दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांचे निकाल आता जाहीर झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि अभिनंदन सर्वत्र केले जात आहे. काही जण मात्र कमी मार्क्स मिळाल्यामुळे किंवा नापास झाल्यामुळे नाराज असतील. मार्क्स कमी पडले म्हणजे आपल्या मेहनतीला पाहिजे तसं फळ मिळालं नाही असं वाटत असेल. बऱ्याच मुलांना आपल्या इच्छेनुसार हव्या त्या कोर्सला admission घेता येणार नाही ह्याचंही दु:ख होत असेल आणि म्हणूनच आता कशातच रस नाही असंही वाटत असेल. खरं तर, आपल्या मनासारखं यश मिळालं नाही म्हणून वाईट वाटणं अगदी स्वाभाविक आहे.
पण, मनासारखं झालं नाही म्हणून पुढे कधी यश मिळणारच नाही असं तर नाही ना? दहावी-बारावी म्हणजे उच्च शिक्षणाचा पाया हे जरी खरं असलं तरी दहावी-बारावीत मनासारखं यश मिळालं म्हणजे करियरची दिशा मिळाली किंवा खूप काही मिळालं असं होतं का? आयुष्यात हरलेले लोक कधीच जिंकत नाहीत का? किंवा जिंकणारे कधी हरलेच नाहीत का?
जगातल्या सगळ्याच यशस्वी लोकांच्या आयुष्याकडे नजर टाकली तर लक्षात येईल कि, सर्वजण कधी न कधीतरी अपयशी ठरले आहेत. नापास झाले आहेत. नापास होणं हे खरंतर अपयश नाहीच, त्या नापास होण्याचा स्वीकार न करता येणं हे अपयश आहे.
कोणत्याही गोष्टीचा स्वीकार केला कि मग वेगळ्या प्रकारे विचारांना सुरुवात होते. आपल्याला मिळालेल्या अपयशाची कारणे स्वत:मध्येच शोधण्याचा आपण प्रयत्न करू लागतो. असा प्रयत्न नवी दिशा देणारा ठरू शकतो. "मला कमी मार्क्स पडूच शकत नाहीत, मी तर खूप अभ्यास केला होता. रात्रीचा दिवस करून अभ्यास करत होतो", असं म्हणत बसलो कि, आपल्याला मिळालेलं अपयश अधिकाधिक मोठं वाटू लागतं. म्हणूनच, आपलं कुठे चुकलं ह्याचा एकदा आढावा घ्यावा आणि त्यातून शिकावं. बरेचदा, कुठे चुकलं ते लक्षातच येत नाही, मग काय करायचं? तरीही, जे समोर दिसतंय ते स्वीकारायचं. आपल्या पात्रातांवर विश्वास ठेवायचा आणि पुढे चालायचं. बरेचदा, आपली चूक नसतानाही ठेच लागतेच ना? मग चालणं सोडूनच द्यायचं का?
दहावीत किंवा बारावीत कमी मार्क्स मिळाले म्हणून आत्महत्या करावीशी वाटणं ह्यामागचं कारण हे अपयश पचवता न येणं असंही असू शकतं त्या बरोबरच करियरच्या दृष्टीने ह्या परीक्षांना असणारे महत्व हेही असू शकतं. मुळात, करियर म्हणजे फक्त चांगली नोकरी किंवा पैसा नाही. आणि अपयश आले म्हणून करियर होऊ शकणार नाही असंही नाही, हे मुलांना समजावून सांगायला हवं. मुलांच्या यशाला आणि अपयशाला आई-बाबांनी दिलेले अवास्तव महत्व हेही मार्क्स कमी पडल्यानंतर खचून जाण्याचं कारण ठरू शकतं. परीक्षेतले मार्क्स म्हणजे तुमच्या मुलाचे भवितव्य नाही हि गोष्ट आधी पालकांनी स्विकारायला हवी. आपल्या मुलांपर्यंत योग्य रीतीने पोहोचवायला हवी. मार्कांशिवाय मुलांमध्ये खूप चांगले गुण असतील, कला असेल. ती ओळखायला हवी. मुलांना सांगायला हवी.
कोणत्याही आई-बाबांसाठी मुलांचे मार्क्स, मुलांपेक्षा जास्त महत्वाचे नसतातच. फक्त हे मुलांपर्यंत वेळीच पोहोचवले पाहिजे.
वसुधा देशपांडे-कोरडे
क्लीनिकल सायाकोलोजीस्ट
माईंड मास्टर कौन्सेलर्स प्रा. लि.
९२२५५०५३६९
क्लीनिकल सायाकोलोजीस्ट
माईंड मास्टर कौन्सेलर्स प्रा. लि.
९२२५५०५३६९
Comments
Post a Comment