मुलांना कसं वाढवायचं? कसं शिकवायचं? काय शिकवायचं? ह्याबाबतीत अगदी सहज मार्गदर्शन उपलब्ध आहे. हल्ली नुकत्याच आई झालेल्या किंवा लवकरच आई होणार असणाऱ्या मुलीही ह्या बाबतीत विचार करतात. मुलाला काही कमी पडू नये, आणि मुलंही कुठे कमी पडू नयेत म्हणून तत्पर असतात. पुस्तकांत किंवा लेखांमध्ये दिलेली आदर्श  पालक होण्यासाठीची तत्वे पाळण्याचा पूर्ण  प्रयत्न  होतो. तरीही,  आपल्याला हवं तसं  'आदर्श'  आपल्याला वागता येत नाही, अशी बोचणी मनाला लागून राहते. 

 'मुलांना स्वत:च्या गोष्टी करू द्याव्या,' असं मानसशास्त्र सांगते पण किती प्रमाणात हे सांगत नाही. मुलांशी प्रेमाने वागा असंही सांगते पण तरीही चिडचिड होते, हात उचलला जातो. मुलांना निर्णय घेऊ द्या असं सांगितलं जातं, पण नाही म्हटलं  तरी सूचना दिल्या जातातच.  मार्गदर्शक तत्वे अमलात आणणे फार कठीण जातं. आणि आई बाबांना आपण आदर्श  होऊ शकत नाही ह्याचं बरेचदा वाईट वाटतं. काही पालक जाणीवपूर्वक स्वत:च्या वागण्यात बदल करण्याचा प्रयत्न करतात. पण पूर्णपणे स्वत:ला बदलता येत नाही ह्याचं वाईट वाटत राहत. 

मुळात आदर्श पालक होण्याची धडपड असते ती आदर्श मुलं घडविण्यासाठी. कुठेतरी आपण वाढलो तसं मुलांना वाढवायचं नाही असं  आपण ठरवलेलं असतं.  आपण कमी पडलो तिथे मुलांनी कमी पडू नये अशी इच्छा असते.  आपल्याला आपलं मुल जिद्दी, मेहनती, स्वावलंबी, हुशार,  आत्मविश्वास  असणारे  असावं असं वाटत असतं त्याचवेळी त्याने आपलं  सगळं ऐकावं, त्याला आपण सगळं द्यावं, हट्टीपणा करू नये असंही वाटत असतं.  त्याने नक्की काय करावं ह्या बद्दल आपणच गोंधळलेलो असतो.

एक आदर्श पालक होण्यापूर्वी, आपण एक व्यक्ती म्हणून स्वत:चा अभ्यास करायला हवा. पूर्णपणे स्वत:ला बदलणं शक्य नाही हे लक्षात घ्यायला हवं.  जसं  मुलांना आहे तसं स्वीकारणं गरजेचं असतं तसंच स्वत:लाही स्वीकारणं आवश्यक असतं. एखादी  गोष्ट मुलांना देता न येणं, किंवा मूल कुठेतरी कमी पडणं ह्यात मनाला लावून घेण्यासारखं खरंच काही आहे का ?   ह्याचा विचार एकदातरी करायला हवा. 

कधीतरी उगाचच  चिडचिड होणं,  राग  येणं एक माणूस म्हणून सहज शक्य आहे. इतर कुठलातरी राग मुलांवर काढणं जेवढं चुकीचं तेवढंच मुलांवरचा राग इतर ठिकाणी काढणं हेही चुकीचंच नाही का? मुलांना स्वीकारायचं म्हणजे रागवायचं  नाहीच का? राग, प्रेम, ह्या भावना कोणत्याही माणसाला चुकणाऱ्या  नाहीत.  आईला कधीतरी मुलांचा राग  येणं, कंटाळा येणं  साहजिकच आहे.  ह्या गोष्टी मान्य करायला काय हरकत आहे? मान्य केल्यानंतरच त्यावर उपाय करणं शक्य आहे. 

आदर्श होण्यापेक्षा किंवा अजिबात न चुकण्यापेक्षा आपण चुकलो कि माफी मागणं जास्त सोपं नाही का? आई-वडील झालो म्हणजे आपण कुणीतरी फार मोठे झालो, आता आपलं काहीच चुकणार नाही, चुकायला नको. हा विचार आपल्याला चुकल्यानंतर येणारी अपराधी भावना देतो.  मग जरासं  चुकलं  कि, आई-वडील ‘माझं चुकलं’, हा पाढा वाचू  लागतात. आई-वडीलसुद्धा माणूस आहेत आणि चुकू शकतात हेच विसरतो.

मुलाला घडवणं हे पालकांचं काम नाही. तुम्हाला पाहून ती आपोआपच घडत असतात.  तुमच्या वागण्याचं अनुकरण करतात. त्याचबरोबर निरनिराळे संदर्भ लावत असतात.  आपली मुलं  आपली प्रतिकृती होत नाहीत पण ती आपल्या वागण्यातून नक्कीच शिकतात. त्यांनी काहीतरी शिकावं  असं आपलं वागणं असावं, पण आदर्शाचा अट्टहास नसावा.  

आदर्श होण्यापेक्षा संवाद साधण्याला महत्व दिलं गेलं तर आई-वडील म्हणून नक्की कसं वागावं ह्या समस्येचं उत्तर नक्कीच मिळू शकेल. मुलाला सगळं येण्यापेक्षा, आपण आदर्श आहोत असं इतरांना किंवा स्वत:ला वाटण्यापेक्षा, मुलाला ओळखता येणं, संवाद साधता येणं, मुलालाही मोकळेपणाने तो साधावासा वाटणं  म्हणजेच त्याचे आई-बाबा होता येणं, नाही का? 







Comments

Popular posts from this blog