TV pahava ka?

हल्ली मुलांचं  आणि टीवीचं  खूप घट्ट  नातं  निर्माण झालंय. काही घरांमध्ये हि एक चिंतेची बाब ठरते आहे. मुलाचं अभ्यासाकडे होणारं  दुर्लक्ष, वागण्यात येणारा जास्तीचा शहाणपणा ह्या गोष्टींचं  खापर नेहमीच tv वर फोडलं जातं. मुलांसाठी तर छोटा भीम, उगी, मोटू-पतलू, टोम अंड जेर्री  हि रोज भेटणाऱ्या  सवंगड्याची नावं झाली आहेत; आणि निरनिराळ्या मालिकांचे title songs परीक्षेला असणाऱ्या कवितांसारखे मुखोद्गत झाले आहेत. 

स्वत:ला जरा वेळ मिळावा, शांतता मिळावी, कामं  उरकता यावी, मुलाने जरावेळ तरी शांत बसावे म्हणून थोडक्यात, आपल्याला त्रास नको म्हणून आपणच त्यांना tv लावून देतो. मुलं त्यात रमतात सुद्धा. मग खाताना tv, झोपताना tv  हे चक्र सुरु होतं. काही घरांमध्ये tv वरून आजी-आजोबा आणि मुलं ह्यांच्यात वादही रंगतात असं मी ऐकलंय. काही काळानंतर आपला मुलगा/मुलगी  जरा जास्तच tv पाहतो ही  आई-बाबांसाठी काळजीची गोष्ट होत जाते. 

मग परीक्षेच्या काळांत tv बंद. किंवा tv  कायमचाच बंद अशी भूमिका आई-बाबा घेतात. त्याचा परिणाम किती होतो ह्याबाबत मला जरा शंका आहे. मुलांनी tv पहावा का? किती पहावा ह्या बाबतीत आई-बाबा जरा गोंधळलेलेच असतात. संशोधनातून असं सिद्ध झालं आहे कि, अगदी लहान वयात tv  पहिल्याने मन एकाग्र करण्यात अडचणी निर्माण होतात. रागावर नियंत्रण नसणे, tv चे व्यसन अशा समस्यानाही मुलं तोंड देतात. म्हणूनच,मुलांनी tv पाहू नये असं सर्वच मोठी माणसे सांगतात. मुलांनी tv पाहू नये असं म्हणताना त्यांना स्वत:ला मात्र tv ची खूप गरज असते. मग जगाशी संपर्कात राहण्यासाठी, करमणुकीचं साधन म्हणून tv  कडे पाहिलं जातं. हीच भूमिका मुलांच्या tv पाहण्याबाबत ठेवली तर प्रश्न खूप सोपा होतो. 

tv वर जसे मुलांना बिघडविणारे कार्यक्रम असतात तसेच घडविणारेही. असंख्य गोष्टींची माहिती tv वरून मुलांना मिळू शकते. audio -visual माध्यमातून मिळाल्यामुळे चटकन लक्षातही राहते. कुतूहल शमविले जाते आणि निर्माणही होते. एखादी चांगली कलाकृतीही मुलांपर्यंत पोहोचवता येऊ शकते. मुलांशी गप्पा मारताना ह्या कार्यक्रमांवर चर्चाही होऊ शकते.  

आपण tv हि मानवनिर्मित गोष्ट आहे आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याच हातात आहे हे विसरतो. ह्याचा अर्थ मुलांनी सकाळी उठल्यापासून tv पहावा असा मात्र नक्कीच नाही. तज्ञांच्या म्हणण्यानुसार १ तासापेक्षा जास्त tv समोर किंवा कोणत्याही स्क्रीन समोर बसणे मुलांच्या विकासासाठी घातक आहे. मुलांच्या वयानुसार, दिनचर्येनुसार tv  पाहण्याची वेळ कार्यक्रम आपण नक्कीच ठरवू शकतो. कित्येक घरांमध्ये tv वरच्या मालिका मुलं आई-बाबांच्या बरोबरीने पाहतात. त्या खरंच मुलांनी पाहण्यासारख्या आहेत का (नव्हे मोठ्यांनी पहाव्यात अशा तरी आहेत का?) ह्याचा विचार आपण करायला हवा.  कार्टूनस   पाहतानाही मला बरेचदा हाच प्रश्न पडतो.

अमुक एक कार्यक्रम चांगला किंवा अमुक वाईट असंही नाही. त्यातून आपली मुलं काय शिकतायत, त्यांना काय कळतंय आणि काय मिळतंय हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे.

TV पाहताना आणि पाहण्यापूर्वी विचारांत घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे मुलांचे मैदानी खेळ आणि छंद, अभ्यास ह्या गोष्टी. ह्या गोष्टींना TV पेक्षा किंचितसे जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक गोष्टी आहेत.  मुलांच्या शाळेच्या बाबतीत, मित्र-मैत्रिणींच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत आपण खूप चोखंदळ असतो. हाच चोखंदळपणा मुलं tv वर काय पाहतायत ह्या बाबत दाखवायला हवा, नाही  का?

वसुधा देशपांडे-कोर्डे
(Clinical Psychologist )
Mind Master  Counsellors, pvt. Ltd .
९२२५५०५३६९




Comments

Popular posts from this blog