१० वी-१२वी  च्या परिक्षांसोबतच आता सगळ्याच वर्गांच्या परिक्षा  जवळ आल्या आहेत. परिक्षेच्या  काळात मला सगळे आई-बाबा खूप टेन्शनमध्ये दिसतात. मुलांचा syllabus , timetable  तर पाठ असतोच, शिवाय धडे आणि कवितासुद्धा पाठ असतात. 

परवा, अशीच एक आई मला विचारत होती, 'मिहीकाचे science चे लेसन्स लर्न झाले का हो?'  मी म्हटलं 'हो, शाळेत teach केलं तेव्हाच तिला लर्न झालं, ' (आमच्या साठी लर्न म्हणजे शिकणे).  'तुम्ही तिला लगेच पेपर काढून देता का?' तिने पुन्हा विचारलं. मला प्रश्न नीटसा कळला नाही. पेपर मी कशाला काढून द्यायला हवा? ती धडा वाचते. त्यांत काय लिहिलंय ते मला सांगते.  त्यांतून तिला नवीन काय समजलंय ते आम्ही पाहतो आणि शिकतो. ह्यांत पेपरचा संबंधच येत नाही.  मी असं सांगितलं तेंव्हा त्या बाईला माझी दया आली. मला म्हणाली, 'अरेरे ! म्हणून मिहिका हुशार असून तिला मार्क्स मिळत नाहीत. मी सांगते, तुम्ही काय करा, टीचर देतात ना, तेवढंच फक्त करून घ्या. ते काही फार नसतं. मुलांना मग भरपूर मार्क्स मिळतात.' 

 हल्ली, शाळेतून,  जे प्रश्न परिक्षेला  येऊ शकतात ते आधीच दिले जातात. शिक्षकच पेपर बनवणार म्हणजे सगळं त्यांना माहितीच असणार. मग मुलांना तेच प्रश्न घेऊन एक प्रश्नपत्रिका काढून दिली जाते. पेपरच्या दिवसांपर्यंत आई किंवा बाबा, काहीवेळेस दोघंही बसून मुलासाठी पेपर काढतात. तो  मुलाच्या बरोबरीने बसून सोडवून घेतात. मग मुलांनी डोकं न चालवता तो दिलेला पेपर पाठ करायचा. त्यांत picture composition  साठी 'बर्थडे पार्टी' चे चित्र असणार हेसुद्धा मुलांना माहिती असते आणि बर्थ डे  पार्टीवरची ५ वाक्यं  तोंडपाठ असतात. पहिलीची मुलंसुद्धा दोन-दोन तास बसून असं पाठांतर करतात. तोच पेपर वारंवार लिहिण्याची प्रॅक्टिस करायची. जाऊन पेपर लिहायचा.   ते प्रश्न-उत्तरं आई-बाबांनासुद्धा  पाठ झालेले असतात. आई-बाबांना पेपर दिला तर १०० पैकी १०० मार्क मिळतील. 

आता माझी ट्यूब पेटली. "अभ्यास खूप बोरिंग असतो", असं अनेक छोट्या दोस्तांकडून मी ऐकलं होतं. मला त्याचं कारण समजलं. वाचन करण्यात मजा आहे, लेखनात मजा आहे,  विज्ञान तर गमतीजमतीने भरलेलं., इतिहास रंजक हे ह्या मुलांना कधी समजतच नाही.  कोणते लेसन्स, कोणते questions  आणि त्याचे answers. ह्यांतच सगळं म्हटल्यावर बोर होणारच ना? 

मला माझं बालपण आठवलं. 'आई माझा अभ्यास घेत नाही,' हि माझी नेहमी तक्रार असायची. 'तू अभ्यास घेतलास तर मला भरपूर मार्क्स मिळतील'. असं मी नेहमी म्हणायची. आई सरळ सरळ दुर्लक्ष करायची. "तुला तुझ्या योग्यतेप्रमाणे मार्क्स मिळतात", असं अधूनमधून म्हणायची.  माझी आई M. A. B. Ed. झालेली. त्या वयांत मला वाटायचं, 'हि शिक्षिका असून मला का शिकवत नाही?' मी काहीही विचारलं कि आई म्हणायची, "एकदा नीट वाच बरं. लक्ष देऊन वाच." मग म्हणायची, "आता ह्याच्यावर तुला काय वाटतं, ते सांग.नाहीतर असं कर लिहूनच काढ " मी अभ्यासाला बसल्यावर माझ्या बरोबरीने ती कधीच बसली नाही. मला कोणते धडे होते, कोणत्या कविता होत्या हे तिला अजिबात माहिती नसावं. 'तुझ्या भाषेत उत्तरं लिही, तुला जे समजलंय ते सांग.' एवढं मात्र नेहमी सांगत राहिली. हळूहळू वाचून बरचसं समजू शकतं हे कळलं. लिहून जास्ती समजतं हे हि कळलं. वाचनाशी संबधित आजूबाजूची उदाहरणे शोधता येतात हे कळत गेलं. आमच्या शाळेतूनही असे रेडीमेड पेपर्स नव्हते. "स्वत: उत्तर लिहा. गाईडमधलं उत्तर असेल तर  मार्क्स दिले जाणार नाहीत", अशी सूचना आधीच दिली जाई. पाठांतर असे, पण ते संकृत श्लोक, कविता, सूत्रे आणि पाढे एवढंच. 

आज जाणवतं, 'माझ्या आईने  माझा अभ्यास घेतला नाही, माझ्या शाळेतून तसा कधी दबावही आला नाही.   अभ्यास  कसा करायचा आणि कसं शिकायचं  हे मात्र आईने आणि शाळेने शिकवलं. ' मला ७५% पेक्षा जास्त मार्क्स कधीच पडले नाहीत पण अभ्यास मात्र मला अजूनही आवडतो. 

मी त्या आईला म्हणाले, "तिला मार्क्स नाही पडले तरी माझी काहीच हरकत नाही. तिला शिकता यायला हवं. अभ्यास आवडायला हवा. " 





Comments

Popular posts from this blog