इस मार्ग कि सभी लाइने व्यस्त है !

काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीच्या घरी गेले. तिचा सात-आठ महिन्यांचा मुलगा रडत होता. रडण्याचं कारण कळत नव्हतं. मैत्रीण वैतागली होती. तिने मोबाईलवर एक वेगवेगळ्या आवाजांचा vdo लावला. वेगळा आवाज आल्याने मुलगा शांत झाला. असाच एक चार-पाच वर्षांचा मुलगा मोबाईलवर अगदी छान गेम्स खेळतो. डाउनलोड कसं करायचं? wi-fi कसं सुरु करायचं सगळं माहितीये, आई-बाबा कौतुकाने सांगतात. मला आश्चर्य वाटतं.

लहान तसेच किशोरवयीन मुलांकडून होणारा स्मार्टफोन्स चा वापर हि आई-वडिलांसाठी एक कौतुकाची आणि चिंतेची बाब झाली आहे. 'मोबाईल फोन्स', अन्न , वस्त्र आणि निवाऱ्याइतकीच आवश्यक गोष्ट.  मित्रांशी संवाद, गेम्स, गाणी,  चित्रपटही सगळं एका छोट्याशा   वस्तूमध्ये मावत असल्यामुळे मोबाईलने लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना वेड लावले आहे.  अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत,  मोबाईल आपल्या जवळ असतो.

सुरुवातीला स्मार्ट फोन्स एक गरज म्हणून दिले जातात. अनेक  अभ्यासाशी संबधित applications टाकले जातात.  इंटरनेटची सोय उपलब्ध असल्याने मुले जगाशी संवाद साधू  शकतील. माहिती मिळवू शकतील असं वाटत असतं. कालांतराने मात्र फोन आणि मुलं ह्यांचं खूप जवळचं नातं निर्माण होतं. फोन काही कारणाने बंद झाला कि जीवाची घालमेल होते. जेवताना, बाहेर जाताना, रस्त्याने चालताना, अभ्यास करताना सतत मोबाईल मध्ये बुडालेली असंख्य मुलं आपल्याला दिसतात. त्यांच्याशी बोलताना त्यांचं तुमच्याकडे लक्षच नसतं.  ती सतत 'इस मार्ग कि सभी लाइने व्यस्त है।' असा मेसेज आपल्याला देत असतात.

अगदी ५ ते ७ वर्षांची मुलं सुद्धा मोबाईल अगदी सहज हाताळतात.  खूप उड्या मारत असणाऱ्या, रडणाऱ्या मुलाला शांत करण्याचा एक उपाय म्हणूनही मोबाईलकडे पहिले जाते.  'जरा वेळ खेळला तर खेळू दे, मला तेवढीच शांतता' असा विचारही कित्येकदा आई-वडील करतात. हा थोडा वेळ जास्त कधी होतो ते कळत नाही.  

स्मार्ट फोन्सच्या अति वापरामुळे आई-वडील वैतागाण्याबरोबरच इतरही समस्या मूळ धरतात. लक्ष केंद्रित करता न येणे, झोप न लागणे, डोकं दुखणे, चिडचिड वाढणे अशा अनेक समस्या जाणवू लागतात.  संवाद  साधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ह्या यंत्रामुळे तुमचा जवळच्या माणसांशी असणारा संवाद तर खुंटत नाही ना ह्याची काळजी घ्यायला हवी.  तुम्ही स्मार्ट फोन्स अतिप्रमाणात वापरता हे कसं ओळखायचं?

१. सकाळी उठल्यानंतर एक तासाच्या आत तुम्ही फोन चेक करता का?
२.  फोन विसरला तर तुम्ही बेचैन होता का ?
३. दिवसभरात अनेक वेळेस फोन चेक करता का ?
४. आलेल्या मेसेजला लगेचच कॉमेंट करता का?  उत्तर देता का? तशी खूप इच्छा होते का?
५. रात्री झोपतानाही फोन जवळ ठेवता का?
६. जवळ घड्याळ असतानाही किती वाजलेत हे पाहण्यासाठी मोबाईल वापरला जातो का?


जर तुम्ही ह्या गोष्टी करत असाल तर स्मार्ट फोन्स चा वापर नियंत्रित करण्याची वेळ आली आहे हे समजावे.  हा वापर नियंत्रित करण्यासाठी थोडा वेळ तरी फोन वापरायचा नाही हा नियम स्वत:ला लागू करायला हवा. रोज ठराविक वेळेतच फोन चेक करण्याची सवय लावून घ्यायला हवी. पालकही, मोबाईलसाठी होणाऱ्या खर्चावर बंधनं टाकू शकतात.

स्मार्ट फोन हे एक साधन आहे.  त्याचा वापर किती आणि कसा करायचा हे आपल्याच हातात आहे.  जगासाठी खिडकी उघडली जाताना, जवळचं पाहण्यासाठी आपल्या डोळ्यांची आणि मनाची खिडकी बंद तर होत नाही ना? ह्याची दक्षता घ्यायला हवी. लहान वयातल्या मुलांसाठी मोबाईलच्या गेम्स पेक्षा आपला वेळ जास्त फायद्याचा ठरू शकतो. बाहेर खेळणे, पडणे, लागणे प्रसंगी भांडणे ह्या गोष्टी चैतन्याचं लक्षण आहे. मोबाईलच्या खोट्या चैतन्यात हे खरं चैतन्य हरवणार तर नाही ना? हे पाहायला हवं.







Comments

Popular posts from this blog