partnership

बरेचदा, आई-बाबा जेंव्हा मुलांना घेऊन येतात तेंव्हा असं जाणवतं कि मुळांत मुलांना कसं वाढवायचं ह्यावर एकमत नाहीये. बरेचदा, मुलं ह्या मतभेदाचा  व्यवस्थित गैरफायदा घेतात. पालक म्हणून पिढी घडविण्याची फार मोठी जबाबदारी आपल्यावर असते हे विसरून चालणार नाही. म्हणूनच  आपण कसे वागणार आहोत, त्याचा काय परिणाम होऊ शकतो ह्याचा विचार करायला हवा.

लग्नापूर्वीची आणि लग्नानंतरची एकदोन वर्ष एकमेकांच्या खूप प्रेमात गेलेली असतात. त्याभारांत अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला जातो. आपल्या नवर्याचे किंवा बायकोचे गुण- दुर्गुण कोणते आहेत, आपल्या आणि त्याच्या/ तिच्या घरांमध्ये कोणता फरक आहे? त्याचा तिच्या वागण्यावर काय परिणाम झाला असावा, ह्याचा विचार करणे, तिला/त्याला ओळखणे. खटकणार्या गोष्टी स्पष्टपणे, तक्रार न करता एकमेकांना सांगणे आणि त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. 

नवरा-बायको म्हणून आपण वेगवेगळ्या घरांत लहानाचे मोठे झालेलो असतो. प्रत्येक घराची वागण्याची पद्धत वेगवेगळी असते. आपण लहानपणापासून ती पद्धत शिकतो. तसाच आपला दृष्टीकोन होत जातो. मग मुलांना शिकवताना आपण त्याच पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करतो. इथे जेव्हा आपल्या घरातली आणि आपल्या नवर्याच्या  घरांतली पद्धत वेगळी असते, तेव्हा वादाला सुरुवात होते. कारण हे मुद्दे आपण एकमेकांशी कधी बोलतच नाही किंवा ह्याबद्दल कधी विचारच करत नाही. मग मुलांची आई एक सांगते, बाबा दुसरंच.  त्यामुळे मुले एकतर confuse होतात किंवा जे फायद्याचे आहे ते करण्याचा प्रयत्न करतात. 

उदाहरणादाखल सांगते, माझ्या घरी, कोणतीही वस्तू हरवली तरी त्याच्यावर शिक्षा केली जात नसे. अजूनही केली जात नाही. त्याकडे फक्त एक घटना म्हणून पहिले जाते. उपाय केले जातात. माझ्या नवर्याच्या घरांत मात्र एखादी गोष्ट हरवणे म्हणजे घोर अपराध समजला जातो. 'आता मुलीकडून वस्तू हरवणे', ह्या गोष्टीकडे आम्ही वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतो. मला वाटते, 'हरवली असेल वस्तू. होतं असं कधीतरी. It's ok. मुद्दामहून कुणी कशाला हरवेल.' तर त्याला वाटत असतं, 'व्यवस्थित कशी काय नाही ठेवली गेली? असं वागणं अजिबात बरोबर नाही. ते काही नाही हिला व्यवस्थितपणा शिकवलाच पाहिजे. शिक्षाच केली पाहिजे.' मग वस्तू हरवली कि, मुलगी बाबाकडे जाण्याऐवजी माझ्याकडे येते. 

ह्यावेळी जर मी तिला पाठीशी घातले,( कारण माझ्या दृष्टीने असं होऊ शकत), तर बाबाच्या वागण्याचा शून्य परिणाम होतो. मग पुढे बाबा, 'तुझ्यामुळे चांगल्या सवयी लागत नाहीत तिला,' असं म्हणू शकतो. मुलीला चांगल्या सवयी लागू नयेत असं मला वाटत असेल   का?

ह्याऐवजी जर आम्ही दोघांनी दोघांच्या वागण्याचा व्यवस्थित अभ्यास केला. एकमेकांना समजावून घेतलं तर आम्ही आमच्या मुलीला कोणत्या सवयी लावायच्या आहेत ह्यावर चर्चा करू शकतो. 'वस्तू जागेवर ठेवण्याची सवय वाईट नक्कीच नाही', हे मी समजावून घेऊ शकते. तसेच त्यासाठी अगदी टोकाला जाऊन कडक शिक्षेची गरज नाही हे त्याला कळू शकतं.  सवय कशी लावायची ह्यावर आम्ही विचार करू शकतो. ह्यासाठी फार नाही फक्त संवादाची गरज असते. 

मुलांना जन्म देताना, किंबहुना त्यापूर्वी आणि  मुलांना वाढविताना एकमेकांना जाणून घेणे आणि एकमताने काही गोष्टी आपल्या घरासाठी ठरविणे गरजेचे असते. कितीदातरी, बाबांनी घरातल्या गोष्टींमधून अंग काढून घेतल्याचे जाणवते. काही घरांत आई सगळ्यांवरच नेहमीच रागावलेली असते. काही वेळेस दोघेही आपापल्या जगांत व्यस्त असतात (वाद नको म्हणून हा मार्ग स्वीकारलेला असतो). तर कधी बाबा कायम रागावणार आणि आई प्रेमच करणार हे ठरलेले असते.  त्याऐवजी मुलांपर्यंत नेमकं काय पोहोचवायचंय हे ठरवलं तर उत्तरे मिळत जातात. 

कोणत्याही दोन व्यक्तीमध्ये मतभेद असतातच. पण आपले मतभेद मुलांपुढे उघड करण्याची गरज नाही. आपण ते एकमेकांशी बोलून ठरवू शकतो. मिटवू शकतो. अनेक घरांमध्ये आईला काहीही बोलले तरी चालते. ती बिच्चारी, ऐकून घेणारी अशी असते. असं झालं कि तोल ढासळतो. मुले मग आईलाच धमकी देऊ लागतात. वेड्यात काढतात, ऐकत नाहीत. मुलांसमोर आपल्या जोडीदाराची प्रतिमा भीतीदायक, नालायक किंवा मूर्ख किंवा अशीच काही करण्याचीही गरज नाही. आपल्या पार्टनरला आपण आदर निश्चितच देऊ शकतो. तो द्यायलाच हवा. 

लक्षात घ्या, मुलांना वाढविणे हि पार्टनरशिप आहे. आपण मधूनच आपल्या पार्टनरच्या विरोधात गेलो, किंवा त्याच्यावर सगळंच सोडून गेलो, तर त्रास होणार, आपल्यालाही आणि मुलांनाही.  मुलांशी संवाद साधण्यापूर्वी आईबाबांचा एकमेकांशी संवाद असणे आवश्यक आहे, ते ह्यामुळेच.   


Comments

  1. On this platform, we will get people to see and download all kinds of photos. Good morning, whatsapp, love suple, good night, new year story and even entertainment can be created. https://fliximages.com/

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog