" "राग"- नेहमीच धिक्कारली जाणारी एक भावना. राग येणं  म्हणजे नेमकं काय? तुमच्या  अस्तित्वावर केल्या गेलेल्या हल्ल्याला तुम्ही  दिलेली प्रतिक्रिया म्हणजे राग.  रागाचा राग यावा असं खरंतर रागात काहीही नाही. किंबहुना थोड्याफार प्रमाणात राग येणं हे मानसिक आरोग्याचं लक्षण आहे. कधी कमी तर कधी  जास्त राग येणं हे नैसर्गिक आहे. असं असूनही रागाचा धिक्कार का केला जातो? ह्याचं  उत्तर आहे राग व्यक्त करण्याची पद्धत. 

माणूस जेव्हा रागावतो तेव्हा तो स्वत:ला किंवा दुसऱ्याला  त्रास होईल अशा प्रकारे वागतो. हे दुखावलं जाणं शारीरिक किंवा शाब्दिक असू शकतं.  दुखावल्यामुळे नाती ताणली जातात. ह्यावर उपाय म्हणून राग दाबून ठेवला जातो.  आणि मग तो कुठल्या न कुठल्या तरी स्वरूपात एकदम बाहेर पडतो.  अनेक शारीरिक आजारांना कारणीभूत ठरतो. 

खूप जास्त ताण, निराशा, थकवा ह्या गोष्टीही राग येण्यास कारणीभूत ठरू शकतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडचिड होऊ लागली कि समजावं, आपल्याला आरामाची गरज आहे. एखादी गोष्ट खूप प्रयत्न करूनही जमत नसेल आणि करावीच लागणार असेल, तरीही, चिडचिड होतेच. हि चिडचिड मग आजूबाजूच्या लोकांवरती, हातात असणाऱ्या वस्तूवर किंवा कशावरही व्यक्त होते. बरेचदा आपल्या चिडचिडीचं  नंतर वाईट वाटतं. हे वाईट वाटणं टाळण्यासाठी सुद्धा राग दाबून ठेवला जातो. तो व्यक्त करायचा कि नाही ह्याबद्दल आपण नेहमीच साशंक असतो. 

 इतर कोणत्याही भावनांप्रमाणेच "राग" ही एक भावना आहे.  राग व्यक्त करायला हवा.  आपला राग व्यक्त करायचा म्हणजे दुसऱ्यांचा  अपमानच करायचा असे नाही. आपल्याला जेव्हा एखाद्याचा राग आलेला असतो तेव्हा तो, त्या  व्यक्तीचा नाही तर तिच्या कृतीचा राग असतो.  राग हा माणसाला न दुखावता चांगल्या शब्दात व्यक्त केला जाऊ शकतो.  त्या साठी आधी आपल्याला रागाची सुरुवात झाली आहे हे ओळखू यायला हवं .  त्यानंतर लगेचच तो राग शांत करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. राग यायला लागल्यानंतर १ ते १० आकडे मोजा असं नेहमी सांगितलं जातं. बरेचदा श्वासावर लक्ष केंद्रित केल्यानेही राग शांत होतो. 

आपल्याला नेमका कोणत्या गोष्टीचा राग आलाय, येतोय ह्याचं भान असायला हवं. ज्या गोष्टीचा राग येतोय ती गोष्ट शब्दांत  व्यक्त करता यायला हवी. राग शांत झाल्यानंतर हि गोष्ट आपण इतरांपर्यंत सहज पोहोचवू शकतो. त्यालाच नाराजी म्हणूयात. "अमुक एक गोष्ट मला आवडली नाहि." एवढ्या साध्या शब्दात तुम्ही ती समोरच्या पर्यंत सहज पोहोचवू शकता. 

नाराजी इतरांपर्यंत पोहोचविण्याचे कारण इतकेच, कि हि नाराजीच नातं तोडण्याचे काम करते. नाराजी साठवत ठेवून एखाद्या दिवशी आपण समोरच्यावर( जिचा राग आलाय त्या व्यक्तीवर) " तू नेहमीच असा वागतोस/ वागतेस," असा आरोप करतो.  आपण एवढे दिवस चुकीचं  वागत होतो  हे त्या व्यक्तीला कळलेलंही  नसतं. ती व्यक्ती  दुखावली जाते. आणि तिथून पुढे नात्यातला मोकळेपणा संपतो.    सुरुवातीला अजिबात न भांडणारे नवरा-बायको काही वर्षांनी एकमेकांच्या जिवावर उठतात.  वर्षानुवर्षे शांत असलेली सून अचानक रणचंडि केचा  अवतार धारण करते.

कितीतरी जणांना आपल्यावर कुणीतरी रागावलं आहे, हि कल्पनाच सहन होत नाही. "रागवण्यासारखं मी काहीच केलं  नाही", असा त्यांचा हेका असतो.  हि भांडणाची सुरुवात असू शकते. इतरांच्या रागावर न रागावता तो समजून घेणं बरेचदा गरजेचं असतं. नाहीतर  नातं तुटू  शकतं. 

 आपल्या आयुष्यातल्या  कितीतरी सुंदर नात्यांना आपण अशाप्रकारे हरवून बसतो.  म्हणजे, खरंतर , राग नाही पण राग, नाराजी मनात ठेवण्याची वृत्ती त्रासदायक असते.  नातं जपायचं  असेल तर राग योग्य प्रकारे  ताब्यात ठेवायला हवा आणि नाराजी वेळच्या वेळी व्यक्त व्हायला हवी. 
"Holding on to anger is like grasping a hot coal with the intent of throwing it at someone else; you are the one who gets burned." - Buddha

वसुधा देशपांडे-कोर्डे 
(Clinical Psychologist )
Mind Master  Counsellors, pvt. Ltd . 
९२२५५०५३६९

Comments

Popular posts from this blog