लेखन


काल माझ्यासमोर एक मुलगा विज्ञानाचे पुस्तक वाचत होता. धडा होता 'World of Matter'. धड्यातला पहिला परिच्छेद खूप छान आहे. तो वाचून झाल्यावर मी त्याला विचारलं, "तुला ह्यातलं काय समजलं?" त्याने पुस्तकातली वाक्यं जशीच्या तशी मला ऐकवली. मी पुन्हा विचारलं, "म्हणजे काय?" आता तो गडबडला. धड्यात काय लिहिलंय त्याचा त्याच्या आयुष्याशी संबंध जोडणं त्याला जमत नव्हतं. matter म्हणजे काय हे सांगताना आजूबाजूची उदाहरणं देणं त्याला जमत नव्हतं. ह्याचा अर्थ असा नाही कि, तो मठ्ठ होता. पण पाठ्यपुस्तकातल्या गोष्टी फक्त परीक्षेतच लिहायच्या असतात असा त्याचा समज झाला होता. आणि त्या तो अर्थ न लावता पाठ करत होता. अशी कितीतरी मुलं आज दिसतात. प्रश्नाची उत्तरे पूर्णविराम, स्वल्पविरामासह पाठ करणारी मुलं सुद्धा आहेत. प्रश्नाची उत्तरे जेव्हा लिहिली जातात तेव्हा ती पाठांतराच्या जोरावर असतात, आकलनाच्या नाही. म्हणूनच मग, जेव्हा ते लिहिण्याची वेळ येते तेव्हा मात्र गडबड होते. शब्दच आठवत नाहीत. मुद्दा मागे-पुढे होतो. उत्तर १०० शब्दांत लिहायचं असतं पण  दोन वाक्यांच्या वरती  काय लिहावं हे सुचत नाही. धड्याचे आकलन झाले कि, प्रश्नांची उत्तरे देणं सोपं होतं.

धड्यावर आधारित मोठ्या  प्रश्नाचे उत्तर जेव्हा लिहायचे असते तेव्हा धड्याचे सारांश लेखन (paraphrasing) करण्याची गरज असते. ह्यासाठी धड्यामध्ये असणाऱ्या मुद्द्यांचा विचार करता यायला हवा. ते आपल्या भाषेत, थोडक्यात सांगता यायला हवेत. जेव्हा अशी मोठी उत्तरे लिहायची असतात तेव्हा त्यामध्ये आपल्याला जे मुद्दे लिहायचे आहेत ते आधी लिहून ठेवणे कधीही श्रेयस्कर असते. मग एकेक मुद्दा घेऊन, सोदाहरण स्पष्ट करून सांगता येतो. आकलन होण्यासाठी  background knowledge आवश्यक असते, हे लक्षात ठेऊन उत्तरे लिहिताना आधी प्रस्तावना लिहिणे फायद्याचे ठरते. शेवटी, उत्तराचा सारांश एका वाक्यात लिहिला तर उत्तराला पूर्णत्व  येते. मोठी उत्तरं लिहायची तर आधी त्याचा आराखडा बनविणे, त्यावर विचार करणे, शब्दांची-वाक्यांची निवड करणे आवश्यक असते.

निबंध लिहितानासुद्धा ह्याच गोष्टी आवश्यक ठरतात. दुर्दैवाने हल्ली इन्स्टंट गोष्टींचा जमाना असल्याने ह्या सगळ्या गोष्टींना काट मारली जाते. त्यामुळे लेखनाची पूर्वतयारी होतंच नाही. (ह्यांत शाळेचे कारण नेहमी दिले जाते. "आमच्या शाळेत असं स्वतःचं लिहिलेलं चालत नाही", असं खूप जण सांगतात. ही खरंच चिंताजनक गोष्ट आहे. असं होत असेल तर शिक्षणाचा मूळ उद्देशच सफल होत नाही असे म्हणावे लागेल.). 


जेव्हा टिपा लिहा किंवा पाच ते सहा वाक्यांत उत्तरे लिहा ह्यांसारखे प्रश्न  असतात तेव्हा सुद्धा मुद्दा, स्पष्टीकरण आणि उदाहरण ह्या प्रकारे थोडक्यांत समजावून सांगता येते. बरेचदा अनेक अशी उत्तरे मिळून एक मोठे उत्तर तयार होत असते. अनेक गाळलेल्या जागा, एका वाक्यात उत्तरे मिळून एक पाच ते सहा वाक्यातले उत्तर तयार होत असते. 

लिहिण्यासाठी वाचनाची खूप गरज असते. वाचन जास्त तेवढा शब्दसाठा जास्त. शब्दसाठा जास्त असला कि, एखादी गोष्ट निरनिराळ्या पद्धतीने समोरच्या माणसाला समजावून सांगता येते. 

लेखनासाठी आवश्यक अशी अजून एक गोष्ट म्हणजे व्याकरण. व्याकरणाचे नियम बरेचदा पोलिसांसारखे वाटतात. पण हेच नियम वाक्याला अर्थ मिळवून देतात. व्याकरण नसेल तर काय लिहिलंय आणि काय वाचतोय हे समजणारच नाही. 

लेखनाच्या दृष्टीने तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हस्ताक्षर. हे सुंदर नसले तरी सुवाच्य असायला हवे. सुवाच्य हस्ताक्षर येण्यासाठी आपण पेन कसा धरतो, आपण कशा प्रकारे बसतो, वही कुठे आणि कशी ठेवलेली असते हे खूप महत्वाचे आहे.  आपण जर लक्षपूर्वक लिहिले तर हस्ताक्षर म्हणावे तेवढे वाईट येत नाही. 

बरेचदा, धडा  कळलेला असतो, उत्तरे  येत  असतात. काही जणांना लिखाणाच्या बरोबरीने, दिशा न समजणे, आकार ओळखता न येणे, काढता न येणे, spelling सांगताना बरोबर सांगणे पण लिहिताना चुकीचे स्पेल्लिंग लिहिणे, एका सरळ रेषेत लिहिता ना येणे, व्याकरणाचे नियम ना समजणे अशा समस्याही जाणवतात. अशा वेळी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.  

'एकदा बारावी झाली कि, कुठे लिहावं लागणार? कसंबसं तेवढं केलं कि झालं.' ह्या विचारामुळे लेखनाकडे नेहमीच दुर्लक्ष होतं. लिहिणे म्हणजे आपल्याला जे येते ते समोरच्याला समजावून सांगणे. लेखन म्हणजे व्यक्त होणे, मुद्देसुद लिहिता येणे म्हणजे स्पष्ट विचार करता येणे, ह्यादृष्टीने विचार केला तर लिहिण्यातून कितीतरी कौशल्य विकसित होतात. आपण समोरच्या माणसाला कळू शकतो. resume, sop, minutes, reports, emails हे लिखाणाचेच प्रकार आहेत. त्यामुळे कुठेही गेलो तरी लिखाणाला पर्याय नाही. लेखन हा आपल्या विकासाचा एक भाग समजायला हवा.







Comments

Popular posts from this blog