माझ्या मुलीला चित्र काढायला, रंगवायला, रंगांशी खेळायला खूप आवडतं.
जेंव्हा जेंव्हा मी तिला drawing class लावला तेव्हा तेंव्ह मला एक गोष्ट जाणवली. सुरुवातीला एक चित्र काढून देतात मग गिरवायला लावतात. नंतर एखादे चित्र समोर ठेवतात आणि अगदी जशास तस्से काढायला लावतात.

अशीच काहीशी गोष्ट मला शाळांमध्ये निबंधलेखना बाबत जाणवली.  परीक्षेला जो निबंध येणार असेल तो वर्गात लिहून देतात. मुलांनी तो पाठ करायचा आणि जाऊन लिहायचा. अचूक, जशास तसे लिहिणाऱ्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात.

दोन्ही गोष्टींमध्ये मला जाणवतं कि expression ला वावच नाही. आपल्याला काय वाटतं हे सांगायचंच नाही. निमुटपणे फक्त ऐकायचं. आज्ञाधारक व्हायचं. नियम पाळायचे, शिस्तीत राहायचं.

लहान होते  तेंव्हा मी एक अत्यंत आज्ञाधारक मुलगी होते. घरी आणि शाळेत माझं नेहमी ह्या गुणासाठी कौतुक होत असे. जसजशी मोठी होत गेले मला कळू लागलं, आज्ञाधारक असण्यापेक्षा निर्णयक्षम असणं जास्त गरजेचं आहे.

मला शिक्षा झाली कि, मी मुळूमुळू रडायचे. ती होऊ नये ह्या प्रयत्नात असायचे. आपल्याकडे ह्यालाच शहाणी मुलगी म्हटलं जातं ना? नंतर कळलं बंडखोरी करावीच  लागते. भांडावं लागतं, शिक्षा झाली तरी निगरगट्ट व्हावं लागतं.  पण हे मला स्वत:चं स्वत:लाच शिकावं लागलं.माझं शहाणपण जगात काहीच कामाचं नव्हतं.  मी अजूनही हे शिकतेय. काही मुलं हे शाळेतच शिकली पण ती 'शहाणी मुलं' समजली जात नव्हती.

आजही मुलं जेंव्हा सगळं ऐकणारी,  चुका न करता जशास तसे लिहिणारी, शांत बसणारी, प्रश्न न विचारणारी
असतात तेंव्हा खूप कौतुक होतं. बडबड करणाऱ्या, स्वत:चं डोकं चालविणाऱ्या, खोड्या करणाऱ्या, शिक्षकांनी किंवा पालकांनी सांगितलेलं न ऐकता स्वत:चं काहीतरी वेगळंच डोक्यात असणाऱ्या मुलांना नेहमी शिक्षा, ओरडा ह्या गोष्टीना सामोरे जावं लागतं. त्यांना सवय लावली जाते, स्वत:चं तोंड बंद करण्याची. डोकंच न चालविण्याची, प्रश्नच न विचारण्याची.

शाळेसाठीचे नियम जेंव्हा बनवले जातात तेंव्हा मुलं नकळत अजून एक गोष्ट शिकतात कि आजूबाजूला कुणी authority असणारी व्यक्ती असेल तर नियम पाळायचे किंवा तरच पाळायचे. कारण नियम शिक्षा चुकविण्यासाठी पाळायचे असंच शिक्षण दिलं जातं. त्यांतून आपला काही फायदा आहे, असं वाटतंच नाही. सिग्नलला पोलीस नसेल किंवा पोलीस पकडण्याची शक्यता नसेल तेंव्हा कितीतरी लोक सिग्नल तोडून जातात. हा शिक्षणाचाच परिणाम नाही का?

शाळा संपल्यावर नियम पाळणारे, शिस्तीत राहणारे लोक खूप कमी दिसतील पण डोकं न चालविणारे, प्रश्न न विचारणारे, आजूबाजूला लक्षच न देता फक्त स्वत:चं कामच पाहणारे अनेक भेटतात. मला वाटतं शिक्षणामुळे नेमकं ह्याच्या उलट व्हायला हवं.


Comments

Popular posts from this blog