एक दिवस विचार केला, 'कशासाठी काम करायचं? कशासाठी पैसे मिळवायचे?' आणि काम करण्यातला उत्साहच नाहीसा झाला. मग विचार केला, जे  खूप दिवसांपासून करायचंय त्यांची एक लिस्ट करूयात. थोडक्यात आपल्या  इच्छांची लिस्ट बनवूयात. आणि  काय विचारता, त्या वस्तू मिळविण्यासाठी, मी ताबडतोब कामाला लागले. आपली सगळ्यांचीच  एक 'wishlist' असते. काय घ्यायचं? काय शिकायचं? कसं रहायचं? ह्याबद्दलची स्वप्न असतात. हि wishlist थोडी थोडी करत पूर्ण करायला लागलो कि, आनंद आणि उत्साह दोन्हीही निर्माण होतात.  कष्ट करून थकलो, वैतागलो कि, हि 'wishlist' आठवावी.  पुन्हा कष्ट  करण्याची इच्छा निर्माण होते.  motivation मिळतं.

बरेचदा, आपल्या  मुलांची अशी wishlist आपणच बनवतो.  मग त्याचं स्वप्न आपलं स्वप्न होऊन जातं. आपण त्याच्या मागे लागतो. त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो धडपडत नाही म्हणून त्याच्यावर वैतागतो.  कित्येकदा, आपणच त्याला सांगून टाकतो. 'तुला गाडी घ्यायाचीये ना, मग आधी इंजिनियर हो.'  म्हणजे, 'तुला जे आवडेल ते मी करतो, मला जे आवडेल ते तू कर.'  वर आणि "आमची त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही. हे जे चाललंय ते त्याच्यासाठीच."  त्याची स्वप्नं, त्याच्या इच्छा त्याला पूर्ण करू द्या. सगळं तुम्हीच देत राहिलात तर 'motivation' येणार कसं?

काही महिन्यांपूर्वी एक मुलगा भेटला होता. cartoons काढण्याची आवड असणारा. त्याला तेच करायचं होतं.  पण बाबांना त्याने हा छंद जोपासावा आणि डॉक्टर व्हावं असं वाटे. त्याच्यासाठी बाबांनी एक wishlist बनवली होती.  बाबा त्याला सतत सांगत, 'मी रात्र-रात्र जागून अभ्यास केला. आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून दिवसभर काम केलं. पोटाला चिमटा काढून शिक्षण घेतलं. तू शिक. मी तुला असा त्रास होऊ देणार नाही.  तू अभ्यास कर.'  ते असं रोज सांगत. तो अभ्यास करताना जरा उठला कि त्याला हे ऐकवत. तो मित्रांना भेटून आला कि, घरांत अशा अर्थाचं lecture तयार असे. शेवटी तो वैतागला. म्हणाला, ' तुम्ही काम करून शिकलात ह्यांत माझा काय दोष? मी शिकणार नाही. मी दिवसभर काम करेन नाहीच जमलं तर उपाशी मरेन.  आता तुमची परिस्थिती चांगली आहे, तुम्हाला शिकायचं असलं तर शिका.'

त्या मुलामध्ये direct बोलण्याची हिम्मत तरी होती. कित्येकदा तीही नसते. मग मुलं फक्त आईबाबा म्हणतील तसंच वागणारे रोबोट बनतात. आईबाबा म्हणतात, "मला आतून वाटणारी उर्मी ह्याला कशी वाटत नाही?" त्याचं काय आहे, motivation उसनं मिळत नाही. 'माझ्याकडून थोडंसं घे', असं  म्हणून देताही येत नाही. 

Comments

Popular posts from this blog