visayacha thikan


ससा आणि कासव ह्याची एकदा पैज लागली. नेहमी प्रमाणेच ससा दिसेल त्यात रमला आणि कासव मात्र कुठेही न थांबता चालत राहीलं. कासव जिंकलं. ससा हरला. एके दिवशी ससा कासवाला म्हणाला आपल्या शर्यतीच्या रस्त्यावरची नदी किती सुंदर आहे पाहिलीस? आणि त्या हिरवळीवरून पळताना किती मजा येते. कासवाला काहीच आठवेना कारण त्याने नदी पाहिली नव्हती आणि हिरवळही पाहिली नव्हती. शर्यतीत जिंकूनही त्याने खूप काही गमावलं होतं. 

हल्ली, बरेचजणांचं असंच होतं.  वेळच मिळत नाही काय करू? अशी तक्रार करणारे खूप लोक हल्ली पाहायला मिळतात. वेळ मिळाला तर असे करेन, तसे करेन असे मनसुबेहि रचले जातात. प्रत्यक्षात वेळ मिळाल्यानंतर मात्र हि मंडळी ते सर्व सपशेल विसरतात. आणि आपल्या मागे आपल्या कामाचे काय होणार ह्या विवंचनेत वेळ काढतात. फोन, इंटरनेट ह्या माध्यमातून कामाच्या सतत संपर्कात राहतात. सुटी म्हणजे अशा लोकांसाठी सक्तीची शिक्षा ठरते .तणावामध्येच जगण्याची सवय लागते. सतत काम, सतत स्पर्धा ह्यात जगायचंच राहून  जातं. शर्यतीत ते जिंकतात पण ध्येयापर्यंतच्या प्रवासातला आनंद गमावतात. 

तुम्ही म्हणाल, हल्ली धावावंच लागतं. कधी स्वत:साठी तर कधी दुसऱ्यांसाठी. अगदी सशाच्या वेगाने आणि कासवाच्या चिकाटीने धावावं लागतं. अगदी मान्य, पण धावता-धावता एखादं विसाव्याचं ठिकाण शोधायला काय हरकत आहे? हे विसाव्याचं ठिकाण म्हणजेच आपला छंद. 

मानसिक तणावातून विश्रांती मिळण्यासाठी 'छंद' जोपासणं हा एक उत्तम उपाय आहे. छंद मनाला उभारी देतात. व्यक्तिमत्त्वाला झळाळी देतात. काहीतरी शिकवतात आणि मुख्य म्हणजे अडचणींना सामोरे जाण्याचं बळ देतात. हल्ली बऱ्याच मानसिक रोगांवर उपाय म्हणून छंद जोपासायला सांगितले जातात.

बरेच पालक ह्या बाबतीतही जागरूक झालेले दिसतात. मुलांनी कसला न कसला तरी छंद जोपासावा म्हणून प्रयत्नशील असतात. सुट्टी म्हणजे तर असे छंद जोपासण्याची पर्वणी.  सुट्टी लागली रे लागली कि, मुलांनी सुट्टीत काय करायचे ह्याची आखणी केलेली असते. स्विमिंग, स्केटिंग, गाणे, नाट्यशिबीर, क्रीडाशिबीर अशा निरनिराळ्या शिबिरांना पाठविण्याची तयारी केली जाते. सुट्टी असूनही मुलं अगदी busy असतात.

मुलांना असं busy ठेवताना त्या गोष्टी मुलांना किती आवडतात, आवडतात कि नाही ह्याचा विचारच नसतो. मुलांनाही आई-बाबा जे सांगतात ते ऐकण्याची खूप सवय झालेली असते. आपण ती गोष्ट का करतो आहोत हेच बरेचदा त्यांना समजत नाही. अशी शिबिरं मुलांच्या सर्वांगीण विकासात मदत करतात ह्याबद्दल शंका नाहीच, पण त्याचा आनंद मिळणं देखील खूप गरजेचं असतं.

जी गोष्ट शिबिरांची तीच अवांतर क्लासेस बद्दल सुद्धा असते. शाळा, चित्रकलेचा क्लास, गाण्याचा क्लास, ग्राउंड आणि इतर बऱ्याच प्रकारच्या क्लासेसमध्ये मुलांना गुंतविण्याचा प्रयत्न असतो. सकाळी उठल्यापासून मुलं फक्त पळत असतात. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच ह्यागोष्टींची सुरुवात होते.  मुलांनी कुठेच कमी पडू नये या हव्यासापोटी आपण मुलांना पळायला लावतो.  काहीवेळेस ते पळणं मुलांच्या आयुष्यात एवढं मिसळून जातं कि, छंदसुद्धा सक्तीने जोपासले जातात.  सक्ती आली कि आनंद संपतो. फक्त जिंकण्यासाठीच आपण धावू लागतो आणि गाऊ लागतो.  आणि कालांतराने विसाव्यासाठी शोधलेलं  ठिकाणही विसावा देत नाही.  हल्ली, वाढत असलेल्या तणावाचे हेच मूळ कारण आहे. असा तणाव कमी करण्यासाठी,एखादी  अशी गोष्ट शोधा जी तुम्हाला आनंद देते. ती गोष्ट करण्यातला अनुभव तुम्हाला सुखावून जातो. वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ती गोष्ट करता. त्या गोष्टीची गोडी अवीट असते. ही गोष्ट म्हणजेच तुमचं  विसाव्याचं ठिकाण. ते शोधायला तुमच्या मुलांना, नातलगांना, मित्रांना नक्की मदत करा पण त्याची सक्ती नको. स्पर्धा नको.  हे ठिकाणच तुम्हाला दुप्पट वेगाने पळण्याची  ताकद देईल.









Comments

Popular posts from this blog