मुलांचे मार्क्स, बुद्धिमत्ता ह्या बाबत सगळेच आई-वडील चिंतेत असतात. मुलांचा बुद्ध्यंक कसा वाढवायचा? असा प्रश्न बरेच आई-वडील विचारतात. बुद्ध्यंक जास्त असला तर आपलं मूल १०० % यशस्वी होणार, असा त्यांचा विश्वास असतो. प्रत्यक्षात मात्र बुद्ध्यांक चांगला असणारे अनेकजण आयुष्यात मागे पडलेले, हरलेले दिसतात. एवढा हुशार मुलगा हरलेला पाहून सगळेच हळहळतात. बुद्ध्यंक चांगला असूनही अयशस्वी  होण्याचं कारण, भावनांकाकडे केलं जाणारं दुर्लक्ष. मुलांनी ध्येयाने प्रेरित न होणे, छोट्याशा कारणावरून अविचारी पाउल उचलणे, लवकर निराश होणे, डोळ्यात चटकन पाणी येणे किंवा भावनांचा उद्रेक होणे ह्या सगळ्यांच्या मुळाशी अविकसित भावनांक हे कारण असतं आताची वाढती स्पर्धा, त्यात टिकून राहण्याची धडपड ह्यामुळे यशस्वी होण्यासाठी बुद्ध्यांकाबरोबरच भावनांक चांगला असण्याची गरज निर्माण झाली आहे. ती आपण ओळखायला हवी.  त्या दृष्टीने पावलं उचलायला हवीत. यशस्वी होण्याचं हे एक सूत्र आहे म्हणा ना !
आपलं यश हे नेहमी समाजाच्या मोजपट्टीने मोजले जाते. आपण समाजात राहतो आणि आपल्या  कितीतरी गोष्टी समाजावर अवलंबून असतात. कोणतीही गोष्ट करताना आपल्यापुढे प्रश्न येतो, लोक काय म्हणतील? म्हणूनच, यशस्वी होणं म्हणजे फक्त गाडी, बंगला, चांगला पगार असणं नाही त्यामध्ये  समाजातील आपली प्रतिमा,  लोकसंचय ह्याचा महत्त्वाचा वाटा असतो.  नाती असणं, भावना व्यक्त करणं, हि प्रत्येक माणसाची गरज असते.
 म्हणूनच यशस्वी होण्यासाठी बुद्ध्यांकाच्या बरोबरीने भावनांक महत्त्वाचा ठरतो.
कसा? कल्पना करा, एक अत्यंत हुशार मुलगा इंजिनियर होतो  चांगल्या पगाराची नोकरी मिळवतो, पण ती टिकवणं, तिथे आनंदाने काम करणं, सगळ्यांशी सलोख्याचे  संबंध ठेवणं हे यश मिळविण्यासाठी गरजेचं आहे आणि ते चांगल्या भावनांकामुळे शक्य होतं. थोडक्यात, कोणत्याही क्षेत्रात  यशस्वी होणं हे माणसाची  ताण हाताळण्याची क्षमता, भावनांवर नियंत्रण, इतरांशी नाते जपणे, त्याचा स्वत:शीच असणारा संवाद ह्यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतं. किंबहुना, माणसाच्या यशात बुद्ध्यांकाचा वाटा फक्त २५% असतो, असे काही अभ्यासकांनी सिद्ध केले आहे.

