नाच गं घुमा..

कशी मी नाचू?
ह्या गावचा, त्या गावचा सोनार नाही आला,
बांगड्या नाही मला, नाचू मी कशी?

काही दिवसांपूर्वी एका मुलीला भेटले होते. तिने सांगितलं, "माझी स्वप्नं खूप मोठी आहेत. पण परिस्थिती अशी आहे कि, मी ती पूर्ण कधीच करू शकणार नाही."

तिला विचारलं, "असं काय गं झालंय?"
तेंव्हा तिने उत्तर दिलं, "आईला सांगितलं, मला मैत्रिणीने लावलाय तो क्लास लाव, तर आई म्हणते, 'नाही'.. बाबांना सांगितलं मला अभ्यासासाठी ते पुस्तक आणून द्या. ते म्हणतात, 'आज आणू, उद्या आणू.' पण आणतच नाहीत. पाहिजे तो क्लास नाही, पाहिजे ते पुस्तक नाही. मग कशी माझी स्वप्न पूर्ण कशी होणार?"

पराभवाची कारणे, परिस्थितीत शोधण्याची सवय आपल्यापैकी अनेकांना असते. तक्रारीसाठी अनेक गोष्टी सापडतात. 'नाचू मी कशी?' हा प्रश्न विचारत बसतात.

त्या मुलीला विचारलं, 'जगात फक्त त्याच क्लासमधली मुलं पुढे जातात का? आणि जगात फक्त तेवढे एकच पुस्तक आहे का?'

तेंव्हा, 'नाही', म्हणाली. म्हटलं, "मग? योग्य काय आहे? काही नाही म्हणून हातावर हात ठेवून बसणे कि, जे आहे त्यासह काम करणे?"

असेल त्या साधनांसह नाचायला धैर्य लागतं.
एकदा नाचायला सुरुवात केली कि, लक्षात येतं नाचण्यासाठी खरोखर जे हवं होतं ते आपल्याजवळच होतं..



Comments

Popular posts from this blog