शिक्षण, शाळा तिथला गलथान कारभार, शिक्षणाच्या नावाखाली होणारी पालकांची आणि विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक हा आमच्यासारख्या (साधारण ३०-४५ वयोगटातल्या) पालकांचा जिव्हाळ्याचा विषय. कुठेही ह्या वयोगटातल्या चार बायका जमल्या कि, शाळेचा त्रास आणि शिक्षकांची निंदा ह्या विषयांवर गप्पा रंगतातच. ह्या गप्पांसाठी तुमची आणि दुसऱ्या बाईची फार ओळख असावी लागतेच असे नाही. मी तर हल्ली अनोळखी बायकांशी संवाद साधायला सुरुवात करण्यासाठी हाच विषय निवडते. ह्यांतून शाळेत चुकीचं कसं शिकवलं जातं, प्रोजेक्ट्स आई-वडिलांना कसे तापदायक आहेत, मुलांना काहीच कसं येत नाही वगैरे गोष्टींवर बऱ्यापैकी प्रकाश पडतो. माझ्या कार्यक्षेत्रामुळे माझा पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी नेहमी संवाद होतो. ह्या सगळ्या गोष्टींतून मला हल्लीच्या मुलांबाबत काही गोष्टी जाणवल्या, त्या अशा-
१) बहुसंख्य मुलांना कोणत्याही गोष्टीसाठी कसलीही (शारीरिक अथवा बौद्धिक) मेहनत घेणे नको असते.
म्हणजे, मुलाला football खेळायला आवडत असते. तो खूप चांगला खेळत असतो. जेंव्हा त्यांना काही कारणाने त्यांना त्यामध्ये अडचणी येऊ लागतात तेंव्हा त्या अडचणींवर मार्ग शोधण्यापेक्षा सोडून देणे त्यांना जास्त सोयीचे वाटते.
२) जेंव्हा एखादी गोष्ट वाचल्यावर किंवा ऐकल्यावर तुमच्या भाषेत सांगा, असं सांगितलं जातं, तेंव्हा मुलं गडबडतात.
३)कोणत्याही विषयांवर प्रश्न पडणे, विचारणे, उत्तरे शोधणे ह्या पेक्षा जे सांगितले आहे ते जशाला तसे लिहिणे, करणे जास्त महत्त्वाचे समजले जाते. मी काही १३-१४ वर्षांच्या मुलांना, एक विज्ञानाचा परिच्छेद वाचून त्यावर त्यांना काय प्रश्न पडतात असे विचारले, तेंव्हा 'मला काही प्रश्नच पडलेले नाहीत', असे उत्तर जवळपास निम्म्या मुलांकडून मिळाले. ज्या मुलानी प्रश्न काढले ते बरेचसे धड्याखालचेच प्रश्न होते.
४) एका वर्षी एखादी गोष्ट शिकून झाली आणि त्यावर दुसऱ्या वर्षी प्रश्न विचारले तर मुलांना उत्तरे देता येत नाहीत. ह्यांत गणितातल्या बेसिक गोष्टी सुद्धा येतात. इतिहास-भूगोल हे विसरण्याच्या कॅटेगरीतलेच विषय आहेत. आता खालील उदाहरण बघा-
यंदा ९ वीला जाणाऱ्या आणि साधारण ५०-६०% मिळविणाऱ्या मुलाला मी गणित विचारलं, " ५० भागिले १० किती? " आधी तर तो म्हणाला, "काय? परत विचारा?" मग परत तोच प्रश्न विचारला. आता त्याने पेन्सिलीने कागदावर लिहून घेतले. लिहिताना, त्याने  १० भागिले ५० असे लिहिले. मग मी त्याला ते कसं लिहायचं हे सांगितलं आणि म्हटलं, "सोडव. " आता गणित सोडवताना पठ्ठ्याने उत्तर २५ असे सांगितले. मग त्याला भागाकार हि कन्सेप्ट सांगावी लागली. कसा करायचा हे शिकवावं लागलं. रोजची उदाहरणे देऊन आपण रोजच भागाकार करतो हे सांगावं लागलं.


