सकारात्मक किंवा नकारात्मक विचार आणि त्यांचे  आपल्या वागण्यावर होणारे परिणाम  आपण मागील लेखात पहिले.  स्वत:शी नकारात्मक संवाद साधणाऱ्या लोकांना वेळीच अडवायला हवं हेही आपण पहिले.  एखादा माणूस स्वत:शी नकारात्मक संवाद साधतोय हे कसं ओळखायचं?

१. माणूस जेंव्हा स्वत:शी नकारात्मक पद्धतीने बोलत असतो, तेंव्हा तो स्वत:च्या चुकांवर  आणि कमतरतेवर जास्त लक्ष देतो.  न येणाऱ्या गोष्टी त्याला पटकन सांगता येतात.
२. नकारात्मक विचार करणारा माणूस थोड्याश्या अपयशाने लगेचच खचतो. थोडेसे ओरडलेलेसुद्धा मनाला लागते.
३. कोणत्याही कारणासाठी स्वत:ला दोष द्यायला सुरुवात करतो.
४. हे नेहमीच असंच होतं. माझ्या बाबतीत नेहमी वाईटच घडतं असा विचार करू लागतो.

तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती जेंव्हा अशाप्रकारे विचार करतात तेंव्हा त्यांना सावरण्यासाठी. त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या. बरेचदा बोलणे ऐकण्यापूर्वीच प्रतिक्रिया दिली जाते. त्यामुळे बोलणंच थांबतं.  प्रतिक्रिया दिली नाही आणि लक्षपूर्वक ऐकून घेतलं तर मात्र भावनांना मोकळी वाट करून दिली जाते.

ह्यानंतरची पायरी असते ती म्हणजे त्या व्यक्तीच्या समस्येची  त्या व्यक्तीलाच जाणीव करून देणे.  समोरचा प्रश्न फक्त नकारात्मक विचारांमुळे आहे, हे समजावणे.  हे एकदा समजले, कि, दुसरी बाजू पटवून सांगणे सोपे जाते.

अपयश मिळणं हि एक सर्वसामान्य गोष्ट आहे हे एकदा मान्य केलं कि ते पचविण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जातात.

सकारात्मक विचार करण्याची सवय अगदी लहानपणापसून लावता येते.  तुम्ही मुलांशी जसं बोलता तसंच ती स्वत:शी बोलत असतात. तोच त्यांच्या आतला आवाज ठरतो. मग तुम्ही जर त्याला सतत 'बावळट, वेंधळा, कमकुवत समजत असाल तर मुलंही स्वत:ला तसंच समजू लागतात. प्रत्येक ठिकाणी मुलांचे दोष काढले गेले कि मुलंही 'आपणच कसे दोषी आहोत' हे स्वत:ला सांगू लागतात. स्वत:च्या चुकांवर लक्ष देऊ लागतात.  ह्याउलट मुलांच्या गुणांसाठी त्यांचं वेळोवेळी कौतुक झालं तर मुलं स्वत:चे गुण ओळखायला लागतील.

अपयशावर घरातून काय प्रतिक्रिया येते, ह्यावर अपयश कसं स्वीकारायचं हे ठरत असतं. एखाद्या गोष्टीला घरातून किती महत्त्व  दिलं जातं, ह्यावरून आपण किती महत्त्व द्यायचं हे मुलं ठरवतात. तेंव्हा आपल्या मुलाने जिंकायलाच हवं हा अट्टहास आई-बाबांनी आधी सोडायला हवा.




Comments

Popular posts from this blog