माझी मुलगी senior kg मध्ये जाते. वाचन शिकण्याचं तिचं वय. परवा तिचं एक पुस्तक हातात धरून घडाघडा वाचत होती. मला कौतुक वाटलं. मी तिला दुसरा तसाच परिच्छेद लिहून दिला. तर ती गडबडली. नंतर लक्षात आलं कि, शाळेत तो धडा पाठ करून घेतला होता. unit test ला तोच वाचायला सांगणार होते. ज्यांना पाठ नाही झाला त्यांना कमी मार्क्स मिळणार होते. गेल्या काही दिवसांत मी आठवी ते दहावीच्या बऱ्याच मुलांना भेटले. काही जण ९०% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळविणारी होती. सहज म्हणून अभ्यासाची चर्चा करताना लक्षात आलं, कि, मुलं पाठ्यपुस्तकं फारशी वाचतच नाहीत. प्रश्नोत्तरे शाळेतून दिली जातात. गाईड्स असतात, ट्युशन मध्ये उत्तरे पाठ करून घेतली जातात. अगदी निबंध सुद्धा रेडीमेड असतात. तेच पाठ करायचं आणि परीक्षेला जायचं. परीक्षा द्यायची आणि मार्क्स मिळवायचे. मार्कांची हि धडपड senior kg पासून किंवा त्याच्याही आधीपासून सुरु होते. मार्क्स मिळतात पण शिक्षण बाजूलाच पडतं.
प्रश्नोत्तरांच्या स्वरूपाने मार्क्स वाढत असतील पण धड्यातली मजाच जातेय असं वाटलं. शाळा संपून जवळपास २० वर्षं झाली पण नववी, दहावीतल्या किंवा अगदी चौथीपर्यंतच्या कविताही कधी कधी आठवतात.मलाच नाही माझ्या आजोबांना सुद्धा त्यांच्या काळातल्या कविता आठवतात. धडे आठवतात. काही वेळेस त्या धड्यांचे आणि कवितांचे नव्याने अर्थ उलगडतात. संस्कृतमधल्या एखाद्या श्लोकाचा अर्थ लावता येतो. गणित आणि विज्ञान आवडत नसलं तरी व्यवहारात वापरता येईल इतपत त्या विषयाची समज आहे. कारण, शाळेत आम्हाला परीक्षेपुरतेच शिकविले गेले नाही. त्या विषयांतली मजा समजावली गेली. निबंध लिहिताना स्वत: विचार करायचा हे आम्हाला शिकवलं गेलं. धडा नुसता वाचायचा नाही लेखकाची भूमिका समजावून घ्यायची, कविता फक्त वाचायची नाही, कवीच्या भावनांशी समरस व्हायचं. हे शिक्षण मिळत गेलं. त्यामुळे जे शिकवलं, त्यावर विचार करू शकलो. जे आम्ही शिकलो ते लक्षात ठेऊ शकलो. व्यक्त करू शकलो. शिक्षण आवडलं ते त्यामुळेच.
आता मुलं कित्येकपटींनी हुशार आहेत, लक्षात ठेऊ शकतात, जशाला तसं लिहू शकतात. पण विचार करण्याची वेळ आली कि, गडबडतात. त्यातही, एखादा असतो वेगळ्या वाटेने जाणारा, वेगळा विचार करणारा. पण त्याची कल्पनाशक्ती आपल्याला हवी तशी वळवून घेण्याचं कसबही शिक्षकांमध्ये असतं. ह्यालाच काहीजण 'शिक्षण' असं म्हणतात.
शिक्षण म्हणजे विचार करणं. शिक्षण म्हणजे व्यक्त होता येणं. शिक्षण म्हणजे अनुभव घेणं. जागं होणं. हे खरंच आजच्या मुलांच्या बाबतीत घडतंय? विचार करायला हवा.
