'सगळ्या गोष्टी कशा सरळ, साध्या-सोप्या असायला हव्यात.' हा विचार डोक्यात आला कि, समोर असणाऱ्या अडचणी जास्त प्रमाणात डोळ्यांत येऊ लागतात. लहानपणापासून असा विचार करण्याची सवय जडली, कि, सोप्या नसणाऱ्या गोष्टी सोडून देण्याची मानसिकता तयार होऊ लागते. 'जिद्द, चिकाटी' ह्या शब्दांचा अर्थ कळतच नाही. 'कशाला करायचे एवढे कष्ट?'' हा प्रश्न जेंव्हा २०-२२ वर्षांची मुलं विचारतात तेव्हा आश्चर्य वाटतं. मुलांची अशी मानसिकता तयार होऊ लागली कि, आई-वडील काळजीत पडतात. आत्ता तर ह्याच्या करीयरची सुरुवात आहे, आता नाही तर कधी मेहनत करणार हा? हा प्रश्न बऱ्याच आई-बाबांच्या डोक्यात घर करून असतो.
जेव्हा मुलांसाठी सगळं सोपं आयुष्य देण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा अशी मानसिकता तयार होण्याची शक्यता जास्त असते. ह्याची सुरुवात खूप लहानपणापासून होते. मुलाला शाळेत उशीर होऊ नये, म्हणून आई आदल्या दिवशीपासून कामाला लागलेली असते. दप्तर भरणे, आंघोळ घालणे, कपडे घालून देणे, ह्या गोष्टी पटापट उरकत असते. अभ्यासाची वेळ येते, तेव्हा नोट्स तयार ठेवते. मुलाची एक दिवस शाळा बुडली तर वही पूर्ण करणे आईची जबाबदारी ठरते. न सापडणारी वस्तू हातातलं काम ठेवून शोधून देते. एखाद्या दिवशी न आवडणारी भाजी असेल तर आई अर्ध्या जेवणातून उठून मुलांसाठी दुसरी भाजी तयार करते. मुलांचं कॉलेजचं admission सहज होऊन जातं. जाण्या-येण्याची सोय म्हणून गाडी असते. खिशात मोबाईल असतो. (मोबाईल हि काळाची गरज आहे, हे मान्य आहे. गंमत अशी कि, त्या गरजेची किंमत ऐपतीनुसार बदलते. ) सगळं सोपं देण्याचा प्रयत्न असतो. जे हवं ते सगळं समोरच असतं. सहज मिळत असतं. एवढ्या जास्त प्रमाणात असतं कि, एखादी गोष्ट नाही मिळाली तरी त्याचं फारसं वाईट वाटत नाही. चालून जातं.काहीतरी मिळविण्याची जिद्द हरवते.
एखादी गोष्ट मिळविण्याची बाहेरून सक्ती होते, आणि ती सहजपणे मिळत नाही हे जाणवतं तेव्हा मग चिडचिड होते. संयम कमी पडतो आणि आत्मविश्वास हरवू लागतो.
सगळं आपल्याला हवं तसं सहज घडणार नाही, मेहनतीला पर्याय नाही. हे मुलांपर्यंत पोहोचवणं आपलंच काम आहे, नाही का?
Comments
Post a Comment