पहिलीत जाणारी एक गोडुलीही अशीच हसत हसत यायची. तिच्या वयाच्या चार मुलींसारखीच होती. पण लिहिताना हमखास मात्रांचा घोळ घालायची. तीच गोष्ट सहावीत शिकणाऱ्या एका मुलाची. 

अशा अनेक घटना घडतात. मुलांना कमी मार्क्स मिळेपर्यंत हे लक्षातच घेतलं जात नाही. त्यांना  मुळात कन्सेप्ट्सच कळलेले नसतात. म्हणजे गणितातच बेरीज करायची तर का, किंवा वजाबाकी करायची तर ती का? हे कळलेलं नसतंच मग तक्रार येते, "शाब्दिक उदाहरणे असतील ना, तर घोळच होतो त्याचा".  बेरीज आणि वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्यांचा परस्परांशी  काही संबंध आहे, हे मुलांना कित्येकदा कळलेलंच नसतं. भाषा विषयांमध्ये, ओ आणि औ मधला फरक, वेलांट्या, उकार हमखास गडबडतात. 

हे झाले मुलांच्या बाबतीत. शिक्षणाचा दर्जा खालावत चाललाय असं ह्यामुळेच वाटत राहतं.
शाळेच्या आणि पाठ्यपुस्तकाच्या बाबतीतले निरीक्षण असे, कि, आपण जर कोणत्याही बोर्डाचे (ssc, icse किंवा cbse) पाठ्यपुस्तक पाहिले तर ते खूप छान असतं. म्हणजे, गणिताचं पुस्तक सुद्धा गणिताचं वाटत नाही. त्यांत सगळ्या गोष्टी खूप छान उदाहरणासह समजावलेल्या असतात.
अभ्यासक्रमात, शिकविण्याच्या पद्धतीमध्ये झालेले बदल, उदा. उपक्रमांवर भर देणे, प्रोजेक्ट्स करून आणणे पहिला, दुसरा क्रमांक, टक्केवारी ह्या ऐवजी ग्रेड्स देणे. हे सगळे बदल सकरात्मक वाटतात.
असं असूनही, मुलं आणि पालक शिक्षणाला का कंटाळतात आणि वर नोंदविलेली निरीक्षणे दिसून येतात. ह्यांत नेमकं काय चुकतंय? आणि कुणाचं? ह्याचा विचार करताना जाणवलं ते काहीसं पुढीलप्रमाणे-
आईवडिलांच्या दृष्टीकोणातून शिक्षण म्हणजे इयात्तामागून इयत्ता संपवत पुढे जाणे आणि सरतेशेवटी एखाद्या चांगल्या ठिकाणी (जेथे भरपूर पगार मिळतो) तेथे नोकरी करणे. यथावकाश, घर, गाडी, लग्न, मुलं ह्यागोष्टी पार पाडणे. मग त्यांत कधी फोरेन ट्रिप्स असतात, कधी भारी हॉटेल्सची भर पडते तर कधी पडत नाही. सर्वसाधारणपणे सर्वांचं आयुष्य असंच जातं. ह्यांत जेवढ्या जास्त सुखसोयींची भर पडते, तेवढा माणूस जास्त यशस्वी असं समीकरण असतं. थोडक्यांत शिक्षण घ्यायचं ते सोयी-सुविधा मिळविण्यासाठी, पैसा कमविण्यासाठी असा समज असतो. म्हणूनच, मेडिकल, इंजिनियरिंग, MBA अशा कोर्सेसकडे जाण्याचा कल जास्त दिसतो आणि ह्या दृष्टीने मुलांना तयार करण्यासाठी लहानपणापासून प्रयत्न केले जातात. हे प्रयत्न म्हणजे परिक्षा देणे आणि त्यांत गुण मिळविणे. मग गुण मिळविण्याच्या विशिष्ट पद्धती अवलंबिल्या जातात, परिक्षेचा pattern, त्या pattern नुसार अभ्यास घेणाऱ्या शिकवण्या ह्यांतून मुलांना विषय समजत नसला तरीही भरपूर मार्क्स मिळतात. अगदी केजीतल्या (बालवाडीतल्या) मुलांनाही ह्या चक्रात अडकवलं जातं. पहिल्यापासून मुलांना तशी सवय लागायला हवी, हा हेतू असतो.
गाण्याच्या reality shows मध्ये जसं पाच वर्षांची मुलंही, गाणं म्हणजे नेमकं काय हे न कळण्याच्या वयांतही खूप सुंदर गाऊ शकतात. तसंच विषय न कळताही मुलं मार्क्स मिळवू शकतात. साधारणपणे १०वी कधीकधी १२ वी पर्यंत हे असेच चालते.
थोडक्यांत शिक्षण म्हणजे नवीन काही शिकणे नसून, अभ्यासक्रम पाहणे, परीक्षेचा pattern पाहणे आणि त्यानुसार तयारी करणे असा अर्थ पालक, शिक्षक आणि विद्यार्थी घेतात. वर दिलेली निरीक्षणे जाणविण्यामागे ह्या दृष्टिकोनाचा फार महत्वाचा वाटा आहे.


