शापित मी तगमगतो...
ह्या माझ्या पंखांनी उडण्याचे वेड दिले
पण माझ्या हातानी घरटे हे निर्मियले
पण माझ्या हातानी घरटे हे निर्मियले
जगण्याची ओढ अशी, उडण्याचे वेड असे
घरट्याच्या लोभातही, गगनाचे दिव्य पिसे
घरट्याच्या लोभातही, गगनाचे दिव्य पिसे
व्योमातून उडताना ओढीतसे मज घरटे
अन उबेत घरट्याच्या क्षुद्र तेच मज गमते
अन उबेत घरट्याच्या क्षुद्र तेच मज गमते
हे विचित्र दु:ख असे घेउनी उरी मी जगतो
घरट्यातून, गगनातून शापित मी तगमगतो
घरट्यातून, गगनातून शापित मी तगमगतो
मंगेश पांडगावकरांची हि कविता वाचली कि, मला नोकरी आणि घर अशी दुहेरी कसरत करणारी आई दिसते. असंख्य आई अशा तगमगत दिवस काढत असतात. आपला जीव पाळणाघरांत सोडून जाताना, कुठेतरी दु:खी होत काम आवारत असतात. मग मुलाला पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून स्वत:च नाराज होतात. अशातच, जर मुलांच्या अभ्यासातून, वागण्यातून काही चिंताजनक गोष्टी आढळल्या तर अपराधी भावनेने ग्रासल्या जातात. मी चांगली आई नाहीये का? करियरकडे लक्ष देऊन चूक करतीये का? असे प्रश्न मनात डोकावू लागतात. पण मग नोकरी हि गरज असते, आर्थिक आणि काही वेळेस मानसिकसुद्धा.
बरं, फक्त नोकरी करणाऱ्या आईच्या बाबतीत हे होतं असं नाही.
सुशिक्षित आणि पूर्वी नोकरी करणाऱ्या पण आता मुलांसाठी घरी असाणाऱ्याची वेगळीच घुसमट असते. आपलं पूर्वीचे स्वतंत्र असणे, छान दिसणे आणि आत्मविश्वासाने वागणे कुठेतरी हरवलंय असं त्यांना वाटू लागतं. मग एकेकाळच्या आपल्याच गुणांना आपण आज वाव देत नाही आहोत असंही वाटू लागतं. मग मुलांना सांभाळण्याचे काम तरी परफेक्ट व्हायला हवं, असं वाटत राहते. perfection चा हा अट्टहास खूप त्रासदायक ठरतो. 'मी कुठे कमी पडतेय,' हा प्रश्न सतावत राहतो. मी कमी पडायला नको, म्हणून प्रयत्न सुरु होतात. मग मुलांच्या शारीरिक गरजा, अभ्यास, मानसिक विकास ह्या गोष्टी खूप मनावर घेतल्या जातात. थोडं कुठे कमी पडलं कि स्वत:लाच दोष देणं सुरु होतं.
हल्ली, जेंव्हा आई, मुलाला घेऊन किंवा एकटी मला भेटण्यासाठी येते तेंव्हा अपराधी भाव मलाच टोचून जातो.
असा अपराधी भाव मनात येणं म्हणजे स्वत:लाच शिक्षा करून घेणं. हि शिक्षा करून घेण्यासारखं आपण खरंच काही केलंय का? हा विचार करायला हवा. बरेचदा, आपल्याकडून नकळत काही गोष्टी घडलेल्या असतात. त्याबद्दल वाईट वाटणं, ठीक आहे पण अपराधी वाटणं हि त्याच्या खूप पुढची पायरी आहे. मुळांत मुलांना येणाऱ्या समस्यांसाठी फक्त आईच जबाबदार असते का? हा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा. मुलांवर आई-बाबांच्या वागण्याचा, व्यक्तिमत्त्वाचा परिणाम होतो पण मुलांवर परिणाम करणारा हा एकमेव घटक नाही, हे लक्षात घ्या. चूक सुधारण्यासाठी काय करता येऊ शकतं ह्याचा विचार आपण नक्कीच करू शकतो.
इतरांशी तुलना करून बरेचदा, आपण आपल्या अपराधी भावना वाढवत असतो. त्यामुळे, स्वत:ला स्वीकारायला हवं. काही गोष्टी सोडूनच द्यायच्या असतात, हे लक्षात ठेवायला हवं.
अपराधी भावनेतून बाहेर पडल्यावर आपल्याला समस्यांवरचे मार्ग दिसू शकतात. मग आपण स्वत:ला शिक्षा करून घ्यायची का? कि काही चुका होतात, असं म्हणून स्वत:ला माफ करत अडचणींवर मार्ग शोधायचा हे ज्याचं-त्यानेच ठरवायला हवं.
वसुधा
Comments
Post a Comment