शिक्षणाबद्दल बोलताना नेहमी दोन बाजू पुढे येतात. १) पालकांना मुलांचे मार्क्स हवे असतात. त्यामुळे, मार्कांच्या दृष्टीने शिक्षकांना शिकवावंच लागतं. हि शिक्षकांची बाजू. आणि २) हल्ली, सगळीकडेच मार्क्स महत्त्वाचे आहेत. प्रवाहाच्या दिशेने पोहावंच लागतं, हि पालकांची बाजू. दोन्हीही गोष्टी अगदी मान्य. शिक्षणाचे बाजारीकरण झालं आहे, असा मुद्दा मांडणारेही बरेच असतात. 'पूर्वीसारखं शिक्षण राहिलेलं नाही,' ह्यावर सगळ्यांचं एकमत असतं. थोडासा अजून विचार केला तर जाणवेल, कि, प्रश्न सोडविण्यापेक्षा एकमेकांवर दोषारोप करण्यातच आपण वेळ घालवत आहोत. आपण आपल्यापुरतं बदललं तरी खूप प्रश्न सुटणार आहेत.
काल एक आई आणि मुलगा अभ्यासाबद्दल बोलत होते. मुलाला असलेला धडा आईला अगदी तोंडपाठ होता. तिने मन लावून अभ्यास घेतला होता. मुलाला चांगले मार्क्स मिळावेत असं तिला मनापासून वाटत होतं. त्या मुलाचा काही क्षण हेवा वाटला. मला माझं बालपण आठवलं. मी आईला म्हणायचे, "आई, मला हा धडा समजला नाही." आई बहुदा कुणीतरी जेवायला येणार असल्यामुळे कामात असायची. ती फक्त "धडा पुन्हा वाच", एवढंच सांगायची. मी तो परत एकदा वाचायचे. मग म्हणायचे, "तरीही थोडं नाही कळलं". ती म्हणायची, "मग परत वाच." मग मला मनातून राग यायचा. आणि तो धडा मी माझाच समजावून घ्यायचे. माझ्या धड्यात काय होतं, हे आईला माहिती नसायचं. मला आईचा खूप राग यायचा. मोठी झाल्यानंतर मला समजावून घेत वाचण्याची सवय लागली. एका पुस्तकातून नाही कळलं कि, दुसरं वाचायचं. पण समजेपर्यंत प्रयत्न करायचा. वाचत राहायचं. मला जाणवलं, कि मी खरंच नशीबवान होते. मला चांगले मार्क्स मिळावेत असं माझ्या आईला वाटत होतं कि नाही, ते मला माहिती नाही; पण मी अभ्यास करावा आणि शिकावं असं मात्र तिला नक्कीच वाटत असणार. तिने धडा समजावला नाही, पाठांतर तर कधीच घेतलं नाही पण शिकायचं कसं हे मात्र शिकवलं. शिक्षणाबद्दल बोलताना नेहमी दोन बाजू पुढे येतात. १) पालकांना मुलांचे मार्क्स हवे असतात. त्यामुळे, मार्कांच्या दृष्टीने शिक्षकांना शिकवावंच लागतं. हि शिक्षकांची बाजू. आणि २) हल्ली, सगळीकडेच मार्क्स महत्त्वाचे आहेत. प्रवाहाच्या दिशेने पोहावंच लागतं, हि पालकांची बाजू. दोन्हीही गोष्टी अगदी मान्य. शिक्षणाचे बाजारीकरण झालं आहे, असा मुद्दा मांडणारेही बरेच असतात. 'पूर्वीसारखं शिक्षण राहिलेलं नाही,' ह्यावर सगळ्यांचं एकमत असतं. थोडासा अजून विचार केला तर जाणवेल, कि, प्रश्न सोडविण्यापेक्षा एकमेकांवर दोषारोप करण्यातच आपण वेळ घालवत आहोत. आपण आपल्यापुरतं बदललं तरी खूप प्रश्न सुटणार आहेत.
Comments
Post a Comment