भावनांक हि संकल्पना तुलनेने नवीन आहे.  भावनांक म्हणजे इमोशनल कोशंट. इमोशनल इंटेलिजन्स ह्या संकल्पनेतून इमोशनल कोशंटची निर्मिती झाली. बरेचदा असा समज असतो कि, लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवणे म्हणजे   कधीच न चिडणं, नात्यामध्ये नेहमी पडतं घेणं. पण भावनांक चांगला असणारी माणसे चिडतच नाहीत असे नाही, तर ते योग्य वेळी योग्य माणसावर योग्य प्रमाणात चिडतात.  त्यांना वाईट वाटतच नाही, रडायला येतच नाही असे नाही, पण ते का होतंय ह्याचं नेमकं कारण त्यांना कळते. ती गोष्ट व्यवस्थित हाताळता येते.  स्वत:च्या भावना ओळखता येणे, व्यवस्थित व्यक्त करता येणे, त्यामागचे कारण ओळखता येणे आणि त्यांची जबाबदारी घेता येणे त्याचबरोबर दुसऱ्यांनाही भावना असतात हे ओळखून त्या समजून घेणे म्हणजे उच्च भावनांक असणे.  थोडक्यात, स्वत:च स्वत:चा मित्र, मार्गदर्शक होता येणे म्हणजे चांगला भावनांक असणे. इमोशनल इंटेलिजन्स असणं.
सलोव्ही आणि मेयर ह्यांनी केलेल्या व्याख्येनुसार, माणसाची भावना ओळखण्याची क्षमता, त्या ओळखून विचार करणं आणि भावना समजून घेऊन वैयक्तिक वाढीसाठी भावनांवर नियंत्रण मिळवणं म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. गोलमन ह्या अभ्यासकाने हि संकल्पना अधिक लोकप्रिय केली. त्याने सांगितल्यानुसार, इमोशनल इंटेलिजन्स साठी, स्वत:ला ओळखणं, स्वत:ला नियंत्रित करता येणं, दुसऱ्यांना ओळखणं, नात्यांचे व्यवस्थापन करता येणं , ह्या क्षमता आवश्यक ठरतात.  
बुद्ध्यांकाप्रमाणेच भावनांकसुद्धा विकसित करता येतो. भावनांक विकसित करण्याची सुरुवात मुलांच्या अगदी लहान वयात होते. ह्यासाठीही आई-बाबांना थोडे परिश्रम घ्यावे लागतात. लहान मुलांना स्वत:ला ओळखायला शिकविण्यापूर्वी आपल्याला स्वत:ला आणि मुलांना ओळखता यायला हवं. मुलाच्या भावनांना शब्दरूप देता यायला हवं. रडणाऱ्या मुलाच्या रडण्यामागाचे नेमके कारण ओळखून ते शब्दात व्यक्त करायला त्याला मदत केली गेली, तर उद्रेक होऊ न देता भावना व्यक्त कशा करायच्या हे मुलाला समजेल.  रागावणे, वाईट वाटणे, आनंद होणे ह्या भावना प्रत्येकालाच असतात हि जाणीव मुलांना करुन देणे, मुलांनी इतरांना समजून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक ठरते.  इतरांना समजून घेणे म्हणजे त्याच्याशी सहमत असणे नव्हे. तर त्या भावनांची जाणीव असणे.
नाती जपायला आपण सगळेच मुलांना शिकवत असतो. बरेचदा असं करताना, मुलांच्या मताला गृहीत धरलं जातं. न पटणाऱ्या गोष्टी सांगण्यापासून अडवलं जातं. त्यामुळे, बरीचशी  नाती मुलांच्या मनातून दुरावतात. कोणतंही नातं  व्यवस्थित हाताळणं गरजेचं असतं. त्यामुळे भावना, विचार योग्य प्रकारे व्यक्त करायला शिकवलं तर नातं हाताळणं सोपं जातं.  नात्याचं लोढणं होत नाही.
शाळेचा ताण व्यवस्थापित करणे, समोर येणाऱ्या समस्या सोडविणे, मित्रांशी होणारी भांडणे मिटविणे, हाताळणे ह्या गोष्टी मुलांना शिकविता येतात. शिकवायला हव्यात. नकार देणं आणि दिलेला नकार पचवणं ह्या गोष्टीही मुलांना आपल्याकडूनच शिकता येतात.  त्या शिकवायला हव्यात. मुलांच्या यशस्वी आयुष्यासाठी ही शिदोरी ठरते.




  

Comments

Popular posts from this blog