पत्रिका हा खरंच काय प्रकार असतो? लग्न जुळवताना, "पत्रिका जुळली पाहिजे", हि अट मुख्य. पत्रिका जुळली म्हणजे संसार सुखी होतो म्हणे. मला आपलं उगाच वाटायचं, नवऱ्यासाठी वेळ काढावा, जरा गप्पा माराव्यात, त्याला समजून घ्यावं.  (मला अनुभव नाही. आमची पत्रिका न जुळून संसार दु: खाचा झालेला नाही). हल्ली बहुदा, पत्रिका बनविण्याची आणि पाहण्याची fashion असावी. 

परवा, एक काका माझ्याकडे आले आणि  त्यांनी त्यांच्या समस्यांची यादी वाचली. सवयीप्रमाणे मी शांतपणे ऐकून घेतले. त्यांना मोकळं वाटण्यासाठी ते आवश्यक होतं. सगळं झाल्यावर त्यांनी जन्मपत्रिका काढून माझ्याकडे दिली. म्हणाले, उपाय सांगा. मी म्हटलं. "मी पत्रिका पाहत नाही". मग त्यांनी हात पुढे केला. मी हातही पाहत नाही हे कळल्यावर त्यांचा चेहरा उतरला. "मग माझ्या प्रोब्लेमचे उत्तर तुमच्याकडे कसं?" त्यांनी विचारलं.  मी म्हटलं, "माझ्याकडे रेडीमेड उत्तर नाहीच. पण तुमचे प्रोब्लेम्स तुम्हाला सोडवता यावेत ह्यासाठी मी मदत करू शकते" "म्हणजे मीच माझे प्रोब्लेम्स सोडवायचे?"  त्यांनी विचारलं.  "अर्थात, तुमच्या अडचणी सोडवायच्या तर काही पावलं तुम्हाला उचलावीच लागतील, " मी म्हणाले.  "मग तुमचा काय उपयोग?? तरी हि चांगलं म्हणत होती, 'त्या मठातल्या महाराजांकडे जाऊ. सत्यनारायण  घालू..' मी ऐकलं नाही." एवढं बोलून ते काका अंतर्धान पावले.  ह्यावर काय बोलावं हे मला अजूनही सुचलेलं नाही. 

मी पूर्वी करियर कौन्सेलिंगवर एक लेख लिहिला होता. तो वाचून एक जणांनी सुचवलं, "तुम्ही पत्रिकांचा अभ्यास करा. पत्रिकेवरून कोणतं करियर निवडायचं हे सुचवा. " हा सल्ला ऐकून मी आवाक झाले. "मुलांचा कल ओळखा", असं सांगण्याऐवजी, ग्रह-तारे ओळखा असं सांगण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं.  मला तर आकाशात पाहून फक्त चंद्र आणि सूर्य ओळखता येतात. पत्रिकेत ते आकाश सोडून कुठेही जातात.  आपली जागा सोडून वागणारे मला फारसे आवडत नाहीत. मग चंद्र असो नाहीतर सूर्य. 

तर, आपल्या जन्माच्या वेळी, ग्रह-ताऱ्यांची असलेली स्थिती, ती म्हणे आपलं भविष्य ठरवणार. आणि ते परत आपल्यालाच सांगणार. म्हणजे आम्ही हातावर हात ठेवून, तंगडे पसरून निजायला मोकळे. सगळं ग्रह-ताऱ्यांवर सोपवलं कि विचार कशाला करायचा? हालचाल कशाला करायची? निर्णय कशाला घ्यायचे? वर आणि, "सध्या ग्रह वाईट म्हणून यश नाही," असं म्हटलं  कि  झालं. 

लानत है जी उसपर, दुनियामेही रहकर, दुनियामें जो जीनेके अंदाज को न जाने 
माथा या हाथोमे, चांद या तारोमें, किस्मत को धुंढे पर खुदमे क्या है ये न जाने। 

Comments

Popular posts from this blog