'It's always ok'
कुणी चुकलं आणि 'sorry' म्हटलं तर आपण काय करतो? 'it's okay' म्हणतो आणि पुढच्या कामाला लागतो. तोच विचार डोक्यात ठेऊन ओझं सहसा वाढवत नाही. बरेचदा तर sorry नाही म्हटलं तरी, समोरच्याने चुकू नये असं वाटलं तरी माफ करून आपण सोडून देतो. पुढे चालत राहण्यासाठी 'it's okay' हा मंत्र sorry पेक्षा जास्त महत्त्वाचा ठरतो.
बरेचदा, आपल्याला असं वाटतं, 'आपण चुकूच नये'. आपल्या अनेक टेन्शन्सच्या मुळाशी हा विचार असतो. हा विचार बरेचदा अपराधीपणाची भावना तयार करतो. आपल्याला अनेक गोष्टींपासून अडवतो. आपण स्वत:लाच टोचून बोलू लागतो. त्रास देत राहतो. आपण स्वत:ला sorry कधी म्हणतच नाही.
मलाही असंच वाटायचं. मी माझ्या चुकांचा खूप विचार करायचे. त्या होऊ नयेत म्हणून काटेकोर असायचे. टेंशन मध्ये असायचे. मग एकदा, मी स्वत:लाच विचारलं, 'का चुकू नये? मी एकटीच काही विशेष शक्ती घेऊन जन्माला आलीये का?' 'नाही असं नक्कीच नाही. सगळे चुकतात तशी मी चुकले तर एवढं काय बिघडणार आहे?'. 'मग महत्त्वाचं काय, कधीच न चुकणे कि चुकीतून शिकणे?' मला माझं उत्तर मिळालं. मी स्वत:लाच sorry म्हटलं आणि मग मीच मला, "it's ok' म्हणाले.
मी स्वत:ला माफ करायला शिकले. एकदा स्वत:ला माफ करण्याची सवय लागली कि, अनेक पर्याय दिसू लागतात. मग स्वत:लाच बिनशर्त स्विकारणे सोपे जाते. आपल्या समोरच्या अडचणींवर मात करण्यासाठी स्वत:लाच 'it's okay', म्हणणं फार आवश्यक असतं.
Comments
Post a Comment