अभ्यासात येणाऱ्या अडचणी, वाचता न येणे, वाचलेले सांगता येणे पण, लिहिता न येणे, स्पेलिंग्स लक्षात न राहणे, ह्या सगळ्यांच्या मागे learning disability हे कारण असू शकतं. मागील लेखांमध्ये अशा प्रकारच्या समस्यांचा उल्लेख केला होता. पण, learning disability म्हणजे काय? ह्या बाबत माहिती ह्या लेखात पाहूया.
learning disability म्हणजे शाळेत शिकविल्या जाणाऱ्या गोष्टी इतर मुलांप्रमाणे समजून घेता न येणे. समजलेल्या गोष्टी शब्दांत मांडता न येणे. असे का? learning disability असणारी मुलं कमी हुशार असतात का? आळशी असतात का? हि कधीच शिकू शकणार नाहीत का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. हि मुलं हुशार असतात. आळशी किंवा मूर्ख नसतात. त्यांच्या मेंदूमध्ये असणारा corpus callosum नावाचा भाग जरासा गोंधळलेला असतो.
corpus callosum हा भाग मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाला जोडणारा असतो. त्याचा गोंधळ उडाल्यामुळे, वाचताना आलेली माहितीवर व्यवस्थित प्रक्रिया होत नाहीत. म्हणूनच आपण काय वाचतो आहोत हे मुलांना समजतच नाही. मग वाचन हि त्यांच्यासाठी अत्यंत त्रासदायक गोष्ट ठरते. म्हणूनच मग मुले सारख्या दिसणाऱ्या अक्षरांच्या बाबतीत गोंधळतात. गणिताच्या चिन्हांच्या बाबतीत त्यांचा गोंधळ उडतो. थोडक्यात, अक्षरे आणि अंक शत्रू असल्यासारखे वागायला लागतात.
अभ्यासाचा कंटाळा म्हणजे learning disability नाही. किंवा, परीक्षेत कमी मार्क्स मिळणं म्हणजेही learning disability नाही. तर, अभ्यासासाठी लागणाऱ्या क्षमतांची कमतरता म्हणजे learning disability. ह्या क्षमता कोणत्या? वर्गीकरण करता येणे, माहितीचे विश्लेषण करता येते, माहिती योग्य शब्दांत मांडता येणं ह्या गोष्टी शिकण्यासाठीची क्षमता कमी असणं म्हणजे learning disability असणं.
learning disabilityचे तीन प्रकार आढळून येतात. dyslexia, dysgraphia आणि dyscalculia. Dyslexia हा प्रकार तारे जमींपर मधील ईशानमुळे आपल्या सर्वांना माहिती आहेच. Dyslexia म्हणजे वाचताना लागणाऱ्या क्षमतांचा अभाव. थोडक्यात, वर्गीकरण करणे, शब्द आणि ध्वनी ह्यांचा संबंध लावणे, शब्दांचे अर्थ लक्षात घेणे, व्याकरणाचे नियम समजावून घेणे, पाढे, आठवड्याचे दिवस सलग सांगता येणे इ. गोष्टींमध्ये समस्या जाणवतात. ह्या समस्या जरी वाचनाशी निगडीत असल्या तरी त्यांचा परिणाम मुलांच्या लेखनावरही होतो. गणितातील शाब्दिक उदाहरणे समजावून घेतानाही होतो. अभ्यासातील सगळ्याच गोष्टींमध्ये मुलं मागे पडू लागतात.
Dysgraphia हा प्रकार लेखनाशी संबंधित आहे. विचार योग्य शब्दांत मांडता येणं, गोष्ट किंवा निबंध ह्यांचे नियोजन न करता येणं, पेन-पेन्सील नीट पकडता न येणे, लिहिताना हाताची बोटे दुखणे, इ. समस्या ह्या मुलांना जाणवतात. ह्या बरोबरच इतर बारीक कामे, चित्र काढणे, दोरा ओवणे, बटण लावणे, बुटाची लेस बांधणे ह्या गोष्टींमध्येही समस्या जाणवतात.
Dyscalculia हा प्रकार गणिताशी संबंधित आहे. गणितातील चिन्हे न समजणे. १२ आणि २१ किंवा १३ आणि ३१ अशा अंकांच्या बाबतीत गोंधळ उडणे ह्या गोष्टी dyscalculia ह्या प्रकारांत आढळून येतात.
learning disabilities बरेचदा एकत्रितपणे आढळतात तर काही वेळेस फक्त एखाद्याच क्षेत्रामध्ये समस्या जाणवते. मुलं शाळेत जायला लागली कि, ह्या समस्या जाणवू लागतात. ह्या समस्यांमुळे मुलं एकटी पडतात. स्वत:ला कमी लेखू लागतात. अभ्यास, शाळा टाळू लागतात.
ह्या मुलांना शिक्षकांनी आणि पालकांनी वेळीच ओळखायला हवं. त्यांच्यातल्या गुणांना वाव द्यावा. त्यांना समजावून घ्यावं. हि मुलं बदकांच्या सोबत वावरणाऱ्या राजहंसासारखी असतात. त्यांचे प्रतिबिंब पहायला आपणच मदत करायला हवी.
Comments
Post a Comment