Maitri mulanshi

मैत्री   प्रत्येक नात्याची गरज असते. मैत्री म्हणजे नेमकं काय, हे व्याख्येत बांधता येत नाही. नात्यात मैत्री  असते तेव्हा आपण प्रत्येक तसेच वागता येतं. कसलाही मुखवटा, खोटेपणा, लपवाछपवी  करावी  लागत नाही. 

मुलांच्या आणि पालकांच्या नात्यांत अशी मैत्री असणं आवश्यक आहे. आपल्या मुलाचं मित्र व्हावं असं सगळ्याच पालकांना वाटत असतं. म्हणून काही वेळेस खूप मोकळेपणाने वागलं जातं. हवे ते लाड पुरवले जातात. मुलांच्या चुकांनाही पाठीशी घातलं जातं.  कोणत्याही गोष्टीला होकार दिला जातो. असं  केल्याने मुलं  मित्र होतात का? मग मुलांच्या चुकांचं काय? मग आधी मोकळं सोडून मग धाक दाखवला जातो. मैत्री लांबच राहते.

मुलांचे मित्र होण्यासाठी, मुलं लहान असल्यापासून त्यांचं बोलणं नीट ऐकून घेण्याची सवय ठेवायला हवी. आपण ऐकतो ते प्रतिक्रिया देण्यासाठीच. समजून घेण्यासाठी नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे उत्तर, सल्ला किंवा उपदेश तयार असतो. मुलं बोलताना कित्येकदा आपण काय प्रत्युत्तर द्यायचं ह्याचाच विचार करत असतो. खरंतर ह्याची गरज नसते. मुलं काय बोलतायत ते समजून घेण्याची. त्यांच्या भावनांना शब्दरूप देण्याची गरज असते.  

पूर्वी, मिहिका आणि मी काहीसे खालीलप्रमाणे बोलायचो.
शाळेतून आल्यानंतर,
मिहिका: आई, तू मला पेन्सील का दिली नाहीस? तुझ्यामुळे मला फटके बसले. (खरंतर तिच दप्तर तीच भरते. मी भरलेल्या तिला आवडत नाहीत.)
मी: तुझी पेन्सिल न्यायची हे तुला कळत नाही का?
मिहिका: (रडत) इथून पुढे तूच मला पेन्सिल दिली पाहिजेस. नाही दिलीस ना तर बघच आता. बावरट. 
मी: तुला कितीवेळेस सांगितलंय, असं बोलायचं नाही. बावरट म्हणायचं नाही.
मग एकमेकींवर आवाज चढवायचा. रागवायचं आणि मग कसंबसं जेवायचं.

मग एक दिवस, मी माझी बोलण्याची पद्धत बदलली. 
मिहिका: आई, तू मला literature ची नोटबुक दिली नाहीस. teacher मला ओरडल्या.
मी: खूप वाईट वाटलं असेल ना तुला?
मिहिका: हो, मारलं पण.
मी: अरेरे! लागलं का ग?
मिहिका: हो ना, आमच्या teacher काहीही झालं तरी मारतात.
मी: मारायला नको, नाही का?
मिहिका: हो ना.. मारलेलं मला आवडतच नाही.
मी: बर आज एक गंमत करायचीये. पटकन जेवण करू यात. आणि पेपरचा ससा बनवूया( पेपर, कात्री, डींक आणि रंग हा मिहिकाचा weak point.)
एवढ्यावर ती खुश झाली आणि मी भांडणाचा एक एपिसोड यशस्वीपणे टाळू शकले.

माझ्या लक्षात आलं, तिला माझ्याकडून सोलुशन किंवा उपदेश नको होता. तिला होणारा त्रास तिला मला सांगायचा होता. मला तो समजतोय हा विश्वास हवा होता.  मी तो ऐकून घेतला, समजाऊन घेतला त्यादिवशी भांडण टळलं.  ऐकून घेणारा कान लहानपणापासून, आयुष्यभरासाठी प्रत्येकालाच  हवा असतो. जेव्हा आपण तो मुलांना पुरवतो तेंव्हा  आपोआपच आपल्याशी बोलावंसं  वाटू लागतं. सांगावंसं वाटू लागतं. संवाद साधला जाऊ शकतो. 

मुलांनी बोललेलं ऐकणं हा मैत्रीतला फक्त एक टप्पा झाला. मुलांशी मैत्री करताना, आणखी एक गोष्ट आवश्यक असते. ती म्हणजे मुलांना स्पेस देणं. काही गोष्टी ह्या मुलांच्या मुलांनाच कराव्याशा वाटतात. सोडवायच्या असतात. काहीवेळेस एकटं राहावंसं वाटतं. त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत जावंसं वाटतं. अगदी विचित्र रंगाचं nail polish लावावंसं वाटतं.  काही गोष्टी सांगायच्या नसतात. अशा वेळी त्यांना त्यांची स्पेस द्यायला हवी. त्यांना मोकळं वाटावं असं वागू द्यायला हवं. 

