आहे हुशार तरी...

आहे हुशार तरी...

बरेचदा, असं होतं कि, मुलं हुशार आहेत हे लक्षात येत असतं. त्यांचे विचार, वागणं प्रगल्भ असतं. पण जेव्हा परीक्षा, अभ्यास अशा गोष्टी समोर येतात तेव्हा तिथे मुलं मागे पडतात. आई-वडील, शिक्षक ह्यांना वाटत असतं, "हा/हि अजून करू शकते. खूप पुढे जाऊ शकते. "  आई-वडिलांचा जीव ह्यांच्यासाठी तीळ-तीळ तुटत असतो, पण  मुलं मात्र ते ऐकायला तयार नसतात.  जणू काही त्यांना यश नकोच असतं. 

हया हुशार मुलांना नेमकं काय होतं?  जेव्हा अशा मुलांचा अभ्यास करण्यात आला तेव्हा लक्षात आलं कि, ह्याच्यामागे अनेक गोष्टी दडलेल्या असतात. 

१) स्व-प्रतिमा- आपल्या नजरेतली आपलीच प्रतिमा. अभ्यासाबाबत अशी प्रतिमा तयार करण्याचं काम शिक्षक आणि पालक करत असतात. काही मुलं नेहमीच खोडकर, व्रात्य, बडबडी ह्या गटांमध्ये टाकली जातात. त्यांना आपण तसंच लेबल लावून टाकतो.  ती पण स्वत:कडे तशीच पाहू लागतात.  क्षमतेपेक्षा कमी यश मिळवू लागतात. 

आईवडील, शिक्षक जेव्हा perfectionist असतात तेव्हा नकारात्मक स्व-प्रतिमा तयार होऊ लागते. मला अमुक-अमुक आईसारखं/ बाबासारखे जमत नाही मग करायलाच नको, हा दृष्टीकोन तयार होऊ लागतो. 
 शाळेतलं वातावरण जेव्हा अतिशय कडक असतं तेव्हाही ह्या गोष्टी होऊ शकतात. 

२) अपयशाची भीती- अपयशाची भीती वाटणे, हि गोष्ट खूप सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. जो विषय, जमत नाही त्यांत प्रयत्न करावेसे वाटतच नाहीत कारण, हरायचं नसतं. जे जमतं तेच केलं जातं त्यामुळे यश मिळविण्यासाठीचे प्रयत्न कुठेतरी कमी पडतात. 'पण यशस्वीच व्हायला हवं', हा विचार यशापासून लांब घेऊन जातो.  

३) स्व- प्रतिमा आणि अपयशाची भीती सेल्फ efficacy वर परिणाम करतात. सेल्फ-efficacy म्हणजे  मला जमू शकतं. मी करू शकतो/ शकते हा विश्वास.  हा विश्वास जेवढा कमी तेवढी प्रयत्न करण्याची जिद्द कमी. मग बरेचदा मुलं प्रयत्न करायलाच नकार देतात.  

underachievers मुलांच्यात जाणवणारी अजून एक गोष्ट म्हणजे हि मुलं primary शाळेमध्ये हुशार असणारी मुलं असतात. त्यांना फारसा अभ्यास करावाच लागलेला नसतो किंवा तो आई-वडीलच घेत असतात. अभ्यास वाढतो तसा मुलं वेळ manage करणे, एका जागेवर बसणे, स्वत: समजून घेणे, अभ्यासाचं महत्त्व ओळखणे ह्या बाबींमध्ये कमी पडतात. अभ्यासाला कंटाळू लागतात. 

underachievement च्या मागे बरेचदा, लर्निंग डीसबिलीटी, ADHD सुद्धा असू शकते. त्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेणे कधीही योग्य ठरते. अत्यंत हुशार (genius) मुलं बरेचदा अभ्यासाचा कंटाळा करताना दिसतात कारण, अभ्यास त्यांच्या क्षमतेच्या मानाने खूपच सोपा असतो, म्हणून त्यांना तो बोर होतो. तसंच अभ्यास खूप अवघड जात असेल तरीही होऊ शकतं. 

मुलं जेव्हा अभ्यासात मागे पडतात तेव्हा आईवडिलांकडून खूप त्रागा होतो. कारण त्याची क्षमता आपल्याला दिसत असते. हा त्रागा म्हणजे आपलं प्रेमच असतं ह्यांत वाद नाही. पण उगाच चिडण्यापेक्षा, मागे पडण्याची कारणे शोधून उपाय करणं जास्त फायद्याचं ठरू शकतं. 

Vasudha Deshpande-Korde










Comments

Popular posts from this blog