आपल्या भावना इतरांना समजल्या नाहीत तर आपल्याला खूप त्रास होतो. त्या व्यक्तीचा खूप राग येतो. आपल्यांत आणि त्या व्यक्तीमध्ये अंतर पडतं. आपण त्या व्यक्तीला टाळू लागतो. आपल्याबाबतीत कसे गैरसमज करून घेतले हे सांगत राहतो. काहीकाळाने संवाद थांबतो.

कित्येकदा, आपण दुसऱ्यांवर काहीतरी टीका करून, त्यांच्याबद्दल judgment देऊन किंवा नाराजी व्यक्त करून मोकळे होतो. समोरचा  माणूस कोणत्या परिस्थितीतून जात असेल हा विचारच डोक्यात येत नाही. माणूस आपल्याला समजत नाही. तोही आपल्यापासून फटकून वागतो.

माणूस कोणत्या परिस्थितीतून जात असेल, हा विचार डोक्यात आणला तर मात्र आपल्याला माणूस चांगल्या प्रकारे कळू शकतो. हा विचार करणे म्हणजेच empathy. कुणाशीही मैत्री करण्यासाठी, नातं टिकविण्यासाठी, कामाच्या ठिकाणी खेळीमेळीने राहण्यासाठी empathy  अत्यंत आवश्यक गोष्ट असते.  इंग्रजीत एक वाक्य  आहे,

“Always put yourself in others' shoes. If you feel that it hurts you, it probably hurts the other person, too.”

दुसऱ्यांच्या बुटात पाय ठेऊन काही काळ चालून बघायला हवं. अगदी शब्दशः जमलं नाही तरी. दुसऱ्यांच्या ठिकाणी स्वतः:ला ठेऊन विचार करता यायला  हवा. हे काही जणांना बेमालूम जमतं. काहीजणांना मात्र त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात.  असा विचार करणं प्रत्येकासाठी आवश्यक असतं  हे मात्र नक्की.  

आपल्या वागण्यात empathy आणण्यासाठी जरा मोकळं होण्याची, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता  डोळ्यांवरची झापडं बाजूला सारून पाहण्याची गरज असते.  एकदा तुम्ही असं पाहू लागलात कि तुमच्या लक्षात येईल कि आपल्याला वाटतात तेवढे लोक मूर्ख नाहीत. त्यांच्या कृतीमागे त्यांची अशो काही कारणे आहेत, भावना आहेत आणि त्यांच्यासाठी त्या रास्त आहेत. एकदा तुम्ही ह्या विचारापर्यंत पोहोचलात कि, ती व्यक्ती तुम्हाला कळू शकते. एकदा ती कळू लागली कि मग राग, भांडण ह्या गोष्टी खूप वरवरच्या होऊन जातात. तुम्ही माफ करू लागता. 

एम्पथेटीक होताना काही अडथळे मात्र सतत येतात. सगळ्यांत मोठा अडथळा म्हणजे आत्मकेंद्रित असणे. 'स्व' चा विचार करणे काहीप्रमाणात बरोबर आहे. हा दृष्टिकोन तुम्हाला सतत जपतो.  पण त्याचा अतिरेक, 'मी म्हणेन तेच बरोबर', हा दृष्टिकोन तुम्हाला इतरांपासून हातभार लांब ठेवतो.  empathy  म्हणजे  स्वतः:च्या गरजा, स्वतः:चा दृष्टोकोन  जरा बाजूला ठेवणे . आजूबाजूच्या लोकांचा त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणे,

दुसरा अडथळा म्हणजे नीट न ऐकणे. आपल्याला नेहमी प्रतिक्रिया देण्याची घाई असते. त्यामुळे  आपण नीट ऐकतच नाही. बोलण्याबरोबर डोळे, शरीर ह्यांची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करतच नाही. त्यामुळे, स्वतः चच घोडं पुढे दामटले जाते आणि empathy लांबच राहते. एम्पथी म्हणजे स्वतः इतकंच महत्व दुसऱ्यांना  देणे,

दुसऱ्यांच्या भावना समजल्यानंतर, त्याची त्या माणसाला जाणीव होऊ देणे. त्याला त्याबद्दल appreciation देणे. आधार देणे,  त्याच्या त्रासातून बाहेर पडण्यास मदत करणे हासुद्धा empathyचाच  एक भाग आहे. बरेचदा, माणूस कळूनही ह्याबाबतीत मात्र आपण मागे राहतो. empathy मुळे संवादाची  सुरुवात होते आणि मैत्रीचीही.










Comments

Popular posts from this blog