कित्येकदा ८ वी - ९ वीच्या मुलांना १ लीपासूनचा अभ्यास पूर्ण करायचा असतो. कारण, त्या शिवाय ८वीच्या पुस्तकांतले वाचताच येणार नसते. ह्या सगळ्यांत शिक्षकांचा शिकविण्यातला आणि मुलांचा शिकण्यातला इंटरेस्ट संपून जातो. म्हणजे ज्या मुलांना येत नाही त्यांना वेगळे, विशेष प्रयत्न करून शिकविण्याचे कष्ट, शाळाच काय पण आई-वडीलही घेत नाहीत.

मग ह्यांवर सोपे मार्ग निवडले जातात, ते असे-
१) विचार करू नकोस, पाठ कर.
२) जे येत नाही, ते जास्त मार्कांचं नाही ना, सोडून दे. दुसरीकडून मार्क्स कव्हर करू या.
३) जे मागच्या सेमिस्टरला होतं, ते वाचण्यांत वेळ कशाला घालवायचा?
४) textbooks मध्ये खूप detailed दिलंय, त्यापेक्षा question bank बघ. पटापट होईल.

ह्या उपायांमध्ये आणि निरीक्षणांमध्ये असणारे साधर्म्य तुम्हालाही जाणवत असेल.  शिक्षकही त्यांच्या परीने उपाय शोधून काढतात आणि परीक्षेला येणार आहे ते आणि तेवढेच शिकवतात. त्यांचा वेगळा विचार, वेगळी पद्धत ह्याला काही स्कोपच राहत नाही.
अभ्यासात मागे पडलेली अनेक मुलं येतात, भेटतात. learning disability नसते, IQ average असतो पण तरीही अभ्यासात मागे पडतात कारण अभ्यास आवडत नसतो. त्यांत मजा आहे हेच कळत नसतं. हे शिक्षकांचं अपयश आहे, असंच मला वाटतं. पण फक्त शिक्षकांचंच अपयश आहे का? पालक म्हणून आपण मुलाच्या अभ्यासाकडे कोणत्या दृष्टीकोणातून पाहतो, तेही महत्त्वाचं नाही का?
शिक्षणाच्या खालावलेल्या दर्जा बद्दल फक्त गळे काढून, रडून ओरडून चालणार नाहीये. आपण स्वत: काहीतरी करण्याची गरज आहे. आपल्या मुलांना आपल्याला काय शिकवायचं आहे, हे ठरविण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. अनेक पालक हे करतात. पण अजूनही अनेक पालक, '...पण शाळेत हे मान्य नाही,' ह्यांत अडकतात. आणि बरेचसे, "इंग्रजी माध्यम म्हणजे असेच चालणार.." असे म्हणून मोकळे होतात.

