काही मुलांना सगळ्याच कामांसाठी वेळ लागतो. लिहिताना, वाचताना, संकल्पना समजावून घेताना त्यांच्या वयाच्या इतर मुलांच्या मानाने जरा जास्त वेळ घेतात. त्यांना नेहमी 'मंद ' असे म्हणून हिणवले जाते. शाळेत अशा मुलांना 'माठ, मठ्ठ, ढ', अशा निरनिराळ्या विशेषणांनी संबोधले जाते. त्यामुळेच, अशा मुलांचा आत्मविश्वास खूप डळमळीत झालेला असतो. हि मुलं मतीमंद असतात का? शिकूच शकत नाहीत का? इतर मुलांच्या मानाने कमी गतीने शिकणारी मुलं, आई-वडिलांसाठी काळजीचा विषय ठरतात. खरंतर, हळूहळू का होई ना पण ती शिकत असतात हे महत्त्वाचं.
ह्या मुलांना 'स्लो-लर्नर' असं म्हणतात. ह्यांचा बुद्ध्यांक सर्वसामान्य मुलांपेक्षा थोडा कमी असतो पण मतीमंद मुलांपेक्षा जास्त असतो. सर्वसामान्य शाळांमध्ये हि मुलं शिकू शकतात. फरक एवढाच कि त्यांना शिकायला जरा जास्त वेळ लागतो. एखादी गोष्ट खूप वेळेस वाचावी लागते. खूप वेळेस समजवावी लागते. त्यांना शिकविण्यासाठी संयमाची गरज असते. स्लो लर्नर्स अभ्यास टाळतात कारण इतर मुलांच्या मानाने शिकायला त्यांना वेळ लागतो. रोज नव्या संकल्पना हि मुलं शिकू शकत नाहीत. पाहिलं समजेपर्यंत दुसरं समोर आल्याने ती गडबडून गेलेली असतात. एकाच वेळेस खूप सूचना दिल्या तर समजायला अवघड जातं. सतत अवघड गोष्टी समोर आल्याने लक्ष देणे जड जाते. खरंतर त्यांना शिक्षणाची आवड असते. मेहनतीची तयारी असते. फक्त थोडा वेळ हवा असतो.
हि मुलं लर्निंग डिसबिलिटी असणाऱ्या मुलांपेक्षा वेगळी असतात. लर्निंग डिसबिलिटी असणारी मुलं त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी गतीने प्रगती करत असतात तर स्लो लर्नर्स त्यांच्या क्षमते एवढीच प्रगती करतात. ह्या मुलांमध्ये अनेक चांगले गुण असतात,त्यांना माणसांची आवड असते. बरेचदा परिपक्व नात्याला सामोरे जाताना ह्यांना अडचणी येतातही, पण मुलांमध्ये, लोकांमध्ये मिसळण्याची संधी दिली तर मुलं त्यांची कौशल्य विकसित करू शकतात.
ध्येय ठरविणे, त्या दृष्टीने पाउल उचलणे, भविष्याची आखणी करणे ह्या गोष्टी त्यांना जरा जड जातात. वर्तमानकाळात राहणारी हि मुलं असतात. म्हणूनच, कुठेतरी motivation कमी पडतं. स्वत: पुढाकार घेऊन काही गोष्टी करणं त्यांना जड जातं.
ह्या मुलांसमोर असणारी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे त्यांचा 'डळमळीत आत्मविश्वास'. आई-वडील आणि शिक्षक ह्यांच्या मदतीने तो वाढवायला हवा. मुळात, वेळ लागत असल्याने आणि निरनिराळी विशेषणं चिकटलेली असल्याने त्यांनी(मुलांनी) आपल्याला काही जमणारच नाही, अशी समजूत करून घेतलेली असते. हीच गोष्ट त्यांच्या आत्मविश्वासाला तडा देणारी असते.
ह्या सगळ्या गोष्टींमधून त्यांना बाहेर पडता येऊ शकतं. पुरेसा वेळ देऊन, पुढे नेता येऊ शकतं. स्वावलंबी बनवता येऊ शकतं. आई-वडिलांना त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते. त्यांच्यासाठी, मुलांचा रोजचा दिनक्रम आखावा, आणि तो पाळला जावा. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे. कौतुक करावे. मुलांच्या आवडीच्या गोष्टींचा शोध घ्यावा, आणि त्या शिकण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे. कोणतेही विशेषण (मंद, मठ्ठ, इ.) लावणे टाळावे. शिक्षकांनीसुद्धा त्यांना उत्तरे देण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, त्यांच्या कलागुणांचे कौतुक करावे. अभ्यास घेताना छोट्या-छोट्या भागात अभ्यासाची विभागणी करण्याने तो समजू शकतो.
आपला मुलगा/मुलगी 'स्लो लर्नर' आहे, हे समजल्यानंतर बरेच पालक हादरून जातात आणि मुलामध्ये खूप काही कमी असल्यासारखे वागू लागतात. बुध्यांक कमी आला म्हणजे मुलगा/मुलगी अबनोर्मल आहे, असं नाही. मुलामध्ये खूप कमी आहे, असंही नाही. हि मुलं नॉर्मल असतात आणि त्यांच्याशी तसंच वागायला हवं. एखाद्या झाडाला फुलण्यासाठी जास्त खत घालण्याची गरज असते, तसंच ह्या मुलांचं असतं एवढंच.
Comments
Post a Comment