मुलांना वाचनाची सवय कशी लावायची? हे आपण मागील लेखात पहिले. वाचन, लेखन, स्मरण, आकलन ह्या सर्वच गोष्टींसाठी अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे मन एकाग्र करता येणे. लक्ष देऊन केलेली कोणतीही गोष्ट उत्तमरित्या  कळते आणि लक्षातही राहते. ती गोष्ट सातत्याने करणे हेही अभ्यासासाठी आणि खेळासाठीही आवश्यक असते. 

बरेचदा मुलांना मन एकाग्र करताना अडचणी येतात. अभ्यासाला बसल्यानंतर बाहेर खेळायला जावेसे वाटते, दुसरेच काहीतरी आठवते.  सतत चुळबुळ सुरु असते, हात-पाय हलत असतात.  वर्गात एका जागेवर बसायला अवघड जाते, शिकवताना थोड्याच वेळात लक्ष विचलित होते, छोट्या-छोट्या गोष्टी, शाळेचा अभ्यास विसरतो, शब्द लिहिताना काना-मात्रा विसरून राहते, गणितामध्ये हमखास कोणत्यातरी आकड्यापुढे  शून्य विसरतो. ह्या सगळ्या  गोष्टी घडतात त्या मन एकाग्र न करता येण्यामुळे. हि मुलं  खूप impulsive  असू शकतात. बरेचदा, अतिचंचल आणि impulsive  असल्यामुळे भांडणं, मारामाऱ्या  ह्या गोष्टीही ठरलेल्या असतात. 

अशी चुळबुळ  करणारी मुले ही  आई-बाबांसाठी आणि शिक्षकांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरतात. त्यांचा अभ्यास घेणं  आई-वडिलांसाठी आव्हान असतं. शिक्षकांच्या सततच्या तक्रारींनादेखील तोंड द्यावं  लागतं. परिणामी, सगळ्यांचा ओरडा आणि शिक्षा ह्या मुलांना चुकत नाही.  "मुद्दामच लक्ष देत नाही", असा आरोप मुलांवर केला जातो. ह्या चुळबुळ करण्यामागे किंवा लक्ष न देण्यामागे मुलांचा दोष असतो का?

मन एकाग्र न करता येणे किंवा सतत हालचाल करणे हि एक मेंदूच्या विकासाशी संबधित समस्या आहे. त्याला ADHD  म्हणजेच attention  deficit  and  hyperactivity  disorder  असं म्हणतात. ह्या मुलांची मेंदूची रचना ९०% मुलांपेक्षा वेगळी असते. लक्ष एकाग्र न करता येणे आणि एका जागेवर न बसता येणे हि त्यांची समस्या असते. ह्यात त्या मुलांचा काहीच दोष नसतो.  ती मन एकाग्र करत नाहीत कारण करू शकत नाहीत. एका जागेवर बसत नाहीत कारण बसू शकत नाहीत. ह्यांच्या डोक्यात एकाच वेळी ४-५ गोष्टी चालू असतात.

हि समस्या असण्याची अनेक कारणे सांगितली जातात. म्हणजे, हि समस्या अनुवांशिक असू शकते, खूप लहान वयात tv पाहण्यामुळे हि समस्या निर्माण होऊ शकते, मैद्याचे पदार्थ, चोकलेट  ह्या मुळे मुलं अतिचंचल होतात, अशी कितीतरी कारणे  आहेत.  नक्की कारण कोणते ह्याबद्दल अजूनही संशोधन सुरु आहे. पण कारण शोधण्यापेक्षा त्यावर उपाय करणं जास्त योग्य आहे. 

ह्या मुलांना रोजच्याच गोष्टीमध्ये नाविन्य देण्याची गरज असते. मोठे-मोठे धडे छोट्या परिच्छेदातून त्यांच्यापुढे ठेवणे. वाचण्यापेक्षा cd चा वापर करून ऐकून आणि पाहून शिकविणे आवश्यक असते. त्यांची चुळबुळ समजावून घेणे आणि थोड्या-थोड्या वेळाने break देत अभ्यास करणे हि पद्धतही मुलांना फायद्याची ठरते.  त्यांना शिकवताना शक्यतो शांत, छोट्या जागेत शिकवणं फायद्याचं  ठरू शकतं. 

ह्या मुलांची अतिचंचलता कमी करण्यासाठी routine ठरवणे आणि ते पाळले जाणे खूप गरजेचे असते. भांडण-मारामारी कमी करण्यासाठी behavior modification म्हणजेच कसं वागायचं, कसं  बोलायचं, राग कसा आवरायचा  ह्याचं शिक्षण देणं गरजेचं  असतं.  

इतर मुलांप्रमाणेच ह्या चुळबुळ करणाऱ्या मुलानाही आपलं कौतुक व्हावं असंच वाटतं . आपल्याला शिक्षा व्हावी अशी त्यांचीही इच्छा नसते. त्यांना समजावून घेऊन, त्यांची समस्या ओळखून त्यांना मदत करणं जास्त गरजेचं  आहे. "ती मुलं त्रास देतात ह्यापेक्षा त्यांनाही त्रास होतो", हे लक्षात घ्यायला हवं. 


वसुधा देशपांडे-कोरडे 
(clinical psychologist)
Mind Master Counsellors, pvt. ltd.) 
९२२५५०५३६९

Comments

Popular posts from this blog