buddhimatta: anuvanshik ki vatavaran-nirmit

काही दिवसांपूर्वी, "मुलांमधील बुद्धिमत्ता ओळखा', ह्या शीर्षकाखाली एक लेख प्रकाशित झाला होता. ह्या लेखाने उपस्थित केलेला एक प्रश्न म्हणजे बुद्धिमत्ता अनुवांशिक असते कि त्याच्यावरती वातावरणाचा परिणाम होतो? हा प्रश्न जसा आपल्यासारख्या सर्वसामान्यांना पडतो तसाच तो संशोधकांनाही पडला आणि कित्येक दशके त्याच्यावरती अभ्यास करण्यात आला.   
अभ्यासाचा एक महत्वाचा प्रकार म्हणजे सारखीच अनुवंशिकता असणाऱ्या जुळ्या मुलांचा अभ्यास, ह्या अभ्यासातून पुढे आलेला विचारप्रवाह असे सांगतो कि, जुळ्या मुलांना वेगवेगळ्या वातावरणात वाढवले तरीही त्यांची बौद्धिक क्षमता सारखीच असते. त्यातही जे एकाच बीजातून (monozygotic ) जन्माला आलेले जुळे असतात त्यांच्या  बुद्धीमत्तेमध्ये जास्त साम्य दिसून येते. हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे असले आणि अनुवंशिकतेला आधार देणारे असले तरी दुसरे संशोधनही तेवढेच सतर्क आहे. दुसऱ्या संशोधनामध्ये वातावरण निर्मित घटकांचा बुद्धिमत्तेवर होणारा परिणाम तपासून पाहण्यात आला. ह्या मध्ये असे आढळले कि, जेव्हा जुळी मुले एकाच घरात वाढतात तेव्हा त्यांच्या बौद्धिक क्षमतांमध्ये जास्त साम्य असते. दत्तक दिलेल्या मुलांबाबतचे संशोधनही काहीसे अशाच प्रकारचे आहे. मुलांना मिळणारे चांगले वातावरण, शालेय सुविधा, पुरेसा आहार, आई-वडिलांचे प्रेम ह्या गोष्टी मुलांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करतात.  अनुवंशिकता आणि बुद्धिमत्ता ह्यामध्ये कोण सरस? हा वादाचा विषय आहे. एक मात्र नक्की, कि ह्या दोन्ही गोष्टी मुलांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करतात . 
अनुवंशिकतेमुळे बुद्धिमत्ता किती विकसित  होऊ शकते, ह्याची मर्यादा ठरते तर चांगल्या वातावरणामुळे
 अनुवांशिक बुद्धिमत्ता विकसित करण्याची संधी मिळते.   म्हणजे एखादे मूल सर्वसामान्य बुद्धिमत्तेचे असेल तर चांगल्या वातावरणामध्ये त्याची बुद्धिमत्ता अधिकाधिक खुलवता येते.  धारदार बनवता येते. चांगले वातावरण मिळाले नाही तर हीच बुद्धिमत्ता बोथट होऊ शकते. म्हणजे मूल मतिमंद होणार नाही, पण बुद्धिचा वापर कमी करायला लागेल. म्हणजेच, सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या आपल्या मुलाला चांगलं वातावरण देऊन 'स्मार्ट' बनवता येऊ शकतं. बुद्धिने कमी असणाऱ्या मुलांनाही चांगलं वातावरण देऊन आयुष्याच्या प्रवाहात स्वतंत्रपणे जगण्या एवढं सक्षम बनवता येऊ शकतं. अर्थात,  ह्यावरही काही मर्यादा निश्चितच आहेत. पण यशस्वी प्रयत्न करता येतात, हे मात्र नक्की.  

मुलांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करणारे वातावरणातील घटक पुढीलप्रमाणे आहेत ,
१. चांगला पोषक आहार :सकस, पोषक आहार मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असतो. स्मरणशक्ती, एकाग्रता ह्या गोष्टींवर आहाराचा परिणाम होतो. गर्भारपणात घेतलेल्या काही त्रासदायक औषधांचाहि परिणाम मुलाच्या मेंदूच्या वाढीवरती होऊ शकतो. 
२. चांगले वातावरण: घरातील माणसांचा एकमेकांशी असलेला सुसंवाद आणि मुलांशी असलेला सुसंवाद मुलांच्या बुद्धिमत्तेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. 
३.  गुण विकसित करण्याच्या संधी, शैक्षणिक सुविधा, ह्या गोष्टी मुलांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करतात. 
४. आईवडिलांकडून मिळणारे प्रोत्साहन, खेळण्यासाठी मुलांना दिले जाणारे स्वातंत्र्य, शिकण्यासाठी दिले जाणारे प्रोत्साहन, कल्पनाशक्तीला दिली जाणारी चालना, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ह्या गोष्टीही मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक असतात.   
५. शिक्षकांकडून मिळणारे प्रोत्साहन, मुलाची आवड ओळखून दिले जाणारे शिक्षण,  ह्या गोष्टीही मुलांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करतात. 

आपलं मुल अनुवंशिकतेने किती बुद्धिमत्ता  घेऊन आलंय, हे जाणून घेण्याची इच्छा सगळ्याच आई-बाबांना असते, पण त्याहीपेक्षा ती विकसित कशी करायची ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

वसुधा देशपांडे- कोरडे
माईंड मास्टर काउन्सेलर्स, प्रा. लि.
९२२५५०५३६९ 

Comments

Popular posts from this blog