आता हेच बघा, 
आई:काय लिहितोयस डायरीत?
मुलगा: काही नाही आपलं असंच. 
आई: लपवाछपवी का करतोस? नक्कीच काही तरी चुकीचं लिहितोयस. 
मुलगा: नाही गं.. फक्त जरा पर्सनल आहे. 
आई : पर्सनल? माझ्यापासून पर्सनल? आई आहे मी तुझी. तुला चांगली ओळखून आहे. तुझ्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्यात मी....  आणि बरंच काही...

बरेचदा, आई फक्त एवढ्यावर थांबत नाही. मुलगा नसताना त्याची डायरी चोरून वाचते. नंतर त्याला जाबही विचारते. जर आपण मुलांना एवढं सगळं देऊ शकतो. तर जराशी स्पेसही नक्कीच देऊ शकतो. स्पेस देणं म्हणजे काही गोष्टी त्याचे विचार, कल्पना भावना वेगळ्या असू शकतात हे समजून घेणं. त्याला त्या ठरवू देणं.
आता मैत्रीतली सर्वांत महत्त्वाची गोष्ट. विनाअट-विनातक्रार स्वीकार. मुलांना ते आहेत तसं स्वीकारणं, पालक म्हणून गरजेचं आहे. आपल्याला त्यांच्यावर संस्कार करण्याची खूप घाई झालेली असते. म्हणून त्यांना मुळापासून बदलण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मग स्वीकार राहूनच जातो.  'त्या अमुक मुलाला जमलं ते तुला का नाही जमत?' हा प्रश्न मुलांना  विचारत बसलो तर मुलं दुरावणार हे नक्की.  
 काही दिवसांपूर्वी एक काकू भेटल्या होत्या. त्यांच्या शरीराने अधू असणाऱ्या आणि स्लो लर्नर असणाऱ्या मुलीला घेऊन आल्या होत्या. म्हणाल्या, 'माझी मुलगी आहे हि अशी आहे. ह्यांतून तिच्यातलं जे चांगलं आहे ते मला वर काढायचं आहे'. स्वीकार म्हणजे काय, आणि संस्कार म्हणजे काय हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. मुलांशी मैत्री करायची तर त्यांच्यातले गुण-दोष, यश-अपयश सारख्याच पद्धतीने स्वीकारता यायला हवं.

मुलांशी मैत्री करताना आपण त्यांना स्पेस द्यायची, स्वीकारायचं, ऐकून घ्यायचं तर मग आपलं म्हणणं कधी सांगायचं? काय चांगलं, काय वाईट मुलांना कधी कळणार? आपण नाही तर कोण सांगणार?

फार पूर्वी, एकदा आईशी खोटं बोलले होते. आईपासून काहीच लपत नसतं तसं खोटंही लपलं नाही. आईने मला विश्वासात घेतलं आणि समजावून सांगितलं. माझं म्हणणं तिला पटतंय असं सांगितलं पण दुसरी बाजू समोर ठेवली. 'विचार कर', म्हणाली. तिथून पुढे तिने तीच स्ट्रॅटेजि ठेवली. चुकल्यानंतर कडक शिक्षा मला कधीच झाली नाही; पण विचार करण्याची, चूक सुधारण्याची संधी मात्र मिळाली. आईने मला, माझ्या चुकांना स्वीकारलं, माझं बोलणं ऐकून घेतलं, मला विचार करण्याची, निर्णय घेण्याची मोकळीक दिली. त्यानंतर खोटं बोलणं, लपवाछपवी ह्याला आमच्या नात्यात स्थानच उरलं नाही. ती माझी मैत्रीण झाली, तिचं आईपण न गमावता.

मुलांशी जेव्हा अशाप्रकारे मैत्री केली जाते तेंव्हा मुलं एक चांगली व्यक्ती म्हणून विकसित होऊ लागतात. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मैत्री हि प्रत्येक नात्याची गरज असते. मुलांशी मैत्री करण्यातून त्यांना इतरांशी मैत्री करणं. ती टिकवणं. नाती जोडणं आणि सांभाळणं. इतरांचा स्वीकार करणं. आदर करणं ह्या गोष्टी शिकविता येऊ शकतात. धाक दाखवूनही आपल्याला त्यांना हेच तर शिकवायचं असतं, नाही का?








Comments

Popular posts from this blog