आईच्या निरपेक्ष प्रेमातून, सगळं करून पाहण्यातून, स्वावलंबनातून शिकणाऱ्या मुलाचं जग पाचव्या-सहाव्या वर्षापासून विस्तारू लागतं .आता त्यांत शाळा, शाळेतल्या टीचर्स, मित्र-मैत्रिणी ह्यांची तसेच लिहिणे, वाचणे, गणित सोडवणे ह्यांची भर पडते. म्हणजे मुलांना वाचलेलं समजणं, गणितातल्या संकल्पना समजणे ह्या गोष्टी होऊ लागतात. आई-बाबांचं मत, शाळेतल्या शिक्षकांचं मत, मित्र-मैत्रीणीचं आपल्याबद्दलचं मत ह्यांतून स्वत: बद्दलचं स्वत:चं मत आकाराला येऊ लागतं.
ह्या वयांत आपण मुलांना लेबल देऊ लागतो. 'हुशार' किंवा 'खोडकर', 'बडबड्या' अशी अनेक नावे देतो त्याचबरोबर त्यांच्या मनावर 'ते चांगले आहेत किंवा नाही' हेही ठसवतो. जो त्यांच्या स्वत:बद्दलच्या मताचा एक भाग बनतो.
हळूहळू मुलांसाठी 'मित्र' सर्वस्व होतात. आता मित्रांचं appreciation मिळवणंही महत्त्वाचं असतं. आई-बाबा म्हणून आपल्याला हे स्वीकारणं काहीवेळेस अवघड जातं. आणि काही बंधनं आपण टाकतो. आपल्या बरोबरीची चार मुलं सायकल वर शाळेत जातात पण आपल्याला आपली आई पाठवत नाही, हि गोष्ट आत्ता फक्त जाणवतच नाही तर त्रासही देऊ लागते. मुलांना जेंव्हा अशा काही गोष्टींसाठी अडवलं जातं. मित्रांकडून हिणवलं जातं तेंव्हा त्याचा खूप दूरगामी परिणाम मुलांवर होतो. मित्र असणं, मित्रांच्या सोबत वेळ घालवणं, खेळणं हे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने खूप आवश्यक असतं.
ह्या वयांत पूर्णवेळ शाळा सुरु होते. शाळेबरोबर परीक्षा, अभ्यास ह्या गोष्टीही सुरु होतात. एवढे दिवस मुलाचं कौतुक करणारे आपण अभ्यासात मुलं मागे पडू लागली कि पेटून उठतो. मग tuition, classes ह्यांत मुलांना अडकवून टाकतो. एक मानसिकता आपण तयार करतो कि, अभ्यासात हुशार तोच खरा हुशार. त्या मार्कांपायी मुलांच्या इतर कलागुणांना दुय्यम लेखू लागतो. काही 'ढ', 'गोळे' तयार करतो. त्यातल्या कित्येकांना आयुष्यभर आपण 'हुशार' आहोत हे समजतच नाही. एखादा मुलगा मार्क्स मिळवत नसेल पण कलाकार असेल. कलाकार असणाऱ्या ह्या मुलाला नेहमी सांगितलं जातं, 'गणितात पैकीच्या पैकी मार्क्स आण, मग देईन तुला रंग आणून.' त्याचा कलाकार म्हणून स्वीकार करतंच नाही आपण.मुलांतलं वेगळेपण ह्या वयांत हेरायला हवं. ह्या वयांत आई-बाबा म्हणून आपण open राहण्याची गरज असते. . सगळी मुलं सारखी नसतात हे लक्षात ठेवण्याची गरज असते. 'मला अभ्यास जमत नसला तरी दुसरं काहीतरी जमतं, मी मठ्ठ नाही', हे ह्या वयात मुलांना कळणं खूप गरजेचं आहे.
'मी मठ्ठ आहे' हे मनात ठसणे जेवढं चुकीचं तेवढंच 'मी खूप हुशार आहे,' हे मनात ठसणेही चुकीचेच. ह्यादोन्हीच्या मध्ये एक balance साधला गेला पाहिजे. 'मी प्रयत्न करून काही गोष्टी करू शकेन', हे कळणं, हे ठसवणं गरजेचं आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ह्या काळांत स्वत:चं स्वत: बद्दलचं मत आकारला येतं, हे जेवढं सकारात्मक असेल तेवढा आत्मविश्वास वाढतो. पण स्वत: बद्दल असणारं नकारात्मक मत मुलांना सतत कमतरतेची भावना देत राहतं.
मग मुलांना नेहमी ते ग्रेट आहेत असंच सांगायचं का?
नाही, मुलांना हे सांगायचं कि, 'एका यशामुळे ते ग्रेट होणार नाहीत तसंच कोणत्याही एका अपयशामुळे ते नालायक ठरणार नाहीत.' कधीतरी नकार मिळतो, कधीतरी अपयश पचवावं लागतं हे मुलांना सांगायला हवं.
वय ६ ते ११ किंवा १२ ह्या वयांत मुलांना समज येऊ लागते. तुमचं म्हणणं त्यांना समजू लागतं.ह्या वयांत आपल्याला मुलांना खूप काही शिकवता येतं. निरीक्षणातून, प्रयोगातून, खेळण्यातून तसेच गोष्टींमधुनही मुलं शिकतात. सामाजिक जाणीव जागी करणं, सारासार विचार करणं ह्या गोष्टी आपण विकसित करू शकतो. मुलाच्या व्यक्तिमत्त्वाला मुल्यांचा आधार देणं ह्या काळांत करता येतं. तिथून पुढे (१३ व पुढे) मुलांची स्वत:ची जगाबद्दलची मते आकाराला येणार असतात. मुलं मोठी होणार असतात. ६- ११-१२ ह्या काळांत होणारा त्यांचा बौद्धिक आणि सामाजिक विकास त्यांचा जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा आधार ठरतो.
#givethemwingstofly
.
Comments
Post a Comment