थोडंसं वैयक्तिक उदाहरण देते- माझ्या मुलीला दुसरीत निबंध होता, 'My Mother'. शाळेतून निबंध लिहून दिला होता. टिपिकल, My mother's name is......... She cooks for me. She likes to wear Salawar Kamiz वगैरे-वगैरे. मुलीला जाणवलं, 'हे आपल्या आईचे वर्णन नाही.' मग तिने लिहिलं, 'My mother likes to wear jeans. She doesn't enjoy cooking. आणि असंच काहीसं. ह्यांत काही spelling mistakes होत्या पण निबंध अगदी genuine होता. तिला ह्या निबंधासाठी ५ पैकी १ मार्क मिळाला. कारण तिने एकच वाक्य टीचरने सांगितले तसे लिहिले होते.आता ह्यांत आम्ही तिला ओरडावं, टीचरने सांगितले तसेच लिही म्हणावे कि टीचर कशा चुकीच्या आहेत हे सांगत बसावे? ह्यांतले काहीही न करता आम्ही (तिच्या बाबाने आणि मी) सांगितले, "वा! आवडला हं निबंध मला. आता अजून काय-काय लिहू शकशील सांग बरं?" पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या मुलीने जवळपास १० छोटे-छोटे परिच्छेद आणि ३ गोष्टी लिहिल्या (स्वत: तयार करून). तिला मार्क्स मिळाले नसतीलही पण निबंध लेखनासाठी आवश्यक गोष्टी ती शिकली. त्यांत मजा आहे, हे तिला समजले. माझी मुलगी जगावेगळी नाही. तिच्या वयाच्या इतर मुलांसारखीच आहे. आम्हीही इतर आई-वडिलांसारखेच आहोत पण तिला काय शिकावायचंय ह्याचा आम्ही विचार केला आहे आणि त्यासाठी शाळेतले मार्क्स महत्त्वाचे नाहीत हेही आम्हाला माहिती आहे. असे अनेक आई-वडील असतात, जे मुलांना अशा अनेक गोष्टी शिकवतात. फक्त हे प्रमाण वाढायला हवं.
शाळा-शाळेचे माध्यम ह्यांवर चर्चा, शिक्षकांच्या तक्रारी ह्यांवर चर्चा रंगतात, पण अजून किती काळ ह्या चर्चा फक्त रंगवायच्या आहेत? 'आपल्या वेळेला असं नव्हतं!' हे किती दिवस म्हणणार आहोत? तेंव्हा एक तरी शिक्षक तळमळीने शिकवणारा असायचा, हे बरोबर आहे. पण त्या गुरुंनी दिलेला वारसा आपण पुढे का चालवायचा नाही?

- वसुधा देशपांडे-कोरडे
माइंड मास्टर कौन्सेलर्स,
१०, गणेश कॉर्नर, शनी मारुती मंदिरासमोर,
बिबवेवाडी, पुणे
९२२५५०५३६९. 




