संवाद मुलांशी
मुलांकडे लक्ष द्यायचं म्हणून हल्ली आई-बाबा काय काय करतात. मुलांना पाळणाघरात सोडायला नको, म्हणून आजी-आजोबाना घरात ठेवतात. मुलांचा अभ्यास नीट व्हावा म्हणून tusionक्लास लावतात( नर्सरी पासून). मुलांचे हट्ट पूर्ण करतात. मॉल, सिनेमा, पिकनिक, वाढदिवस हे तर ठरलेलं असतं. भारी-भारी कपडे, रिमोटची खेळणी, सगळं हवं तसं. हे केलं कि वाटतं, 'आपलं आपल्या मुलांकडे लक्ष आहे.' हे सगळं देऊनही मुलांच्या गरजा बरेचदा पूर्ण होतंच नाहीत. कारण ज्याची गरज असते ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचतच नाही. मुलांना तुमचा वेळ हवा असतो. तुमचा आधार, तुमच्याकडून कौतुक हवं असतं. बऱ्याचदा ह्या गोष्टी पुरवताना आई-बाबा कमी पडतात.
मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय बऱ्याच आई- बाबांना असते. हे दुर्लक्ष जाणीवपूर्वक केलं जातं असं नाही. काही आई-बाबा आपल्या कामात, विचारांत एवढे गढलेले असतात, कि, मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. मुलाने सांगितलेली किंवा दाखविलेली गोष्ट आपण काळजीपूर्वक पाहत नाही, ऐकत नाही, मुलगा "आई, आई, बाबा, बाबा " ह्या हाकांना आपण प्रतुत्तर देत नाही. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींना 'हो-नाही' एवढयाच प्रतिक्रिया देतो. काढलेल्या चित्राला "हं," एवढाच अभिप्राय मिळतो. हळूहळू मुलांच्या बोलण्याकडे, खेळण्याकडे दुर्लक्ष करणं हे आपल्या सवयीचं होत जातं. आपल्याकडे, आपल्या बोलण्याकडे आई-बाबांचं लक्ष नाही हि गोष्ट मुलांपर्यंत पोहोचते. हळूहळू मुलं तुम्हाला त्यांच्या गोष्टी सांगणं बंद करतात. मग त्यांच्याबाबतीत घडणारी मोठी गोष्टही तुमच्यापर्यंत त्यांच्याकडून पोहोचत नाही. आई-बाबा आपल्याकडे फारसं लक्ष देत नाहीयेत, आई-बाबांकडून हवं ते मिळत नाही हे लक्षात आलं कि मुलं घराबाहेर असा आधार शोधू लागतात. मग, दुसऱ्यांच्या घरांत सतत जाणे. आपल्याला हवी ती वस्तू मित्राकडे किंवा मैत्रिणीकडून मागून घेणे, घरांत शांत पण शाळेत मात्र खूप धुमाकूळ असं चित्र दिसू लागतं. मुलाचं व्यक्तिमत्व इतरांसाठी त्रासदायक होऊ लागतं.
बरेचदा, आपले मुल सुधारावे ह्या हेतूने अतिशय कडक भूमिका घेतली जाते. मुलाची जराशी चूक झाली कि रागावणे, बोलणे ह्या गोष्टींना सुरुवात होते. ती चूक का घडली हा प्रश्नच मनात येत नाही. ह्यांत बऱ्याचदा मुलाला कमी लेखले जाते. तुला काहीच समजत नाही, तू नेहमीच चुकतोस अशा प्रकारची वाक्यं मुलांना दुखावणारी ठरतात. काही घरांमध्ये, मुलांना त्यांच्या नावाने न बोलावता, 'ए बावळट, ए मूर्ख' अशा हाका मारल्या जातात. ह्या गोष्टी मुलाच्या मनात स्वत:बद्दलची नकारात्मक प्रतिमा तयार करतात. मुलं मग स्वत:हून काही गोष्टी करणं बंद करतात. passive होत जातात. मारल्याने शरीरावर खुणा उमटतात, तशा ह्या गोष्टी मनावर कायमस्वरूपी घाव करून जातात.
मुलांवर होणाऱ्या अत्याचाराचे दोन प्रकार आपल्याला माहिती असतात, एक मुलांना मारणे आणि दुसरा लैंगिक अत्याचार. आपण ह्या दोन गोष्टी करत नाही, म्हणजे मुलांशी खूप चांगलं वागतो असा बऱ्याच आई-बाबांचा समज असतो. ह्या दोन अत्याचारांव्यातिरिक्त मुलांच्या भावना समजून न घेणे, मुलांशी संवाद नसणे, मुलांना टोचून बोलणे, त्यांचा अपमान करणे, मुलांच्या बोलण्याला प्रतिसाद न देणे हे सुद्धा अत्याचाराचेच प्रकार आहेत. ह्याचे मुलांच्या व्यक्तिमत्वावर दूरगामी परिणाम होऊ शकतात.
जेव्हा मुलांवर अशा प्रकारे अत्याचार होतात तेव्हा मुलांमध्ये सतत चिंता करणे, नैराश्य, आपल्या बरोबरीच्या मुलांमध्ये मिसळताना अडचणी येणे, आत्मविश्वास नसणे ह्या समस्या जाणवतात. मुलांवर जेंव्हा भावनिक अत्याचार होतात, तेव्हा अशी मुलं त्यांच्या वयाच्या इतर मुलांच्या मानाने मागे पडतायत असं जाणवतं. हि मुलं घरातल्या व्यक्ती सोडून इतर व्यक्तीशी जास्त जवळिक साधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये खेळणं त्यांच्यासाठी अवघड जातं. अभ्यासातही अडचणी जाणवू लागतात.
ह्यावर उपाय काय? आपलं मुल आपल्यापासून तुटतंय हे वेळीच ओळखता यायला हवं. आपल्या आई-बाबांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगू नयेत किंवा सांगून काही फायदा नाही असं मुलांना वाटू लागतं तेव्हा मुलं आपल्यापासून दुरावली आहेत असं समजावं. ह्यांत मुलांची चूक नसते, मुलांच्या मनात तेवढा विश्वास आपण निर्माण करू शकत नाही, हि आपली चूक असते. त्यसाठी,
१)      मुलासाठी रोज थोडा वेळ राखून ठेवा. त्याच्याशी गप्पा मारा. खेळा.
२)      तुम्ही दोघंही आनंद घेऊ शकाल अशी एखादी गोष्ट शोधा (सायकलिंग, चित्रकला, स्वयंपाक, बागकाम) आणि करायला सुरुवात करा.
३)      मुलाच्या छोट्या-छोट्या गोष्टींचं कौतुक करा.
४)      मुलांना नावं ठेवणे, अपमान करणे टाळा.
५)      रागावणं अपरिहार्य असतं, पण त्याबरोबर मुलाचा स्वीकारही व्हावा.

वसुधा देशपांडे- कोरडे
Clinical Psychologist
माइंडमास्टर कौन्सेलर्स, प्रा. लि.
अहमदनगर
९२२५५०५३६९








Comments

Popular posts from this blog