"खोटं कधी बोलू नये", हि शिकवण लहानपणापासून दिली जाते. तरीही, "पोट दुखतंय, शाळेत जात नाही", "माझा अभ्यास झालाय" किंवा "गृहपाठाची वही विसरलो," असं छोटं-मोठं खोटं सगळीच मुलं बोलतात. हे खोटं बोलण्याचं प्रमाण जेंव्हा मार्कांची अदलाबदल करणे, गृहपाठ दिलाच नाहीये असे सांगणे, निरोप न देणे, चुका लपविणे, न सांगता पैसे घेणं, अशा प्रकारे वाढत जातं तेंव्हा तो एक चिंतेचा विषय बनत जातो. मुलांना खोटं बोलण्याची सवय जडते. आपण नेमकं कुठे कमी पडलो, हे आई-बाबांना कळत नाही. आपल्या मुलाने आपल्याला फसवलं हे दु:ख खूप जास्त वाटतं. बरेचदा, 'खोटं बोलणे', ह्या कारणासाठी अगदी भयंकर शिक्षा केली जाते. त्या शिक्षेमागे आई-वडिलांना खोटेपणामुळे आलेला सात्विक संताप हे कारण असतं. आम्ही सभ्य आहोत, मग मुलं खोटं का बोलतात ? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना खोटं बोलण्याची कारणं लक्षात घ्यायला हवीत.
खोटं बोलण्याची सवय अगदी लहान वयात जडू लागते. मुलं जसजशी मोठी होतात तसतसे खोटं बोलण्याचे प्रमाण वाढते आणि त्याचे सवयीत रुपांतर होते. मग खरं बोलतानाच घाबरल्यासारखे वाटते. काही मुलं परिस्थितीतून सुटण्यासाठी खोटं बोलतात तर काही आपल्याला हवी ती गोष्ट मिळविण्यासाठी प्लान करून खोटं बोलतात. खोटं बोललं जातं ते परिणामांना घाबरून एखाद्या तीन वर्षांच्या मुलाला जर पाणी सांडल्यामुळे, रागावून विचारले, "कुणी सांडलं?" तर आपोआपच उत्तर येतं, "मी नाही". तुमच्या आविर्भावावरून मुलांना तुम्ही रागावलेले आहात ह्याची कल्पना येते आणि परिणामांना घाबरून खोटं बोललं जातं. त्या वयात खोटं म्हणजे नेमकं काय हेहि मुलांना समजलेलं नसतं. परिणामांना घाबरूनच मोठ्या वयात कित्येकवेळा खोटं बोललं जातं. "कमी मार्क्स मिळाले तर बाबा मारतील". "मित्राबरोबर उशीर झाला तर आई ओरडेल. " म्हणून, मग 'मी कुठे गेलो हे सांगायलाच नको. मार्क्स घरी दाखवायलाच नको'. असा विचार मुलांच्या मनात येऊ लागतो; आणि खोटं बोललं जातं. घरात नियम मोडण्यासाठी शिक्षा जेवढी कडक तेवढं खोटं बोलण्याचं प्रमाण जास्त. कारण तेवढी शिक्षेची भीती जास्त. अशा वेळी, खोटं बोलल्यानंतरच्या शिक्षेपेक्षा खरं बोलण्यासाठी आश्वासकता निर्माण करायला हवी. आपल्याला समजून घेतलं जाणार आहे हि आश्वासकता भीती कमी करते आणि खोटं बोलण्यापासून परावृत्त करते.
पाचव्या वर्षाच्या पुढे मुलांना खरं-खोटं म्हणजे नेमकं काय ह्याची जाणीव होते. अशावेळी खोटं बोललं जातं ते नावडतं काम टाळण्यासाठी किंवा होणारी शिक्षा चुकविण्यासाठी. "गृहपाठाची वही घरी विसरलो," " पोट दुखतंय म्हणून शाळेत जात नाही". अशा प्रकारचे बहाणे सर्रास केले जातात. त्यामागे काम टाळणे एवढाच हेतू असतो. कुणाला दुखावणे हा हेतू नसतो.अशावेळी, मुलांना त्यांचं खोटं बोलणं तुम्हाला समजलंय हे जाणवून द्यावं. काम करण्याचा कंटाळा येऊ शकतो हेही समजावून घ्यावं. तसंच खरं बोलण्यासाठी प्रोत्साहन द्यावं.
काहीजणांना बढाई मारण्याची सवय असते. अगदी लहान मुलांचं अशाप्रकारे बढाया मारणं हे त्यांचं कल्पनेत रमणे असते. अशावेळी, त्या फुलवायला त्यांना मदत करावी त्याचवेळी सत्याची जाणीवही करून द्यावी. मोठी मुलं (९-१० वर्षांची) बढाया मारतात,त्या मागचं कारण म्हणजे त्यातून इतरांचे लक्ष वेधून घेणे. अशा मुलांना कुणीतरी त्यांची प्रशंसा करावी असं वाटत असतं. ती मिळत नाही म्हणून खोटी बढाई मारायला सुरुवात होते. मित्रांकडून प्रशंसा मिळविण्यासाठी असा खोट्याचा आधार घेतला जातो. काही वेळेस काही व्यक्तिमत्त्व दोषांमुळे किंवा मानसिक कारणांमुळे खोटं बोललं जातं. बरेचदा, आपण खोटं बोलतोय हेही त्यांना कळत नाही. अशावेळी त्यांना खोटारडे ठरविण्यापेक्षा समजून घेण्याची गरज असते.

खोटं बोलायला मुलं आजूबाजूच्या वातावरणातून शिकतात. आम्ही कधीच खोटं बोलत नाही, मग मुलं खोटं का बोलतात? सगळ्या आई-वडिलांना हा प्रश्न पडतो. जरा आठवून पहा, 'लहान मुलाला सोडून आई जेव्हा बाहेर निघते, तेव्हा आजी, सांभाळणारे इतर लोक ती डॉक्टरकडे चाललीये असे सांगतात. मुलाला जेव्हा डॉक्टर कडे न्यायचे असते तेव्हा खाऊ, खेळणी आणण्यासाठी भुर्र जाऊयात असं सांगितलं जातं.' बऱ्याच घरांमध्ये प्रतिष्ठेच्या नावाखाली काही गोष्टी लपविल्या जातात. खोटं बोललेलं चालतं हे मुलं इथेच शिकतात. आपल्या मुलांशी वागण्यात सुरुवातीपासून आपण पारदर्शकता ठेवली तर प्रश्न बऱ्याच अंशाने सुटतो.
काही वेळेस, असं कोणतंही कारण नसताना खोटं बोललं जातं, अशा वेळी तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मुलांनी खोटं बोलू नये ह्यासाठी त्यांना विश्वासात घ्यायला हवं. चुकलं तरी समजून घ्यायला हवं. वारंवार चुकांची उजळणी करणं टाळायला हवं. त्यांना सुधरण्याची संधी द्यायला हवी. प्रामाणिकपणाने जगता येणं ह्यासारखं दुसरं सुख नाही. तसं जगायला मुलांना शिकवायला हवं.
वसुधा देशपांडे- कोरडे
माईंड मास्टर कौन्सेलर्स, प्रा. लि.
अहमदनगर-पुणे
९२२५५०५३६९.

Comments
Post a Comment