तणावावर विजय मिळविण्यासाठी…

परीक्षा जवळ आली कि, ताण, नैराश्य, काळजी  असे शब्द सर्रास कानावर पडतात. 

ताणाला सामोरे कसे जायचे? वेगवेगळ्या प्रकारच्या ताणांचे व्यवस्थापन कसे करायचे ह्या बद्दल भरपूर प्रमाणात जागृती निर्माण झाली आहे. लोक आपला ताण टाळण्यापेक्षा त्याचं व्यवस्थापन करू लागले आहेत.  meditation, शारीरिक व्यायाम, कामाची आखणी, वेळेचं गणित जुळवू लागले आहेत. ह्या प्रयत्नांमुळे ताण स्विकारण्यास आणि व्यवस्थित हाताळण्यात काहीप्रमाणात यश असले तरी मुळापासून आपण बाहेर पडलो आहोत का? 

मुळात आपल्याला ताण का जाणवतो, ह्याचा आधी विचार करू या. कोणत्याही  घटनेने आपल्या शरीराकडून किंवा मनाकडून केलेल्या मागणीला शरीराने किंवा मनाने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे ताण. मग हा ताण कोणत्याही छोट्या-छोट्या गोष्टींमधून जाणवू शकतो. आईला सोडून दोन तास शाळेत बसायचंय इथपासून ते दोन दिवसांत बॉसने दिलेले काम पूर्ण करायचंय इथपर्यंत कोणत्याही गोष्टीचा ताण येऊ शकतो. येतो. अगदी बँकेत जाणे, वीजबिल भरणे, घरकाम करणे ह्या गोष्टीही तणाव निर्माण करणाऱ्या ठरू शकतात.  रोज असंख्य प्रकारच्या तणावांना आपण सामोरे जात असतो.

नीट विचार केला तर आपल्याला जाणवेल कि,  ताण आलेला असतो तेव्हा त्या गोष्टीकडे पाहताना आपण मनाशीच,  "अरे  बापरे!" हे  उद्गार काढलेले असते. म्हणजेच, कोणतीही घटना तणाव निर्माण करणारी नसते तर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण तणाव निर्माण करतो.  तणाव निर्माण करणारे अजून काही स्वत:शीच काढलेले उद्गार म्हणजे, "मला जमलं नाही तर.. " ," काही चुकलं तर.. ", " इतरांनी मला मदत केली नाही तर.. "  आणि अशाच प्रकारचे इतरही.  गंमत अशी असते कि ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्या जवळच असतात.  अगदी साधी- सोपी. ताण हलका करणारी.

अशा प्रकारच्या भीतिदायक उद्गारांना बाहेर हाकलून लावणे आपल्याच हातात आहे.  थोडीशी हिम्मत करून सकारात्मक विचारांना जाणीवपूर्वक मनात आणणे हेसुद्धा  आपल्याच हातात आहे.  आपल्याला जमेल असं स्वत:ला सांगत रहा. अपयश आल्याने फारसं काही बिघडत नाही, हेही लक्षात असू द्या.

तणाव नेहमी नकारात्मक रीतीने समोर उभा राहतो. तणावाचे तोटेच आपल्याला जास्त दिसतात. पण तणाव नसला तर आपण आहोत तेथेच, तसेच राहू. ध्येयाने प्रेरित होऊन पुढे जाण्यातला आनंदच गमावून बसू. सगळं सोपं झालं, सगळ्यांनाच सगळं मिळू लागलं तर जगणं कंटाळवाणं होऊन जाईल. जगण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी, पुढे जाण्यासाठी तणावाची गरज असते. तो सकारात्मक रीतीने घेतला जावा एवढे मात्र नक्की.

तणाव सकारात्मक रीतीने घेण्यासाठी पुढील गोष्टी करा. आपल्यासाठी सर्वात जास्त तणाव निर्माण करणारी गोष्ट कोणती ह्याचा विचार करा. त्या गोष्टीच्या मागे आपल्याला नेमकी कसली भीती वाटतेय ह्याचाही शोध घ्या. आता भीतीला कुरुवाळत न बसता सामोरे जा. भीती पळून जाइल आणि तणावात नवी संधी दिसू लागेल. हे विचार मनात रुजविण्यासाठी meditation चा आधार जरूर घ्या. शारीरिक व्यायाम, वेळेचे व्यवस्थापन ह्या गोष्टीही नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी नक्कीच वापरता येतील.


वसुधा देशपांडे-कोर्डे
Clinical Psychologist
Mind Master Counsellors, Pvt. Ltd.
९२२५५०५३६९



Comments

Popular posts from this blog