काही दिवसांपूर्वी एक बाबा आले होते. आपल्या २५ वर्षांच्या मुलाची तक्रार घेऊन. त्याने कोर्स अर्धवट सोडला, लग्नाला तयार होत नाही अशा अनेक तक्रारी होत्या. बोलता-बोलता कळलं कि नेमकं काय करायचंय हे त्याला अजून कळतंच नाहीये. बाबा म्हणाले  B.Sc. कर म्हणून त्याने B.Sc  केले. बाबा म्हणाले, 'M.sc ला admission घेऊ म्हणून तेही घेतले.' पण झेपत नाहीये. अभ्यास होत नाहीये. आता बाबा म्हणतात लग्न कर बाकी सगळं मी बघतो. तुला माझ्या ओळखीने नोकरीला चिकटवतो. त्याला नेमकं काय करावं हे कळतंच  नाहीये.असं बरेचदा होतं. दोन सारख्याच पर्यायांमध्ये निवड करायची असेल तर असे होणे नॉर्मल आहे. त्यातही एखाद्या गोष्टीवर पाणी सोडता यायला हवं. परिणाम भोगण्याची तयारी दाखवायला हवी. 

 आपल्याला नेमकं काय हवंय हेच  कळत नसेल तर मात्र परिस्थिती अवघड आहे. काहीजणांना  आई म्हणेल ते किंवा बाबा म्हणतील तसंच करण्याची सवय असते. इतकी कि, ते लग्न करतानाही आई म्हणेल त्या मुलीशी किंवा बाबा सांगतील त्या मुलीशी/मुलाशी लग्नसुद्धा  करतात. 

'आई-बाबांचं ऐकणारी मुलं', म्हणून कौतुक होत असणाऱ्या मुलांच्यात बरेचदा निर्णयक्षमता नसते. एक तर निर्णय घेतल्यावर आई-बाबांना  दुखावण्याची भीती तरी वाटते किंवा नेमका कोणता पर्याय सोयीचा हे कळतंच नाही. 

कित्येकदा, काळजीपोटी आणि मुलांना फारसं कळत नाही असे वाटून मुलांच्या वतीने  आपणच निर्णय घेऊन टाकतो. कितीतरी आई-वडील तर लहानपणीच मुलाच्या करियरचा निर्णय घेऊन मोकळे होतात. मुलांच्या मनावर ते प्रयत्नपूर्वक बिंबवलं जातं. त्याला सगळं मिळतं, पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसतं. 

मुलाने कोणता शर्ट घालावा, कधी जेवावं, कधी अभ्यास करावा, कधी खेळावं हे सगळे निर्णय आई-बाबाच घेतात. मग जेव्हा निर्णय घेण्याची वेळ मुलांवर येते तेव्हा मुलं गडबडतात. गोंधळतात. घाबरतात. मला खरंच कळेल का? हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आपल्याला काही कळत नाही, हे जणू काही त्यांनी मान्यच केलेलं असतं. त्यांच्यात आत्मविश्वासच नाही अशी तक्रारही काहीवेळेस केली जाते. 

मुलं जेव्हा मोठी होत असतात तेव्हा शाळेच्या अभ्यासासोबत, लिहिणे-वाचणे शिकविण्यासोबत, डिग्री मिळविण्यासोबत निर्णय कसे घ्यायचे हे  शिकविणे फार महत्त्वाचे असते. तो शिक्षणाचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणायला हवा. दुर्दैवाने,  हा उद्देश बरेचदा दुर्लक्षितच राहतो. 

Comments

Popular posts from this blog