सजीवं दहते चिंता


आपण सर्वचजण कधी न कधी तरी काळजीत असतो. परीक्षा, अवघड काम, आयुष्यातले महत्त्वाचे  निर्णय ह्या बद्दल सर्वांनाच कधी न कधी काळजी वाटते. आपल्या जवळच्या माणसाचे आरोग्य, पैसे ह्याबाबतही बरेचजण चिंतेत असतात. पण काही जण मात्र असे काही नसले तरीही काळजीत असतात. काळजी करण्यासाठी त्यांना कोणतंही निमित्त पुरतं. आपण उगाच काळजी करतोय, हे त्यांनाही बरेचदा समजत असतं. पण शांत राहणं, relax होणं जमत नाही. 
असं काळजी वाटणं अनेक प्रकारचं असू शकतं. एखाद्या गोष्टीची खूप भीती वाटणे. एखादी गोष्ट करण्यासाठी हिंमतच न होणे, म्हणजे, नापास होऊ ह्या भीतीने पेपरच न देणे, आजारी पडू ह्या भीतीने अति स्वच्छता करणे किंवा अगदी काहीही दृश्य कारण नसले तरी मागे कधीतरी घडून गेलेल्या गोष्टींसाठी वाईट वाटणे, काळजी वाटणे. ह्या सततच्या काळजीमुळे चिडचिड वाढते, कामात लक्ष लागत नाही, रात्री झोप येत नाही, अनेक शारीरिक आजारही  बळावतात. 
ह्या अशा काळजीतून बाहेर पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात, विचार केला जातो, पण काळजी काही पाठ सोडत नाही. 'सजीवं दहते चिंता.. ' ह्या उक्तीप्रमाणे ती आपल्याला जाळतच जाते. 
मुळात काळजी वाटते ती आपलं काही वाईट होऊ नये किंवा आपल्यामुळे कुणाचं वाईट होऊ नये ह्या भीतीपोटी. ह्या भीतीला आपण आपल्या कल्पनेतच आपल्यापेक्षा खूप मोठं करतो. आणि मग त्यापासून पळण्याचा प्रयत्न सुरु करतो. काहीवेळेस ह्या भीतीपेक्षा मोठं कुणीतरी, जसं देव, एखादे गुरु, स्वामी, बाबा शोधतो आणि त्यांच्या आधाराने भीतीला घालविण्याचा प्रयत्न करतो. अगदी, मुलाच्या काळजीने हवालदिल झालेले आई-बाबा सुद्धा मुलाच्या भवितव्याच्या चिंतेला स्वत:पेक्षा मोठं करत असतात. गोष्टी हाताबाहेर गेल्या तर? हा प्रश्न ती भीती वाढवत असतो. आणि अजून वेळ गेलेली नाही हे बरेचदा आपण विसरतो. थोडक्यात, वर्तमान काळात राहायचं विसरतो. कोणत्याही चिंतेला जेव्हा आपण स्वत:पेक्षा मोठं करतो तेंव्हाच ती आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करते. म्हणजे, वरती नोंदाविल्याप्रमाणे, त्या गोष्टी आपण टाळू लागतो, त्रागा करून घ्यायला लागतो. 
जेंव्हा काळजीतून बाहेर पडण्याचा  प्रयत्न केला जातो, तेंव्हा खरंतर विचारच थांबविण्याचा प्रयत्न होतो, एका प्रकारे आपण जसं लहान मुलाला पळताना थांबवावं तसं विचारांना थांबवत असतो, आणि ते थांबतच नाहीत कारण थांबणं त्यांच्या स्वभावातच नाही. 
 मग काय करायचं ? त्या भीतीपेक्षा आपण मोठं  व्हायचं. आपल्याला भीती वाटतेय हे स्वीकारायचं, नेमकं काय वाटतंय हे ओळखायचं आणि त्या भितीला सामोरं जायचं.  मूल जेंव्हा पहिल्यांदा शाळेत जातं तेंव्हा आईला सोडून राहायचं ह्या काळजीपोटी रडत असतं. जेंव्हा आठवडाभर रोज त्या वातावरणाचा अनुभव घेतं, तेंव्हा आपोआपच शाळेची, आईला सोडून जाण्याची भीती कमी होते. भीती कमी होते ती शाळेत जाणं टाळल्याने नाही तर अनुभव घेतल्याने. पहिल्यांदा सायकल, गाडी चालवतानाही हाच अनुभव येतो. हा अनुभव म्हणजेच भीतीपेक्षा, काळजीपेक्षा मोठं होणं. म्हणजे, नापास होण्याच्या भीतीपोटी जर आपण परिक्षा टाळत असू तरआपण अनुभवच टाळतो आहोत. जेंव्हा  अनुभव टाळावासा वाटतो तेंव्हा, हि भीती खरोखर किती खरी आहे?आपण अजिबातच अभ्यास केला नाहीये का? परीक्षेत नेमकं काय विचारणार ह्याचा अंदाज आहे का? अपेक्षेबाहेरचे प्रश्न आले तर काय करणार आहोत? हे प्रश्न स्वत:लाच विचारून पहा. त्यांचा विचार करा.  त्यासाठी स्वत:ला तयार करा. म्हणजेच वाटणारी भीती हि तुमच्या आवाक्याबाहेरची नाही हे लक्षात घ्या.  हिच गोष्ट आपण जवळपास सर्वच काळजी वाटणाऱ्या गोष्टींबद्दल करू शकतो. जेव्हा गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या असतील तेव्हा काय? तेंव्हा त्या फक्त काळजीने दूर होणार आहेत का? ह्याचा एकदातरी विचार करा. मग अशा गोष्टींच्या परिणामांसाठी स्वत:ला खंबीर बनवणं जास्त योग्य नाही का?  आपण घाबरलो कि, आपण अनुभवालाच नाकारतो, एक प्रकारे शिकायलाच नाकारतो, जे जास्त धोकादायक असतं. म्हणूनच, भितीला कवेत घ्यायला शिकलं पाहिजे. अनुभवाला सामोरं गेलं पाहिजे. भितीवर आणि काळजीवर विजय मिळविण्याचा हाच मार्ग आहे. 

वसुधा देशपांडे-कोरडे 
 क्लिनिकल सायकोलोजीस्ट,
माईंड मास्टर कौन्सेलर्स प्रा. लि. 
९२२५५०५३६९



Comments

Popular posts from this blog