भाग-२ 
माझ्याकडे येणाऱ्या अनेकांना मी एक प्रश्न विचारला,"तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत कशासाठी पाठवता?" अनेक पालक निरुत्तर झाले. काहींनी प्रतिप्रश्न विचारला, "म्हणजे काय? काहीही काय विचारता? मुलांना शाळेत पाठवलं कि ती शिकतात. मोठी होतात. स्वतंत्र(आर्थिक दृष्ट्या) होतात. म्हणून." थोडक्यांत नोकरी मिळविणे हा आमच्या शिक्षणाचा एकमेव हेतू.
ह्यापलीकडे शिक्षणाचे उद्देश असू शकतील हा विचारही आपल्या डोक्यांत येत नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात शाळा ह्या प्रकाराची सुरुवात झाली.  थॉमस मेकॉले ह्यांनी १८३० साली पहिली शाळा सुरु केली. सांगितले ते काम करणारे, इंग्रजी समजू शकणारे कामगार बनविणे हा तेंव्हाच्या शाळेचा उद्देश. म्हणूनच शिस्तीच्या तालावर नाचणे, प्रश्न न विचारणे, आज्ञाधारकपणा हे गुण वाढीस लावण्याचा प्रयत्न केला जात असे. तोच शाळांचा उद्देश होता. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र ह्या उद्दिष्टांचा पुनर्विचार होणे आवश्यक होते. कोठारी कमिशनने ह्यासाठी महत्वपूर्ण काम केले. 
१) शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि २) लोकशाही, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हे गुण जोपासले गेले पाहिजेत ह्या महत्वाच्या सूचना. 

आपल्याकडे एक समज आहे. मुलगा शाळेत गेला कि शिकणारच. त्याला चांगले मार्क्स मिळाले कि तो गुणी, हुशार.  
हुशार असणं म्हणजे गणित आणि विज्ञान जमणे, IIT ला जाता येणे, हुशार असणं म्हणजे NEET clear करणं किंवा साधे इंजिनियर तरी होणे . हा विचार आपल्या डोक्यातून जातच नाही. म्हणून आपण मुलांना हुशार करण्याचा प्रयत्न करतो. tuition लावतो, पाठांतर करायला लावतो. १२-१२ तास अभ्यास करायला लावतो. पहिलं येणं महत्वाचं ठरवतो. street स्मार्ट असणे, परिस्थिती हाताळणे, निर्णय घेता येणे, स्वत: काहीतरी बनवणे ह्या गोष्टीना काहीच महत्त्व देत नाही. माझं निरीक्षण असं आहे की, असे लोक शाळेत मठ्ठ, धांदरट म्हणूनच ओळखले जातात, पण प्रत्यक्षात मात्र यशस्वी होतात.
१० वी नंतर जेंव्हा मी आर्ट्सला जाण्याचा निर्णय घेतला तेंव्हा वयाच्या १६ व्या मला निर्णय घेता आला , मला काय करायचंय, मला काय आवडतं हे माझं मला कळलं, ह्याचं कुणालाही (काही अपवाद वगळता) कौतुक वाटलं नाही. तर त्याऐवजी माझे वडील प्रथितयश डॉक्टर असूनही मी डॉक्टर होत नाही, हे किती मूर्खपणाचे आहे हे सांगणारे लोक जास्त होते. शिक्षणामुळे व्यक्तिमत्व विकसित करता येतं, निर्णय घ्यायलाही शिकवता येतं, काही आवडीनिवडी, कला गुण जोपासता येतात आणि मुळांत शहाणपण येतं हे आम्हाला मान्यच करायचं नाही. नोकरी-पैसा मिळायला हवं एवढंच आम्हाला दिसतं.
म्हणूनच मग इतिहासाची आवड असणारा, वाचन,लेखन आवडणारा हुशार विद्यार्थी, आपली आवड बाजूला ठेवतो आणि इंजिनियरींगला जातो. “मला चित्रकलेत गती आहे, मला तेच शिकायचंय,” असं म्हणणाऱ्याला आजही वेड्यात काढलं जातं. तर अभिनय आवडणाऱ्याला सांगितलं जातं, “तो अमका-अमका आहे ना, तो डाॅक्टर झाला आणि मग अभिनेता. तू तसं कर. स्वत:ला सिद्ध कर मग काय अभिनय करायचा तो कर..” गंमत अशी की, ह्यांत काही चुकीचे आहे असं कुणालाच वाटत नाही. 

Comments

Popular posts from this blog