जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वानांच शाळेचे वेध लागतात. कंटाळा येईपर्यंत सुट्टीचा उपभोग घेतलेला असतो. आता नवा वर्ग, नवीन पुस्तके, नव्या वह्या आणि अभ्यास. सुरुवातीला तरी बऱ्याच जणांना अभ्यासाचा खूप उत्साह असतो. दहावीला गेलेल्या मुलांचा अभ्यास आधीच सुरु झालेला असला तरी शाळेचे नवे वर्ष आता सुरु होते.
ह्या वर्षी पहिल्यापासूनच खूप अभ्यास करायचा असं खूप जणांनी ठरवले असेल. हा निर्णय शेवटपर्यंत टिकवणं मात्र फार थोड्या जणांना शक्य होतं. काही जणांना अभ्यासाचा लवकरच कंटाळा येऊ लागतो तर काही जणांना इतर आकर्षणं खुणावत असतात. मग जाऊ दे नं, परीक्षा अजून लांब आहे असं म्हणत आपण कंटाळा करतो आणि बघता-बघता परीक्षेच्या जवळ जाऊन ठेपतो. मग घाई-घाईत अभ्यास, जेवणाकडे दुर्लक्ष, टेन्शन, परीक्षा संपली कि पुन्हा आराम असं चक्र सुरु होतं.
अभ्यास करायचा म्हणजे नवीन काहीतरी शिकायचं. आपल्या वागण्यातून ते व्यक्त करायचं. मग स्वयंपाक करायचा म्हटलं तरी अभ्यास लागतो आणि क्रिकेट खेळायचं असलं तरीही. थोडक्यात, आपल्याला आयुष्यात काहीही करायचं असलं तरीही अभ्यास करावाच लागतो.
अभ्यास करायचा म्हणजे नवीन काहीतरी शिकायचं. आपल्या वागण्यातून ते व्यक्त करायचं. मग स्वयंपाक करायचा म्हटलं तरी अभ्यास लागतो आणि क्रिकेट खेळायचं असलं तरीही. थोडक्यात, आपल्याला आयुष्यात काहीही करायचं असलं तरीही अभ्यास करावाच लागतो.
पहिल्या पासून अभ्यासाचा निर्णय टिकविण्यासाठी अभ्यास आवडून घेणं गरजेचं असतं. तो रोजच्या आयुष्याचा एक भाग बनवणं गरजेचं असतं. जसं आपण रोज जेवतो, झोपतो, tv पाहतो, ह्या गोष्टी आपण टाळत नाही तसंच अभ्यासाचंही असावं. तो दैनंदिनीचा एक भाग असावा. मग जेवण्याची, झोपण्याची जशी वेळ असते तशीच अभ्यासाची का नसावी?
पहिल्यापासून अभ्यास करण्याची पहिली पायरी म्हणजे वेळेचे व्यवस्थापन. अभ्यास करायचा हे जरी आपण ठरवलेलं असलं तरी किती वेळ आपण त्याच्यासाठी देणार आहोत, प्रत्येक विषयाचे किती धडे कसे अभ्यासणार आहोत ह्याचा अंदाज शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच घेणं गरजेचं असतं. प्रवासाला निघताना जसं आपण किती तारखेला, कोणत्या गाडीने जाणार, किती वाजता पोहोचणार ह्याचं प्लानिंग करतो तसंच चांगले मार्क्स मिळविण्याच्या दृष्टीने हे प्लानिंग गरजेचं असतं. आपण अभ्यासासाठी नेमका किती वेळ देऊ शकतो हे एकदा ठरलं कि, नेमकं काय करायचं हा प्रश्न आपोआपच सुटत जातो.
बरेचदा दोन ते चार तास अभ्यासाला बसायचं असं ठरवलेलं असतं. पण तेवढा वेळ
बसणं शक्य होत नाही. अभ्यासाला आपण किती वेळ बसलोय ह्या पेक्षा त्या वेळेत
किती अभ्यास केलाय हे जास्त महत्वाचं असतं. म्हणूनच रोज आपण काय अभ्यास
करणार आहोत ह्याचा आराखडा ठरवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे.
वेळेचे व्यवस्थापन करताना आपण कोणत्या वेळेत फ्रेश असतो ह्याचा विचार करावा. आपल्याला कोणता विषय अवघड जातो आणि कोणता सोपा ह्याचाही आढावा घ्यावा. वेळ आणि विषय ह्यांची सांगड घालत केलेला अभ्यास तुमची समजून घेण्याची शक्ती नक्की वाढवेल.
बरेचदा अभ्यास म्हटलं कि, कंटाळा येऊ लागतो. अभ्यासाची नावड हे त्यामागचं मूळ कारण. अभ्यास न जमणं हे अभ्यास न आवडण्याचं कारण असू शकतं. बरेचदा, परीक्षेची आणि अभ्यासाची भीती हे सुद्धा अभ्यास टाळण्याचे कारण असू शकते. असं असेल तेव्हा, अभ्यासाची नक्की अडचण कोणती ह्याचा विचार करायला हवा. ह्यावेळी आई-बाबा नक्कीच मदत करू शकतात.
अभ्यास हि एक न टाळता येणारी गोष्ट आहे. अडचणी, कंटाळा आणि अशा अनेक कारणांनी अभ्यास टाळण्यापेक्षा त्या कारणांना सामोरे जाऊया आणि अभ्यासाला सुरुवात करू या. शुभेच्छा!
अभ्यास हि एक न टाळता येणारी गोष्ट आहे. अडचणी, कंटाळा आणि अशा अनेक कारणांनी अभ्यास टाळण्यापेक्षा त्या कारणांना सामोरे जाऊया आणि अभ्यासाला सुरुवात करू या. शुभेच्छा!
वसुधा देशपांडे
क्लिनिकल सायाकोलोजीस्ट
माइंड मास्टर कौन्सेलर्स प्रा. लि.
(९२२५५०५३६९)
क्लिनिकल सायाकोलोजीस्ट
माइंड मास्टर कौन्सेलर्स प्रा. लि.
(९२२५५०५३६९)
Comments
Post a Comment