागते. आपल्याला जमत नाही म्हणूनच आई सगळं करते असे वाटून स्वत:वरचा विश्वास कमी होऊ लागतो. सगळं आपोआप मिळायला हवं अशी मानसिकता तयार होते. आपल्या विरोधात जाणाऱ्या परिस्थितीशी लढा देणं किंवा सहन करणं हे दोन्हीही जमत नाही तेंव्हा तणाव वाढतो आणि नोकरी किंवा धंदा करणं, टिकवणं अवघड होऊन बसतं. परिस्थितीशी जुळवून घेता येत नाहीये, हे लक्षात आल्यानंतर आत्मविश्वास कमी होऊ लागतो.
अतिप्रेम आणि अतिशिस्त ह्या दोन्ही प्रकारांमध्ये एक गोष्ट सारखी असते. ती म्हणजे, 'मुलांना स्वत:चे विचार आहेत ', हि गोष्ट नाकारणे. मुलांना स्वत:चं आयुष्य ठरविण्याची मुभा न देणं. मुलांना हाडामांसाच्या जिवंत माणसाप्रमाणे वागू न देणं. त्यामुळे ह्या दोन्हीही प्रकारांत मुलं कोमेजतात.
घरातच बुलबुल पक्षाने घरटे केले होते. काही दिवसांनी अंडी घातली. पिल्लं जन्माला आली. पिलांचे आई-बाबा त्यांची काळजी घेऊ लागले. त्यांना एकेक दाणा भरवू लागले. त्यांचं रक्षण करायला लागले. काही दिवसांतच पिल्लांना उडणं शिकविण्याची वेळ आली. हळूहळू आई-बाबांनी घरट्याकडे येणं कमी केलं. पिलांना जास्तीतजास्त मोकळं सोडलं गेलं. हळूहळू पिल्लं उडायला शिकली.
परिस्थितीशी जुळवून घेणं शिकविण्यासाठी मुलांना थोडंसं मोकळं सोडण्याची गरज असते. जरा अडखळू देण्याची गरज असते. ह्याची सुरुवात अगदी लहान वयात होते. लहानपणापासूनच थोडे थोडे नकार पचवायला मुलांना शिकवायला हवं. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पालकांनी लक्ष देणं टाळायला हवं. पक्षी जेंव्हा पिलांना उडायला शिकवतात तेंव्हा काही काळ त्या पिलांना एकटे सोडू लागतात. त्यातूनच पिल्लं स्वत:ला सावरायला शिकतात. आपल्या पिल्लाला उडायला शिकवायचं असेल तर थोडं मोकळं सोडायलाच हवं. त्याला आयुष्यात अनेक नकारात्मक गोष्टी झेलायच्या आहेत आणि त्यातून त्याने सहीसलामत स्वत:च्या बळावर सुटायला हवे असे जर वाटत असेल तर आपल्या प्रेमाचा डोस जरा कमी द्यायला हवा. पिलांना उडायला शिकवायचं तर थोडीशी कळ सोसायला हवी. त्यांनाही सोसू द्यायला हवी.
वसुधा देशपांडे -कोरडे
माईंड मास्टर कौन्सेलर्स, प्रा. लि.
९२२५५०५३६९
Comments
Post a Comment