हल्ली मुलांच्या अपयशाने आई-बाबाच खचून जातात. अशाच काही खचलेल्या आई-बाबांनी मुलाला कमी मार्क्स मिळाल्याबद्दल माझ्यासमोर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या अशा, (कंसातील वाक्य मी मनात बोललेली आहेत)
नं १: कार्ट्याने मान खाली घालायला लावली. कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. ( केवढी हि अपमानास्पद गोष्ट! इथून पुढे असं झालं तर ह्यांना कळायला तरी नको. )
नं २ : ह्याच्यासाठी मी महिनाभर रजा घेऊन घरात होते. किती क्लासेस लावले. अभ्यास घेतला. झोपसुद्धा यायची नाही मला, आणि हा असे दिवे लावून आला… (दिवे लावायला तुम्हीच का गेला नाहीत? अशीही सुट्टी घेतली होतीच)
नं ३: आता ह्याच्याकडून अपेक्षाच नाही राहिल्या. (सुटला बिचारा.)
नं ४: आमचं नशिबच वाईट. ह्या गाढवाला जन्म दिला. (त्याचं चांगलं कशावरून?)
नं ५: एवढी मी मघापासून बडबडतेय काही वाटतं का बघा…(जे वाटतं ते त्याने सांगितलं तर तुम्हाला पटणार आहे का?)
मी मनात बोललेली वाक्यं तुमचे चिरंजीव आणि सुकन्याही बोलू शकतात. तेंव्हा प्रतिक्रिया देताना जरा विचार करा.
Comments
Post a Comment