मुल रडायला लागलं कि, आई, बाबा, आजी, आजोबा आणि घरात असतील तेवढे सगळे त्याला शांत करण्याच्या मागे लागतात. त्याचं मन दुसरीकडे रमवणं, त्याला हवी ती गोष्ट आणून देणं असे अनेक प्रयत्न केले जातात. जरा मोठी म्हणजे भाषा कळू शकणारी मुलं रडू लागली कि त्यांना रागावलं जातं. "आवाज बंद, रडायचं नाही", अशा शब्दात त्यांना गप्प केलं जातं.
मुलांनी रडणं हि गोष्ट बरेचदा आई-बाबांना कमीपणाची वाटते किंवा त्यांच्या रडण्याचा आई-बाबांना त्रास होत असतो. आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या डोळ्यात पाणी येणं फारच मनावर घेतलं जातं. एकंदरीतच मूल रडू नये म्हणून सर्वपरीने प्रयत्न केले जातात. मुलांचं किंवा मोठ्यांचं रडणं खरंच वाईट असतं का? शास्त्रीय दृष्टीने विचार केला तर रडणं हे येणारा ताण कमी करण्यासाठी मदत करणारं ठरतं. म्हणूनच, वाईट वाटून घेण्यासारखं रडण्यामध्ये काहीच नाही. उलट, रडणं म्हणजे मोकळं होणं, दु:ख दूर होणं.
लहान मुलांच्या रडण्याची निरनिराळी कारणे असू शकतात. अगदी तान्ही बाळं जेव्हा रडतात तेव्हा ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. भूक लागलीये, दुखतंय, टोचतंय किंवा असंच काहीतरी. त्यांचं रडणं हि त्यांची भाषा असते. ती समजून घेऊन मुलाला comfortable करण्याचा प्रयत्न सगळेच आई-बाबा करतात.
मुलं जरा मोठी झाली आणि भाषा वापरू लागली कि त्यांचं रडणं बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. भाषा समजू शकणारी आणि बोलता येणारी मुलं जेव्हा रडतात तेव्हा त्यांच्या भावना, ताण तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतात. काहीवेळेस मूल उगाचंच रडतंय असं वाटू शकतं. पण ते रडणं उगाच नसतं त्याच्यामागे काहीतरी कारण नक्कीच असतं.
काहीवेळेस अगदी क्षुल्लक कारणावरून मूल खूप रडतं. "ह्यात काय रडण्यासारखं?" असं म्हणून मुलाची टिंगल केली जाते. अजून चिडवलं जातं. हे क्षुल्लक कारण म्हणजे तात्कालिक कारण असतं त्यामागे ताणाची, भीतीची, दाबल्या गेलेल्या भावनांची मालिकाच असू शकते.
हट्ट करणारी आणि हट्ट पूर्ण झाल्याशिवाय रडणं न थांबविणारी मुलं लाडावलेली, बिघडलेली असतात असाही एक समज आहे. खरंतर त्यांचं रडणं थांबावं म्हणून आई-वडिलांनी किंवा आजी-आजोबांनी त्यांच्यापुढे शरणागती पत्करलेली असते. कुठलीही गोष्ट हवी म्हणून हट्ट करणाऱ्या मुलांना खरंतर तुमचं लक्ष देणं हवं असतं. त्यांच्या गरजेपेक्षा कमी लक्ष देण्यामुळे ती त्रासलेली असू शकतात. किंवा स्वतंत्रपणे कुठलीही गोष्ट करायला नाकारणे, रागावणे हेही हट्टीपणा करण्यामागचे कारण असू शकते.
बरेच जणांना असं वाटतं कि, मुलांना कसला आलाय ताण? त्यांना काय समजतं? आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या नकारात्मक गोष्टी, चिडचिड, वाद, आईला असणारा ताण, आई-बाबांना पुरेसा वेळ नसणं, आई आपल्याकडे लक्ष देत नाहीये असं वाटणं, अचानक झालेला बदल, कडक शिस्त अशा कितीतरी कारणांनी मुलांना ताण जाणवतो. तो त्यांना व्यक्त करू देणं फार गरजेचं असतं.
रडणाऱ्या मुलांना रडू द्यावं. व्यक्त होऊ द्यावं. त्यांच्या भावना शब्दात व्यक्त करण्यासाठी त्यांना मदत करावी. मूल रडत असताना त्याला वेगळ्या खोलीत घेऊन जाणे, त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटत त्याच्या भावनांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे. तुला वाईट वाटलं का? खूप दुखतंय का? असं विचारत संवाद साधण्याचा प्रयत्न करणे खूप आवश्यक असतं. 'रडू नको', 'केकाटायला काय झालंय?' असं म्हणणं किंवा 'एवढं काही रडण्यासारखं झालं नाही', असं म्हणत हेटाळणी करणं शक्यतो टाळावे. मुलं रडत असताना हसून चेष्टा करणंही दुरावा वाढवणारं ठरू शकतं.
मूल रडत असताना शांतपणे त्याचं म्हणणं समजून घेणं, त्याला धीर देणं, त्याच्या भावना जाणून घेणं, तुमच्यापुढे व्यक्त होऊ देणं हि एका सुसंवादाची सुरुवात ठरू शकते.
Comments
Post a Comment