"माझ्या मुलीला ना, कोणी काही बोललेलं सहनच होत नाही, खूप sensitive आहे ती, लगेच रडते. म्हणून आम्ही तिच्यावर अजिबात ओरडत नाही. आता काल teacherने तिला उगाचच शिक्षा केली. त्यामुळेच मी आज शाळेत आले, म्हटलं, डायरेक्ट Principal लाच भेटावं " माझ्या मुलीच्या मैत्रिणीची आई सांगत होती. हे ऐकणारी, जवळच बसलेली माझी मुलगी म्हणाली, "अगं सगळ्या क्लासलाच उभं राहण्याची punishment दिली होती. आम्ही सगळेच दंगा करत होतो. मग टीचर क्लासमध्ये नसताना नाही तर कधी दंगा करायचा? केलं तर केलं punish एवढं काय त्यांत? " त्या बाईला माझ्या मुलीच्या निगरगट्टपणाची काळजी वाटू लागली आणि मला तिच्या मुलीची.
अशी बरीच मुलं असतात. छोट्या-छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात. खूप रडतात. स्वत:लाच त्रास करून घेतात. आई-वडिलांना अशा मुलांचं खूप कौतुक असतं. हि मुलं शक्यतो, आपणहून दुसऱ्यांच्या वाटेला जात नाहीत. नियम मोडत नाहीत. भांडत नाहीत. दंगा करत नाहीत.
मग कधीतरी ह्यांच्याकडून झालेल्या छोट्याश्या चुकीसाठी शिक्षक ओरडले, किंवा सगळ्या वर्गाबरोबर ह्यांनाही शिक्षा झाली कि मग ती खूप रडतात. मनाला लावून घेतात. कुणी ह्यांच्याशी भांडायला आलं, कि मुळूमुळू रडत घरी येतात. बरेचदा, आईवडील मग कंबर कसून भांडणात उतरतात. कधी न कधी मुलांना एकटे सोडायचे आहे हे आईवडीलच विसरतात. मुलं अजूनच safe राहण्याच्या प्रयत्नात असतात. आईच्या पाठीमागे लपू लागतात. दुबळी होत जातात. अशी दुबळी मुलं मग सगळ्याच बाबतीत रडी होत जातात. म्हणजे, त्यांना धड सहन करता येत नाही आणि धड स्वत:च्या हक्कासाठी भांडताही येत नाही. त्यांना सतत कुणाचातरी आधार हवा असतो. हा आधार सुटला कि ती सैरभैर होतात.
मला वाटतं, मुलांना (आणि मुलींनासुद्धा) कणखर बनवणे, काहीसे निगरगट्ट बनवणे मुलांसाठी फायद्याचं असतं. आई-वडिलांकडून मिळणारा आधार अशावेळी थोडासा मर्यादित ठेवायला हवा. मुलांची लढाई त्यांना लढू द्यायला हवी. नव्हे, त्यासाठी त्यांना तयार करायला हवं.
वसुधा
Comments
Post a Comment